सर्व रोगांचा नाश होऊन उत्तम आरोग्य लाभावे, यासाठी प्रार्थना करायला सांगणारे परात्पर गुरु डॉ. आठवले यांची दूरदृष्टी आणि सर्व साधकांवरील निरपेक्ष प्रेम !

आषाढ पौर्णिमा अर्थात ‘गुरुपौर्णिमा : ५ जुलै २०२०

सर्व रोगांचा नाश होऊन उत्तम आरोग्य लाभावे, यासाठी वर्ष २०१६ पासूनच प्रतिदिन देव, संत आदींना प्रार्थना करायला सांगणारे परात्पर गुरु डॉ. आठवले यांची दूरदृष्टी आणि सर्व साधकांवरील निरपेक्ष प्रेम !

‘मार्च २०२० पासून जगभर ‘कोरोना’ या विषाणूने थैमान घातले आहे. या विषाणूवर शास्त्रज्ञांना अद्याप एकही लस किंवा परिणामकारक औषध उपलब्ध करता आलेले नाही. त्यामुळे जगात अनेक लोक मृत्यूमुखी पडत आहेत. ही परिस्थिती ओढवण्यापूर्वीच, म्हणजे वर्ष २०१६ मध्ये ‘सनातन संस्थे’ चे संस्थापक परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी ‘सर्व रोगांचा नाश होऊन उत्तम आरोग्य लाभावे’, यासाठी ‘सर्व साधकांनी पुढील प्रार्थना प्रतिदिन सकाळी, तसेच मंदिर किंवा मठ येथे गेल्यावर आणि संतांच्या दर्शनासाठी गेल्यावर एकदा करावी अन् एरव्हीही करावी’, असे नियतकालिक ‘सनातन प्रभात’द्वारे सांगितले होते.

१. ‘देवा, माझ्यावर झालेल्या अनिष्ट शक्तींच्या आक्रमणांचा परिणाम समूळ नष्ट होऊ दे. माझ्या देहातील सर्व रोगांचा नाश होऊन मला उत्तम आरोग्य लाभू दे.

(एखाद्याला अनिष्ट शक्तींचा त्रास आणि एखादा रोग नसल्यास त्याने पुढील प्रार्थना करावी – ‘मला अनिष्ट शक्तींचा त्रास होऊ देऊ नकोस आणि माझे आरोग्य चांगले राहू दे.)

श्री. प्रणव मणेरीकर

२. साधकांचे त्रास दूर होऊ देत.’  

(‘संत किंवा गुरु हे त्रिकालज्ञ असतात आणि ईश्‍वरप्राप्तीसाठी प्रतिदिन साधना करणार्‍यांवर ते निरपेक्ष प्रेम करून काळानुसार मार्गदर्शनही करतात. परात्पर गुरु डॉक्टरांनी वर्ष २०१६ मध्ये सांगितलेली वरील प्रार्थना सनातनचे साधक आणि काही हिंदुत्वनिष्ठ, हे संतांचे मठ, मंदिरे आदी ठिकाणी अन् एरव्हीही प्रतिदिन भावपूर्ण करत आहेत. त्यामुळे सध्याच्या कठीण काळातही सनातनचे अनेक साधक आणि काही हिंदुत्वनिष्ठ यांचे आत्मबळ वाढून ते ईश्‍वरी कृपेची अनुभूती प्रतिदिन घेत आहेत. साहजिकच ‘कोरोना’ विषाणू आदी संकटे आल्यावर ते अस्वस्थ किंवा भयग्रस्त झाले नाहीत. द्रष्टे ऋषिमुनी, संत, भविष्यवेत्ते आणि शास्त्रज्ञ यांच्या सांगण्यानुसार आता आपत्काळ चालू झाल्याचे आपण सर्व जण अनुभवत आहोत. या उदाहरणावरून ‘देवावरील दृढ श्रद्धा आणि साधनाच कठीण काळाला सामोरे जाण्याचे बळ देते’, हे सिद्ध होते.’ – संकलक)

– श्री गुरुचरणी,

श्री. प्रणव मणेरीकर, बेळगाव (२०.३.२०२०)

परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी २०१६ मध्ये साधकांनी देवाला आणि संतांना प्रतिदिन करावयास सांगितलेल्या प्रार्थना

साधकांनी पुढील प्रार्थना प्रतिदिन सकाळी, तसेच मंदिर, मठ येथे गेल्यावर, संतांच्या दर्शनाला गेल्यावर एकदा करावी आणि एरव्हीही करावी.

१. ‘देवा, माझ्यावर झालेल्या अनिष्ट शक्तींच्या हल्ल्यांचा परिणाम समूळ नष्ट होऊ दे. माझ्या देहातील सर्व रोगांचा नाश होऊन मला उत्तम आरोग्य लाभू दे.

(एखाद्याला अनिष्ट शक्तींचा त्रास आणि एखादा रोग नसल्यास त्याने पुढील प्रार्थना करावी – ‘मला अनिष्ट शक्तींचा त्रास होऊ देऊ नकोस आणि माझे आरोग्य चांगले राहू दे.)

२. साधकांचे त्रास दूर होऊ देत.

३. माझी आणि साधकांची आध्यात्मिक उन्नती होऊ दे.

४. सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या कार्यांतील अडथळे दूर होऊन हिंदु राष्ट्राची स्थापना होऊ दे.’                

सदासर्वदा कृतज्ञ राहू त्यांच्या चरणी ।

‘परात्पर गुरु डॉक्टरांनी वर्ष २०१६ पासून सर्वांना करायला सांगितलेल्या प्रार्थना माझ्याकडून मधे मधे होत असतात. आज ह्या प्रार्थना करतांना गुरुकृपेने माझी आपोआप भावजागृती होऊन भावरूपी कृतज्ञता पुष्पांच्या रूपातील पुढील ओळी श्रीचरणी अर्पण झाल्या.

प्रीती हा स्थायीभाव ज्यांचा ।
त्यांच्या कृपेचे मोल नाही ॥ १ ॥

साधेपणा अन् वैराग्य ज्यांचे अंगी ।
त्यांचे देवपण ओळखणे कठीण आहे ॥ २ ॥

साधक भावावस्थेत रहाता ।
त्यातून मिळे आनंद त्यांना ॥ ३ ॥

अशा गुरुदेवांना निरंतर
भावपुष्प अर्पूनी ।
सदासर्वदा कृतज्ञ राहू त्यांच्या चरणी ॥ ४ ॥’

– श्री गुरुचरणी,

श्री. प्रणव मणेरीकर, (२०.३.२०२०)

• सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे  ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केेलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.

• आध्यात्मिक त्रास : याचा अर्थ व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने असणे. व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने ५० टक्के किंवा त्यांहून अधिक प्रमाणात असणे, म्हणजे तीव्र त्रास, नकारात्मक स्पंदने ३० ते ४९ टक्के असणे, म्हणजे मध्यम त्रास, तर ३० टक्क्यांहून अल्प असणे, म्हणजे मंद आध्यात्मिक त्रास असणे होय. आध्यात्मिक त्रास हा प्रारब्ध, पूर्वजांचे त्रास आदी आध्यात्मिक स्तरावरील कारणांमुळे होतो. आध्यात्मिक त्रासाचे निदान संत किंवा सूक्ष्म स्पंदने जाणू शकणारे साधक करू शकतात.

• येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक