कोरोनाबाधितांकडून भरमसाठ पैसे वसूल करणार्‍या खासगी रुग्णालयांवर कोणती कारवाई केली ?

खासदार शरद पवार यांची लोकप्रतिनिधींसह प्रशासकीय अधिकार्‍यांना विचारणा

 प्रशासकीय अधिकार्‍यांना असा प्रश्‍न का विचारावा लागतो ? अशा रुग्णालयांतील उत्तरदायींवर कारवाई होण्यासाठी अधिकारी आणि लोकप्रतिनिधी स्वतःहून कृती का करत नाहीत ?

पुणे – कोरोनाबाधितांकडून खासगी रुग्णालये भरमसाठ पैसे वसूल करत असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. याविषयी कोणती कारवाई केली ? या तक्रारींकडे गांभीर्याने पहात नाही का ?, असा प्रश्‍न राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष तथा खासदार शरद पवार यांनी उपस्थित असलेल्या लोकप्रतिनिधींसह उच्चपदस्थ अधिकार्‍यांना केला. कोरोनासारखी गंभीर परिस्थिती हाताळतांना वरिष्ठ अधिकार्‍यांमध्ये समन्वयाचा अभाव असल्याचे सांगून त्यांनी अप्रसन्नताही व्यक्त केली. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर विधानभवनात आयोजित केलेल्या आढावा बैठकीत पवार बोलत होते. या वेळी उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांनी अशा रुग्णालयांच्या विरुद्ध फौजदारी गुन्हे नोंद करण्याची सूचना महापालिका आयुक्तांना दिल्या,तर अशा प्रकरणांत दोषी असलेल्यांना धडा शिकवण्याचे आदेशही पवार यांनी पोलीस आयुक्तांना दिले. (केवळ गुन्हे नोंद करून खासगी रुग्णालयांच्या मनमानीपणाला चाप बसेल का ? या प्रकरणात उपमुख्यमंत्र्यांनी पहिल्यापासून कटाक्षाने लक्ष देऊन दोषींवर कठोर कारवाई करायला हवी होती, असे जनतेला वाटल्यास चूक ते काय ? – संपादक)

महापालिका, पोलीस आणि जिल्हा प्रशासन यांतील उच्चपदस्थ अधिकार्‍यांनी प्रतिदिन एकमेकांशी बोलले पाहिजे. उपाययोजनांतील त्रुटी काढून समन्वय वाढवला पाहिजे. प्रशासनाने सातत्याने लोकप्रतिनिधींना सद्य:स्थितीविषयी अवगत करणेही आवश्यक आहे, असे शरद पवार यांनी सांगितले. लोकप्रतिनिधींनी सूचना सांगतांना खासगी रुग्णालयांत खाट न मिळणे आणि उपचारांसाठी येणार्‍या व्ययाविषयी प्रश्‍न उपस्थित केले होते. या बैठकीपूर्वीही हीच सूत्रे उपस्थित झाली होती. याविषयी काही धोरण ठरवले आहे का ?, अशी विचारणा प्रशासकीय अधिकार्‍यांना केली. बैठका घेतल्या असतील, तर परिस्थिती का पालटली नाही, अशी थेट विचारणाही त्यांनी केली. (कोरोनाने भयंकर रूप धारण करून ३ मास उलटले आहेत. अनेकांचे मृत्यू होत असतांना, तसेच खासगी रुग्णालयांच्या विरोधातील तक्रारी येऊन अनेक दिवस उलटूनही समस्या सुटत नाही, यातून प्रशासनाची असंवेदनशीलताच दिसून येते. असे अधिकारी आपत्काळात कर्तव्य पार पाडण्यास सक्षम आहेत का ? त्यांच्यावर जनता निर्धास्तपणे अवलंबून राहू शकते का ?, हे प्रश्‍न उपस्थित होतात ! – संपादक)

अजित पवार म्हणाले की, आतापर्यंत ५ बैठका घेतल्या असून त्यात रुग्णालयांच्या विरोधातील तक्रारींविषयी चर्चा केली आहे. दायित्वशून्यपणा दाखवणार्‍या रुग्णालयांवर कारवाई करण्याच्या सूचनाही त्यांनी महापालिका आयुक्त शेखर गायकवाड आणि पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम् यांना दिल्या.