रामनाथी आश्रमातील श्री भवानीदेवीच्या नूतन मंदिराच्या ‘कलश-स्थापना’ विधीच्या वेळी अनुभवण्यास मिळालेले प.पू. दास महाराज यांचे द्रष्टेपण

प.पू. दास महाराज

१. प.पू. दास महाराजांना ‘कलश-स्थापना’ विधीच्या वेळी अवेळी आलेल्या पावसामुळे अडचण येत असल्याचे सांगितल्यावर त्यांनी त्याविषयी आश्‍वस्त करणे आणि धार्मिक विधी पूर्ण होईपर्यंत पावसाची अडचण न येणे

कु. प्रियांका लोटलीकर

‘श्री विद्याचौडेश्‍वरीदेवीने सांगितल्यानुसार सनातनच्या रामनाथी आश्रमात नवीन मंदिर बांधून त्यामध्ये श्री भवानीदेवीच्या मूर्तीची पुनर्स्थापना करण्यात आली. नूतन मंदिरावर कलश स्थापनेचा विधी चालू होतांना पाऊस पडत होता; यामुळे कलश स्थापना विधी करण्यात अडचण येत होती. या धार्मिक विधीला प.पू. दास महाराज यांची वंदनीय उपस्थिती लाभणार होती. प.पू. दास महाराजांना अनावश्यक थांबून रहावे लागू नये, यासाठी मी त्यांना भ्रमणभाष केला आणि सांगितले की, ‘कलश-स्थापना विधी करण्यात अवेळी आलेल्या पावसामुळे अडचण येत आहे.’ तेव्हा प.पू. दास महाराज म्हणाले की, ‘काळजी करू नका, कलश-स्थापना विधी पूर्ण होईपर्यंत पावसाची अडचण येणार नाही.’ त्यामुळे मी आश्‍वस्त झाले. त्यांच्याशी भ्रमणभाषवर बोलणे झाल्यानंतर २-३ मिनिटांतच पाऊस थांबला आणि कलश-स्थापना विधी पूर्ण होईपर्यंत पाऊस आला नाही. यातून मला प.पू. दास महाराजांच्या द्रष्टेपणाची प्रचीती आली.

२. तीव्र तळमळीमुळे शारीरिक अडचणीवर मात करून मंदिरावर चढून कळसाचे भावपूर्ण दर्शन घेणारे प.पू. दास महाराज !

कलश-स्थापना विधी चालू झाला. प्रकृती बरी नसतांनाही प.पू. दास महाराज कलश-स्थापना विधी पूर्ण होईपर्यंत तेथे थांबले. पूर्वी झालेल्या गंभीर अपघातामुळे त्यांच्या पायातील हाडांना मार बसल्याने त्यांना काठी टेकून चालावे लागते. त्यांच्या पायातील हाडांच्या वेदनांमध्ये वाढ झाल्याने त्यांना काही पावले चालणेही कठीण असते. असे असूनही त्यांनी धार्मिक विधी पूर्ण झाल्यावर मंदिराच्यावर चढून कळसाचे भावपूर्ण दर्शन घेतले. यातून त्यांच्यातील तीव्र तळमळ आणि देवाप्रतीचा भाव अनुभवण्यास मिळाले.

परात्पर गुरु डॉक्टरांच्या कृपेने प.पू. दास महाराजांसारख्या संतश्रेष्ठांचा सहवास आणि त्यांची कृपा आम्हा साधकांना अनुभवण्यास मिळत आहे अन् त्यांच्यामुळे समष्टी कार्यातील अडथळेही दूर होत आहेत. यासाठी दोन्ही गुरुस्वरूप संतांच्या चरणी कोटीश: नमन !’

– कु. प्रियांका लोटलीकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक