नगर येथे महापालिकेतील २ विभागांच्या वरिष्ठ अधिकार्‍यांविरुद्ध अल्पवयीन मुलाची तक्रार

नगर – महापालिकेतील २ विभागांच्या वरिष्ठ अधिकार्‍यांसह अन्य ३ ते ४ जण रात्री घरी येऊन मद्याची पार्टी करतात. धिंगाणा घालून मला मारहाण करतात अशी तक्रार एका परिचारिकेच्या अल्पवयीन मुलाने स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस निरीक्षकांकडे केली आहे. त्याच्या वडिलांचे निधन झाले आहे.

तक्रारदार मुलाने म्हटले आहे की, धिंगाणा घालू नका, असे सांगितल्यावर अधिकार्‍यांपैकी एकाने मला बूट फेकून मारत माझा गळा दाबण्याचा प्रयत्न केला. तसेच त्यांच्या समवेत असलेल्या २ जणांनी मला मारहाण करत जिवे मारण्याची मला धमकी दिली. मला गच्चीवरून खाली फेकून देण्याचा प्रयत्न करण्यात आला. दुसर्‍या दिवशी आजीसमेवत तक्रार देण्यासाठी गेलो असता पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवून घेतली नाही. तक्रारदार मुलगा अल्पवयीन असल्याने हे प्रकरण महिला-बालकल्याण समितीकडे सोपवण्यात आले आहे.