म्हापसा येथील मंदिरे १५ जुलैपर्यंत बंद ठेवण्याचा देवस्थान समित्यांचा निर्णय

हिंदूंनो, देवस्थाने बंद असली, तरी मानसपूजा, मानस नमस्कार आदीद्वारे भगवंताशी अनुसंधान साधा, तसेच ‘भाव तेथे देव’ या उक्तीप्रमाणे अनुभूती घ्या !

म्हापसा, २९ जून (वार्ता.) – कोरोना महामारीच्या पार्श्‍वभूमीवर सर्व मंदिरे १५ जुलैपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय म्हापसा येथील देवस्थान समित्यांनी नुकत्याच एका संयुक्त बैठकीत घेतला. म्हापशासह राज्यातील बहुतांश मंदिर विश्‍वस्तांनी ३० जूनपर्यंत मंदिरे बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता; मात्र हल्ली म्हापसा येथे कोरोनाचे रुग्ण सापडू लागल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. या पार्श्‍वभूमीवर मंदिर समित्यांनी १५ जुलैपर्यंत मंदिरे बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

धार्मिक स्थळांसाठीच्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करणे अशक्य !

शासनाने धार्मिक स्थळे उघडण्यासंबंधी मार्गदर्शक तत्त्वे (एस्.ओ.पी.) प्रसिद्ध केली आहेत. यामध्ये मंदिरातील घंटा बंद करून ठेवणे, तीर्थप्रसादाचे वाटप न करणे, मंदिरात सॅनिटायझरची व्यवस्था करणे, थर्मल गनद्वारे भाविकांच्या शरिराचे तापमान तपासणे, १० वर्षांखालील मुले किंवा ६० वर्षांवरील वृद्ध भाविक यांना मंदिरात प्रवेश न देणे आदी नियमांचा अंतर्भाव आहे. या मार्गदर्शक तत्त्वांची कार्यवाही करणे मंदिर व्यवस्थापनाला शक्य होणार नाही.

मंदिर बंद असल्यामुळे ती आर्थिक संकटात आहेत, तरीही मंदिराचे व्यवस्थापन कर्मचारी आणि पुजारी यांना त्यांचे वेतन वेळेवर देत आहे. त्याचप्रमाणे वीज आणि पाणी देयक वेळच्या वेळी भरले जात आहे. या बैठकीला श्री महारुद्र संस्थानचे अध्यक्ष सोमनाथ नाटेकर, श्रीविठ्ठल-रखुमाई मंदिराचे तुषार टोपले, श्री सातेरी देवस्थानचे उल्हास बर्डे, संग्राम गणेश मंदिराचे एकनाथ शेटगावकर, श्री लक्ष्मीनारायण देवस्थानचे रामचंद्र कामत मळयेकर, श्री दत्तात्रय देवस्थानचे विवेक नाटेकर आदींची उपस्थिती होती. १५ जुलैनंतर श्रावणमासाला प्रारंभ होत आहे. या काळात मंदिरातून धार्मिक विधी होतात. या पार्श्‍वभूमीवर मंदिरे उघडण्यासंबंधीची पुढील बैठक ११ जुलै या दिवशी होणार आहे.

वळवई येथील श्री गजांतलक्ष्मी संस्थान भाविकांसाठी खुले

वळवई येथील प्रसिद्ध श्री गजांतलक्ष्मी संस्थान भाविकांसाठी हल्लीच उघडण्यात आले आहे. भाविकांना प्रवेश देतांना या ठिकाणी सॅनिटायझेशन करणे, सामाजिक अंतर पाळणे आदी आवश्यक काळजी घेतली जात आहे.

कोंब, मडगाव येथील श्रीविठ्ठल मंदिरातील आषाढी महाएकादशी उत्सव रहित

कोरोना महामारीमुळे कोंब, मडगाव येथील श्रीविठ्ठल मंदिरातील आषाढी महाएकादशी उत्सव रहित करण्यात आला आहे. आषाढी एकादशीच्या दिवशी सकाळी देवस्थान समितीच्या वतीने महाभिषेक, महापूजा, महाआरती आदी धार्मिक विधी ब्राह्मणाच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येणार आहे. या ठिकाणी परंपरेनुसार चालत आलेला भजनी सप्ताह रहित करण्यात आला आहे.