पनवेल येथे नियमबाह्य पद्धतीने विवाह केल्याप्रकरणी वरासह तिघांवर गुन्हा नोंद

कोरोनामुळे वराच्या भावाचा मृत्यू

पनवेल – पनवेलमधील नेरे गावात नियमबाह्य पद्धतीने हळदी समारंभ आणि विवाह सोहळा यांमध्ये लोकांची गर्दी केल्याच्या प्रकरणी वर, त्याचे वडील आणि मुलीचे वडील यांच्यावर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. मोठ्या प्रमाणात लोकांच्या जमवलेल्या गर्दीमुळे वराच्या भावाला कोरोनाचा संसर्ग होऊन त्याचा मृत्यू झाला आहे. गावातील इतर १२ जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यामुळे संपूर्ण गाव सील केले आहे. विशेष म्हणजे एवढे सर्व होत असतांना स्थानिक पोलीस आणि तहसीलदार यांचे याकडे दुर्लक्ष झाले.

नवी मुंबईत १० ठिकाणी ७ दिवसांची दळणवळण बंदी

नवी मुंबईमध्ये कोरोनाचा सर्वाधिक प्रादुर्भाव होणार्‍या १० ठिकाणी दळणवळण बंदी करण्याचा निर्णय नवी मुंबई महानगरपालिकेने घेतला आहे. या परिसरातील ७० सहस्र घरांमध्ये ‘विशेष आरोग्य पडताळणी’ मोहीम राबवणे आणि येथील अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकानेही बंद ठेवण्यात येणार आहेत. नवी मुंबईत ६ सहस्रांहून अधिक कोरोनाबाधितांची संख्या झाली असून आतापर्यंत २०१ जणांचा मृत्यू झाला आहे.