गोव्यातील कोरोनाबाधितांची एकून संख्या १ सहस्र २५१, तर यांपैकी एकूण ५२४ रुग्ण बरे झाले

पणजी, २९ जून (वार्ता.) – गोव्यात २९ जूनला ५३ कोरोनाबाधित रुग्ण सापडले, तर ४६ रुग्ण बरे झाले. आतापर्यंतची एकूण कोरोनाबाधितांची संख्या १ सहस्र २५१ झाली आहे, तर सक्रीय रुग्ण ७२४ आहेत आणि ३ जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये परराज्यांतून रस्ता, रेल्वे यांद्वारे आलेले कोरोनाबाधित रुग्ण १०४ आहेत, तर मांगोर हिलमधील आणि त्याच्याशी निगडित रुग्ण ४८२ आहेत. २९ जूनला एकूण १ सहस्र ८३३ चाचण्या करण्यात आल्या. अजून ४१३ जणांचे अहवाल यायचे आहेत.

मोतीडोंगर येथे कोरोनाबाधित रुग्णांची संख्या १५ हून अधिक : ‘प्रतिबंधित क्षेत्र’ घोषित होण्याची शक्यता

मडगाव – येथील मोतीडोंगर येथे कोरोनाबाधित रुग्णांची संख्या २९ जून या दिवशी सकाळपर्यंत १५ हून अधिक होती. यामुळे मडगाव परिसरात भीतीचे वातावरण आहे. मोतीडोंगर हा भाग ‘प्रतिबंधित क्षेत्र’ (कंटेनमेंट झोन) घोषित करण्याची मागणी आता जोर धरत आहे. आरोग्यमंत्री विश्‍वजीत राणे म्हणाले, ‘‘मोतीडोेंगर येथे कोरोनासंबंधी अधिक संख्येने चाचण्या करण्यात येणार आहेत. मोतीडोंगर भागाला ‘प्रतिबंधित क्षेत्र’ (कंटेनमेंट झोन) घोषित करण्यासाठी आरोग्य खाते लवकरच एक बैठक घेणार आहे.’’

मोतीडोंगर येथे २७ जूनला एक ७५ वर्षीय वृद्ध कोरोनाबाधित आढळला होता. यानंतर घरातील ४ आणि त्यांच्या शेजारी रहाणारे ८ जण कोरोनाबाधित असल्याचे निष्पन्न झाले. या झोपडपट्टीत दाटीवाटीने घरे आहेत. मडगाव शहरातील बहुतेक घरांतील कामवाल्या, दुकाने आणि इतर व्यवसायातील कामगार अन् शहरात घरोन्घरी जाऊन कचरा गोळा करणारे पालिकेचे बहुतेक कामगार मोतीडोंगर भागातून येतात. या ठिकाणच्या कोरोनाच्या संक्रमणाला आळा न घातल्यास ते इतरत्र पसरू शकते, अशी नागरिकांमध्ये भीती आहे. झोपडपट्टीत जाणार्‍या तीनही वाटा पोलीस बंदोबस्त ठेवून बंद करण्यात आल्या आहेत आणि लोकांच्या चाचण्या केल्या जात आहेत. (लोकप्रतिनिधींनी ही अनधिकृत झोपडपट्टीच होऊ दिली नसती, तर मडगावमधील कोरोनाचे हे संकटच टळले असते. मतांसाठी अशा झोपडपट्ट्या होऊ दिल्या जातात आणि नंतर त्याचे दुष्परिणाम संपूर्ण समाजाला भोगावे लागतात ! – संपादक)

सांखळी येथे एकाच दिवशी सापडले कोरोनाबाधित १४ रुग्ण

सांखळी – सांखळी भागात एकाच दिवशी कोरोनाबाधित १४ रुग्ण सापडले आहेत. सांखळी रुग्णालयाचे अधिकारी उत्तम देसाई यांनी प्रसारमाध्यमांना दिलेल्या माहितीनुसार २९ जून या दिवशी देसाईनगर येथे ८, भंडारवाडा येथे ३, गृहनिर्माण आणि गावठण परिसर येथे १ आणि अन्य ठिकाणी १ मिळून एकूण १४ रुग्ण सापडले आहेत. यापूर्वी येथे ९ रुग्ण सापडले असून एकूण संख्या २३ झाली आहे. सांखळी बाजारपेठ गेले ४ दिवस बंद आहे.

सांखळी ‘प्रतिबंधित क्षेत्र’ घोषित करण्याचा विचार नाही ! – डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री

सांखळी मतदारसंघाचे नेतृत्व करणारे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी या परिसरात सर्व दक्षता घेण्याचे आदेश दिले आहेत. तसेच लोकांनी कारणाशिवाय घराबाहेर न पडणे, सुरक्षित अंतर पाळणे, मास्क घालणे आदी काळजी घेण्याची विनंती केली आहे. कोरोनाचा संसर्ग वाढू नये, यासाठी सांखळी येथे दळणवळण बंदी लागू करण्याची मागणी आता जोर धरत आहे. सांखळी ‘प्रतिबंधित क्षेत्र’ घोषित करण्याचा विचार नाही, असे मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी सांगितले.