रत्नागिरी जिल्हा प्रशासनाने विन्हेरे घाट आणि रघुवीर घाट केले बंद

  • कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावावर दळणवळण बंदी कडक

  • जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या झाली ५८०  

  • घरडाची हाऊसिंग कॉलनी केली ‘सील’

रत्नागिरी – जिल्ह्यात १ ते ८ जुलै या कालावधीत दळणवळण बंदीची घोषणा झाल्यानंतर प्रशासनाकडून जिल्ह्याच्या सीमा बंद करण्याची तात्काळ कार्यवाही चालू झाली आहे. जिल्हा प्रशासनाने मुंबई-गोवा महामार्गावरील कशेडी घाटाला पर्याय असलेला विन्हेरे घाट वाहतुकीला बंद केला आहे. कशेडी घाट मात्र वाहतुकीस मोकळा रहाणार आहे. दोनच दिवसांपूर्वी खेड तालुक्यातील खोपी गावापासून ७ किलोमीटर अंतरावर असलेल्या रघुवीर घाटही पर्यटकांसाठी बंद करण्यात आला आहे. कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावावर कोणत्याही प्रकारे कोरोनाचा प्रसार होऊ नये, यासाठी काळजी घेण्याच्या दृष्टीने हे घाट बंद करण्यात आल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले.

रत्नागिरीत कोरोनाबाधितांची संख्या झाली ५८०  

जिल्ह्यात २९ जूनला २० नवीन कोरोनाबाधित रुग्ण सापडल्यामुळे कोरोनाबाधितांची एकूण संख्या ५८० झाली आहे. नवीन बाधितांमध्ये रत्नागिरी तालुक्यात ८, घरडा कॉलनी येथे ६, खेड तालुक्यात १ आणि चिपळूण तालुक्यात ५ रुग्ण सापडले आहेत. आतापर्यंत ४३० रुग्ण बरे झाले असून २५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात एकूण १२६ रुग्ण सक्रीय (अ‍ॅक्टिव्ह) आहेत.

घरडाची हाऊसिंग कॉलनी केली ‘सील’

लोटे येथील घरडा केमिकल कंपनीच्या वरिष्ठ अधिकार्‍यालाच कोरोनाची लागण झाल्याने घरडाची हाऊसिंग कॉलनी ‘सील’ करण्यात आली आहे. या अधिकार्‍याच्या थेट संपर्कात आलेल्या लोकांचे ‘स्वॅब’ घेण्यात येत आहेत.