नावेली, मडगाव येथे सेंट झेवियर चॅपलजवळ १३ व्या शतकातील मंदिराचे अवशेष सापडले

प्रतीकात्मक छायाचित्र

मडगाव, २९ जून (वार्ता.) – नावेली येथे हमरस्ता रुंदीकरणाचे काम चालू असलेल्या ठिकाणी सेंट झेवियर चॅपलजवळ (छोट्या चर्चजवळ) १३ व्या किंवा १४ व्या शतकातील एका मंदिराचे अवशेष सापडले आहेत. पोर्तुगीज काळात मंदिरे पाडून त्या ठिकाणी चर्च उभारण्यात येत असे; मात्र पुरातत्व खात्याचे साहाय्यक अधीक्षक वरद सबनीस म्हणाले ‘‘नावेली येथील सेंट झेवियर चॅपल (छोटे चर्च) नव्याने बांधण्यात आल्याने हा प्रकार पोर्तुगीजकालीन आहे, असे मानता येणार नाही.’’

नावेली येथे हमरस्ता रुंदीकरणाचे काम चालू आहे; मात्र हे काम सध्या पावसामुळे बंद आहे. पुरातत्व खात्याचे साहाय्यक अधीक्षक वरद सबनीस म्हणाले,‘‘ नावेली येथे रस्ता रुंदीकरण करतांना एका जुन्या मंदिराचे अवशेष मिळाल्याची माहिती स्थानिकांनी खात्याला दिली. पुरातत्व खाते आणि भारतीय पुरातत्व सर्वेक्षण यांनी गत आठवड्यात या ठिकाणचे संयुक्तरित्या सर्वेक्षण केले. रस्ता खोदकाम चालू झाल्यानंतर या ठिकाणी मंदिराचे आणखी काही अवशेष मिळत असल्यास पाहिले जाणार आहे. रस्ता खोदकाम चालू असतांना देखरेख ठेवण्यास मुभा द्यावी, अशी पुरातत्व खाते सार्वजनिक बांधकाम खात्याकडे मागणी करणार आहे. हे अवशेष पुरातत्व खात्याच्या कार्यालयात किंवा राज्य संग्रहालय या ठिकाणी ठेवण्यात येणार आहेत.’’