साधनेच्या बळावर प्रतिकूल परिस्थितीतही स्थिर आणि परात्पर गुरुदेवांवर अपार श्रद्धा असणारे सनातनचे ५१ वे संत पू. जयराम कृष्णाजी जोशी (वय ८२ वर्षे) !

साधना शिकवून साधकांना जन्म-मृत्यूच्या फेर्‍यांतून मुक्त करणारी आणि संत बनवणारी सनातन संस्था

५ जुलै २०२० या दिवशी आषाढ पौर्णिमा अर्थात् गुरुपौर्णिमा आहे. गुरूंप्रती कृतज्ञता व्यक्त करणार्‍या या दिवशी गुरुतत्त्व सहस्रो पटींनी कार्यरत असते. या गुरुपौर्णिमेचा साधकांना अधिकाधिक लाभ व्हावा, या दृष्टीने गुरुकृपायोगाच्या माध्यमातून जलद आध्यात्मिक उन्नती करून संतपद आणि सद्गुरुपद गाठलेल्या सनातनच्या काही संतांविषयी लिखाण प्रकाशित करत आहोत.

या लेखमालेत आज ३० जून या दिवशी मिरज आश्रमातील सनातनचे ५१ वे संत पू. जयराम कृष्णाजी जोशी यांचा साधनाप्रवास पाहूया.

पू. जयराम जोशी

पू. जयराम जोशी (आबा) यांच्या विषयीचे सविस्तर लिखाण पुढे प्रकाशित होणार्‍या संतविषयक चरित्रांत दिलेले असेल.

या लेखातील लिखाण पूर्वीचे असल्याने संतांच्या नावाचा उल्लेख पूर्वीप्रमाणेच ठेवला आहे. – संपादक

पू. जयराम जोशी (आबा) यांचा परिचय

पूर्ण नाव : श्री. जयराम कृष्णाजी जोशी

वय : ८२ वर्षे

जन्मदिनांक : फाल्गुन पौर्णिमा (होळी पौर्णिमा) ८.३.१९३८

वाढदिवस : या वर्षी ९.३.२०२० या दिवशी झाला.

शिक्षण : ११ वी (जुनी मॅट्रीक)

साधनेला आरंभ : श्री. जयराम कृष्णाजी जोशी (आबा) वर्ष २००४ मध्ये कु. ऐश्‍वर्याला (नातीला) सांभाळण्यासाठी देवद येथील सनातनच्या आश्रमात दीड वर्ष होते. त्या वेळी आश्रमात स्वयंपाकघरात पुढाकार घेऊन सेवा केली. त्यानंतर ऑगस्ट २०१० नंतर रामनाथी आश्रमात पूर्णवेळ सेवेसाठी गेले. त्यानंतर मे २०११ मध्ये मिरज आश्रमात आले .

संतपदी विराजमान :  गुरुपौर्णिमा ३१.७.२०१५ या दिवशी संत झाले.

आतापर्यंत कोणते कार्य केले : मिरज आश्रमात आल्यानंतर स्वागतकक्ष, साप्तााहिक बांधणी आणि ‘पोस्टेज’ सेवा, ध्यानमंदिर पूजा आणि आश्रम सेवेत साहाय्य करणे या सेवा त्यांनी केल्या.

सध्या कोणते कार्य करत आहात ? : सध्या पू. आबा समष्टीसाठी नामजप आणि प्रार्थना करतात. तसेच साधकांना साधनेत मार्गदर्शन करतात.


बसलेले पू. जयराम कृष्णाजी जोशीआजोबा उभे असलेले डावीकडून  ६१ टक्के आध्यात्मिक पातळी असलेली नात कु. ऐश्‍वर्या जोशी, मुलगा श्री. योगेश जोशी आणि सून सौ. भाग्यश्री जोशी

 १. साधनाप्रवास

१ अ. बालपण

१ अ १. गाई आणि म्हशी यांचे दूध काढून घरोघरी दूध देऊन शाळेत जाणे : ‘माझ्या वडिलांचा दुधाचा व्यवसाय होता. मला वयाच्या आठव्या वर्षापासून पहाटे ४ वाजता गाई आणि म्हशी यांचे दूध काढणे, शेण काढणे अन् गोठा स्वच्छ करणे, यांसाठी उठावे लागत असे. मी घरोघरी दुधाचे रतीब पोचवण्यासाठी पायी जात असे. त्यानंतर मी गाई आणि म्हशी यांना नदीवर नेऊन पाणी पाजत असे. नंतर मी घरचे आवरून शाळेत जात होतो.

१ अ २. स्वयंपाक करायला शिकणे : लहान भावंडांना सांभाळून आणि आईला स्वयंपाकघरात साहाय्य करून मी शालेय शिक्षण घेतले. भावंडांत मी मोठा असल्याने आई रुग्णाइत असतांना मी स्वयंपाक करत असे. अशा प्रकारे देवाच्या कृपेने मी संपूर्ण स्वयंपाक शिकलो. मी देवरूख (जि. रत्नागिरी) येथे अकरावीपर्यंतचे शिक्षण घेतले.

१ अ ३. महाविद्यालयीन शिक्षण घेण्याएवढी घरची आर्थिक स्थिती नसल्याने मी वयाच्या २१ व्या वर्षी पुणे येथे नोकरीसाठी आलो.

१ आ. नोकरी आणि व्यवयाय

१ आ १. स्टेशनरीच्या दुकानात नोकरी करणे : वर्ष १९६० मध्ये मी पुण्यात आल्यावर स्टेशनरीच्या दुकानात नोकरी केली. त्या वेळी मावस बहिणीच्या घरी राहून मी दुकानात जात असे. पुण्यातील हुजूरपागा शाळेच्या इमारतीतच स्टेशनरी आणि होजिअरीचे दुकान असल्याने माझा पालक आणि त्यांचे पाल्य यांच्याशी संपर्क वाढला. त्यामुळे माझ्या ओळखी वाढल्या. दुकानाच्या वर रुग्णालय असल्याने तेथील रुग्णांच्या नातेवाइकांशी माझा संपर्क वाढला. पालक मुलींना देण्याचे साहित्य माझ्याकडे विश्‍वासाने देत असत.

१ इ. वैवाहिक जीवन

१ इ १. रहाण्यासाठी जागा नसल्याने पत्नीला गावी देवरूख येथे पाठवणे, नंतर सदाशिव पेठेत एक लहान खोली भाड्याने घेणे आणि एका गुरुजींचे दुकान चालवणे : वर्ष १९६४ मध्ये माझा विवाह झाला. आम्हाला रहाण्यासाठी खोली नसल्याने मी पत्नीला गावी देवरूख येथे पाठवले. त्यानंतर २ वर्षांनी एका ‘गॅरेज’मध्ये, पत्र्याच्या शेडमध्ये २ पातेली, २ पत्र्यांचे डबे आणि १ स्टोव्ह असे साहित्य गोळा करून आमचा संसार चालू झाला. आम्हाला ६ मासांनंतर गावात एक खोली मिळाली. तेथे आम्हा दोघांसह नोकरीसाठी आलेला माझा भाऊ रहात होता. भावाचा विवाह झाल्यावर रहात असलेली खोली भावाला देऊन आम्ही सदाशिव पेठेत ८ × १० फूट असणारी लहान खोली भाड्याने घेतली. वर्ष १९७२ मध्ये मालकाने दुकान विकले. त्याच वेळी एका गुरुजींनी त्यांचे जिन्याखाली ३ × ४ फूट असणार्‍या छोट्या जागेतील दुकान मला चालवायला दिले. ते मी २२ वर्षे चालवले.

१ ई. खानावळ चालू करणे

१ ई १. ‘ना नफा, ना तोटा’ हे ब्रीद ठेवून अल्प पैशांत मुलांना पोटभर जेवण देणे : वर्ष १९७८ मध्ये इतरांनी माझ्या पत्नीला जेवणाचे डबे देण्याचा आग्रह केल्याने तिने डबे देणे चालू केले. नंतर सकाळ-संध्याकाळ ४० जण आमच्या खानावळीत जेवत होते. आम्ही दोघे मिळून घरातील सर्व कामे, स्वयंपाक, धुणी-भांडी करत असू. घरातील सर्व कामे घरच्या घरी करून आणि काटकसर करून ‘ना नफा, ना हानी’ हे ब्रीद ठेवून अल्प पैशांत मुलांना पोटभर जेवण देत होतो.

१ ई २. ‘खानावळीत जेवणारी मुले आमचीच आहेत’, या भावाने स्वयंपाक केल्याने मुलांना घरी जावेसे न वाटणे : खानावळीतील मुलांना जेवण वाढतांना ‘ही आमचीच मुले आहेत’, असा भाव आम्ही ठेवत असू. लहान खोलीतही मुले मांडीला मांडी लावून जेवत असत. अधिकोषातील किंवा मोठ्या आस्थापनात उच्च पदावर कार्यरत असलेले अधिकारी खाली बसूनच जेवत. ते म्हणत, ‘‘मामी, तुम्ही प्रेमाने स्वयंपाक करता. तुमचा ‘माझी मुलेच जेवणार आहेत’, असा भाव असल्याने इथे लहान जागेत जेवूनही आम्हाला जे आंतरिक समाधान मिळते, ते बाहेर जेवतांना मिळत नाही.’’ आम्ही त्यांच्या आजारपणातील पथ्य-पाणीही सांभाळत असू. त्यामुळे कुणी आजारी पडले, तरी ते घरी जात नसत. सणासुदीला आम्ही तेवढ्याच पैशांत गोड-धोड करून त्यांना वाढायचो. त्यामुळे मुलांचे आई-वडील आणि नातेवाइक आम्हाला म्हणायचे, ‘‘तुमच्याकडे यायला लागल्यापासून आमच्या मुलांना घरीही यावेसे वाटत नाही.’’

अशा प्रकारे ३० वर्षे खानावळ चालवतांना गावोगावची मुले जेवून गेल्यामुळे देवाने आमच्यासाठी प्रत्येक गावात एक ओळखीचे घर निर्माण केले.

१ उ. सनातनच्या संपर्कात येण्यापूर्वी करत असलेली साधना

१ उ १. मी प्रतिदिन नित्यनेमाने मारुति आणि शंकर यांच्या देवळात जाऊन तेलवात करत असे. मी प्रतिदिन प.पू. गजानन महाराज यांच्या पोथीतील एक अध्याय वाचत होतो.

१ उ २. रात्री झोपण्यापूर्वी दत्ताच्या देवळात जाऊन आत्मनिवेदन करणे आणि झालेल्या चुकांसाठी क्षमायाचना करणे : मी रात्री झोपण्यापूर्वी दत्ताच्या देवळात जाऊन आत्मनिवेदन करत असे. मी ‘दिवसभरात काय घडले ?’, हे देवाला सांगून ‘देवाने माझी काळजी घेतली’, यासाठी कृतज्ञता व्यक्त करत असे. माझ्याकडून झालेल्या चुकांसाठी मी क्षमायाचना करत असे. कितीही पाऊस-पाणी असले, तरी मी हा नियम कधीच मोडला नाही.

१ ऊ. सनातनशी संपर्क

१ ऊ १. जावई साधना करत असल्याने मुलगी आणि मुलगा यांनी साधनेस आरंभ करणे, मुलाने सेवा चालू केल्यावर साधक घरी येऊ लागणे आणि ते खानावळीत जेवत असल्याने त्या माध्यमातून सेवा होणे : वर्ष १९९१ मध्ये माझी मुलगी कु. आरती हिचा विवाह श्री. प्रसाद म्हैसकर यांच्याशी झाला. ते सनातनच्या माध्यमातून साधना करत होते. नंतर माझी मुलगी आणि मुलगा श्री. योगेश हेही साधना करू लागले. वर्ष १९९७ पासून योगेशने पुण्यात सेवा चालू केली. साधक आमच्या घरी येऊ लागले, तसेच खानावळीत जेवूही लागले. आमचा व्यवसाय असल्याने आम्हाला सेवेसाठी बाहेर जाता येत नसेे; परंतु खानावळीच्या माध्यमातून देवाने आमची सेवा चालू केली. वर्ष १९९९ पासून आम्ही मुलाला पूर्णवेळ साधना करण्यासाठी ठाणे येथील सेवाकेंद्रात पाठवले.

१ ए. आतापर्यंत केलेल्या सेवा

१ ए १. नातीला सांभाळण्यासाठी देवद आश्रमात गेल्यावर स्वयंपाकघरात सेवा करणे : वर्ष २००४ मध्ये आमच्या पुण्यातील रहात्या जागेवर इमारतीचे बांधकाम होत होते. तेव्हा माझी नात (योगेशची मुलगी) चि. ऐश्‍वर्या ही ६ मासांची होती. तिला सांभाळण्यासाठी आम्ही देवद आश्रमात राहिलो. तेथे मला ऐश्‍वर्याला सांभाळून स्वयंपाकघरात सेवा करायला मिळाली. तेथेही मला देवाने साधकांच्या माध्यमातून भरपूर प्रेम दिले. मी देवाच्या कृपेने स्वयंपाकघरातील सेवाही केल्या.

१ ए २. पत्नीचे देहावसान झाल्यानंतर रामनाथी आश्रमात राहून सेवा करणे : वर्ष २००६ ते २०१० पर्यंत पुन्हा पुणे येथे राहून मी छोट्या प्रमाणात खानावळ चालवली. त्यानंतर माझ्या पत्नीचे देहावसान झाले. त्या वेळी माझा मुलगा योगेश रामनाथी आश्रमात सेवा करत असे. गुरुदेवांच्या कृपेमुळे जुलै २०१० पासून मला रामनाथी आश्रमात पू. पद्माकर होनपकाका आणि कै. आदगोंडा पाटीलकाका (डॉ. (कु.) माया पाटील यांचे वडील) यांच्या समवेत अर्पण पावती पुस्तकांची तपासणी करण्याची सेवा करण्याची संधी मिळाली.

१ ए ३. रामनाथी आश्रमात आल्यावर ९ मासांनी मार्च २०११ मध्ये माझी आध्यात्मिक पातळी ६१ टक्के झाल्याचे घोषित करणे

१ ए ४. मिरज आश्रमातील ध्यानमंदिरात देवपूजा आणि आरती करणे, स्वागतकक्षात सेवा करणे, आजारी पडल्यावर गुरुदेवांनी ‘प्रार्थना आणि नामजप करणे’, हीच आता तुमची साधना आहे’, असे सांगणे : त्यानंतर जुलै २०११ मध्ये मी मिरज आश्रमात आलो. तेथे मी सकाळी ध्यानमंदिरातील देवपूजा आणि आरती करत असे. मी स्वागतकक्षात ८ – ९ घंटे सेवा करत असे. त्यानंतर मी आजारी झाल्याने स्वागतकक्षात सेवा करू शकत नव्हतो. तेव्हा ‘माझ्याकडून काही सेवा होत नाही’, असे मला वाटत असे. तेव्हा गुरुदेवांनी मला सांगितले, ‘‘प्रार्थना आणि नामजप करणे’, हीच आता तुमची साधना आहे.’’

२. जुलै २०१५ मध्ये गुरुपौर्णिमेच्या दिवशी गुरुदेवांनी मला संतपदी विराजमान केले.

– (पू.) श्री. जयराम जोशी, सनातन आश्रम, मिरज.

३. पू. जोशीआजोबा यांच्याकडून साधकांना शिकायला मिळालेली सूत्रे

३ अ. पू. जोशीआजोबांनी स्वकौतुक आणि कर्तेपणा देवाच्या चरणी अर्पण करायला सांगितल्यावर कु. अमृता मुद्गल हिचे झालेले चिंतन !

३ अ १. दैनिकात प्रसिद्ध झालेल्या अनुभूतींविषयी साधकांनी कौतुक केल्यावर अहं वाढू नये, यासाठी पू. जोशीआजोबांनी स्वतः साधिकेला भ्रमणभाष करणे : ‘वर्ष २०१५ च्या दिवाळीमध्ये सलग २ – ३ दिवस दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये माझ्या काही अनुभूती प्रसिद्ध झाल्या. त्या वेळी साधक माझे कौतुक करत होते. तेव्हा मला त्याविषयी काही वाटत नव्हते. ३ – ४ दिवसांनी पू. आजोबांनी मला भ्रमणभाष केला. त्या वेळी आमच्यामध्ये पुढील संवाद झाला.

पू. आजोबा : मी जे सांगत आहे, ते लक्ष देऊन ऐक. हे तुझ्या साधनेसाठी अत्यंत महत्त्वाचे आहे.

पू. आजोबा : २ – ३ दिवस दैनिकात तुझ्या छान छान अनुभूती आल्या आणि साधकांनी तुझे कौतुक केले ना ?

मी : हो.

पू. आजोबा : ते कौतुक देवाचरणी अर्पण कर. स्वकौतुक, कर्तेपणा सर्वकाही देवाच्या चरणी अर्पण कर. तुझ्याकडे काहीच ठेवू नकोस. सतत शरण जा. नकळत आपला अहं वाढू शकतो; म्हणून सतत देवाला सांग, ‘मला काहीच येत नाही, सर्वकाही तूच केले आहेस. भगवंता, मी तुला शरण आले आहे.’ म्हणजे तुझा अहं वाढणार नाही. आता मी जे काही सांगितले, ते मी नव्हे, तर देवानेच सांगितले आहे, हे लक्षात ठेव !

हे सर्व ऐकून मला अंतर्मनातून पुष्कळ कृतज्ञता वाटली, ‘माझा अहं वाढू नये; म्हणून देवाला किती काळजी ! देव संतांच्या माध्यमातून मला जाणीव करून देत आहे.’

३ अ २. पू. जोशीआजोबांनी स्वकौतुक देवाच्या चरणी अर्पण करण्याचे महत्त्व सांगणे : एकदा पू. आजोबा रामनाथी आश्रमात आले होते. त्या रात्री माझी त्यांच्याशी भेट झाली आणि त्यांनी मला खाऊ दिला. तेव्हा ते मला म्हणाले, ‘‘साधनेत आपण निरपेक्षता स्वीकारावी अन् सर्व कर्तेपणा, स्वकौतुक देवाच्या चरणी अर्पण करावे. मग साधनेत लवकर प्रगती होते. देवाने आतापर्यंत जे दिले आहे, त्यासाठी कृतज्ञता वाटून आपण निरपेक्षपणे साधना करायला पाहिजे.’’

पू. जोशीआजोबांचा देवाप्रती पुष्कळ भाव आहे. ते स्वतः सदैव आनंदी असतात आणि इतरांनाही आनंद देतात. असे आहेत आमचे लाडके पू. जोशीआजोबा !

– कु. अमृता मुद्गल (वय १२ वर्षे), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२६.३.२०१६)

३ आ. पू. जयराम जोशीआजोबांचे वयस्कर साधकांना मौल्यवान अन् प्रेमळ मार्गदर्शन

‘ पू. जोशीकाका आणि पू. होनपकाका यांनी वयस्कर साधकांना मार्गदर्शन केले.

१. दिलेली सेवा मनापासून करायला पाहिजे.

२. कर्तेपणा नको आणि कौतुकाचीही अपेक्षा नको.

३. आपणा सर्वांना वयोमानाप्रमाणे त्रास आहेत; पण आपल्याला लढायचे आहे. त्रासाकडे दुर्लक्ष करून सेवा करता आली पाहिजे. त्यासाठी प.पू. डॉक्टरच आपल्याला शक्ती देणार आहेत. नेहमी सकारात्मक रहा.

४. प.पू. डॉक्टरांचा कटाक्ष असतो की, माझ्या साधकांना त्रास होता कामा नये.

५. प्रगतीची अपेक्षा नको. प्रत्येकाची किती सेवा होते, ते त्यांना सर्व कळते. प.पू. डॉक्टरांनी कोणालाही सेवेचे बंधन घातलेले नाही. आपल्याला साधना नीट करायची आहे.

६. अधिकाधिक नामजप, प्रार्थना आणि कृतज्ञता यांकडे लक्ष द्या आणि शरणागतभाव वाढवा.

७. प्रेमभाव वाढवा. सद्गुरु (सौ.) बिंदाताई भ्रमणभाषवर बोलत असतांना साधक दिसले, तरी त्या त्यांच्याकडे बघून स्मितहास्य करतात.

पू. जोशीआजोबांनी त्यांच्या जीवनातील वेगवेगळे प्रसंग सांगून प.पू. डॉक्टरांनी त्यांना त्या प्रसंगातून कसे वाचवले, ते सांगितले. एकूणच सत्संगाचे स्वरूप एकदम जिव्हाळ्याचे होते आणि सगळ्यांना त्यातून पुष्कळ आनंद मिळाला. या दोन्ही संतांचे मार्गदर्शन मिळाल्यामुळे प.पू. डॉक्टरांच्या चरणी नमस्कार !’

– श्री. प्रकाश मराठे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१.११.२०१६)

४. साधकांना पू. जयराम जोशीआजोबा यांची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये

४ अ. शारीरिक त्रासातही आनंदी असणे : ‘पू. आबांचा शारीरिक त्रासामुळे तोल जातो. त्यांना धरून उभे रहायला लागते, तरी याही स्थितीत ते आनंदी असतात.

४ आ. वेळेचे पालन करणे

१. पू. आबा ७ मासांपासून (महिन्यांपासून) आश्रमातील साधकांसाठी प्रतिदिन नामजप करतात. पू. आबा साधकांसमवेत नामजप करण्यासाठी नेहमीच वेळेच्या आधी येतात. ‘आपल्यामुळे साधकांचा वेळ जाऊ नये’, असे त्यांना वाटते.

२. वैद्यकीय तपासणीसाठी बाहेर जायचे असले, तरी ते वेळेआधी ५ मिनिटे येतात.’

– वर्षा नकाते

४ इ. संत असूनही वेगळेपण न जपणे

१. ‘पू. आबा म्हणतात, ‘‘मला स्वतंत्र वेगळी खोली नको. मला साधकांसमवेत रहायचे आहे.’’

२. पू. आबांना भेटण्यासाठी किंवा त्यांच्याशी बोलण्यासाठी वेळ मागावी लागत नाही, तसेच त्यांच्या खोलीत जाण्यासाठी अनुमती घ्यावी लागत नाही. साधक सेवा करत असलेल्या ठिकाणी येऊन ते सर्वांशी स्वतःहून बोलतात. ते प्रसारसेवा करणार्‍या साधकांना विश्रांतीच्या वेळेतही भेटतात.’

– सौ. स्मिता कानडे, मिरज (३.३.२०१७)

४ ई. प्रेमपूर्वक बोलण्याने सर्वांशी पहिल्याच भेटीत जवळीक साधणे : ‘पू. आबांचे बोलणे ऐकतच रहावेसे वाटते. त्यांच्यातील प्रीतीमुळे त्यांच्या सहवासातील प्रत्येक जण त्यांच्याशी जोडला जातो. जिल्ह्यातून सेवेसाठी आश्रमात येणारे साधकही ‘पू. आबांशी बोलायला मिळेल’, या आशेने येतात आणि वेळातील वेळ काढून त्यांच्याशी मनातले सगळे बोलतात. त्यांचे मधुर बोलणे अंतःकरणात जाऊन हृदयाला भिडते. त्यामुळे मन सकारात्मक होते. पुन्हा उत्साहाने आणि आनंदाने साधना अन् सेवारत होता येते. त्यांची नात कु. ऐश्‍वर्या हिच्या शाळेतील शिपायापासून ते मिरजेतील आधुनिक वैद्य आणि सांगली जिल्ह्यातील अनेक साधक यांच्याशीसुद्धा पू. आबांची पहिल्याच भेटीत जवळीक होते.’

– श्री. नितीन पांडे, कु. मेधा सहस्रबुद्धे आणि सौ. अंजली जोशी

४ उ. मिरज आश्रमाचा आधारस्तंभ असलेले पू. जयराम जोशीआजोबा ! : ‘पू. जोशीआजोबा (आबा) हे मिरज आश्रमाचा आधारस्तंभ आहेत. ते साधकांना साधनेसाठी साहाय्य करतात. ते प्रत्येक साधकावर भरभरून प्रेम करतात. त्यांच्या डोळ्यांत पाहिले की, प.पू. डॉक्टरांची आठवण होते. त्यांना आपल्या मनातील विचार मोकळेपणाने सांगता येतात. केवळ मिरज आश्रमातील साधकांनाच नाही, तर प्रसारातील साधक आणि इतर आश्रमांतील साधकही पू. आबांशी तेवढ्याच मोकळेपणे बोलतात अन् त्यांना आपल्या अडचणी मोकळेपणे सांगतात.’

– वर्षा नकाते, सौ. अंजली जोशी आणि श्री. विवेक सावंत

५. पू. आबा यांच्यामधील दैवी पालट 

५ अ. ‘त्यांचे केस काळे होऊ लागले आहेत, तसेच पांढरे केस चमकदार झाले आहेत.

५ आ. त्वचा गुलाबी आणि चमकदार : तोंडवळ्यावरील त्वचा गुलाबी आणि चमकदार झाली आहे. एकदा बाहेरचे एक संत आले असतांना त्यांनी सांगितले, ‘‘यांच्या तोंडवळ्यावरूनच यांच्यातील चैतन्याची प्रचीती येत आहे. इतरांना तोंडवळ्यावर क्रीम लावावे लागते, तर यांची कांती चैतन्यामुळे चमकत आहे.’’ त्यांच्या हातापायांची त्वचाही लालसर असून त्यावर वेगळीच चमक जाणवते.

५ इ. पायांच्या शिरांवरील ‘ॐ’ : पू. आबांच्या पायांच्या शिरांवरील ‘ॐ’ कडे पाहिल्यावर ‘त्यातून चैतन्याचा स्रोत येत असून आपल्यावरील आवरण न्यून होत आहे’, असे जाणवते.

५ ई. त्यांच्या डोळ्यांमध्ये प्रेम आणि शरणागतभाव जाणवतो.

५ उ. पूर्वी त्यांना चष्मा घातला नसतांना परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे छायाचित्र दिसत नसे; परंतु आता चष्मा नसतांनाही ते स्पष्ट दिसते.

५ ऊ. त्यांचे शरीर आणि तोंडवळा यांच्याभोवती प्रभावळ दिसते, तसेच त्यांचा देह अन् कपडे यांना वेगळ्याच प्रकारचा सुगंध येतो.

पू. आबांचे हास्य पाहून आनंद मिळून उत्साह वाढतो, मनाची निराशा आणि मरगळ निघून जाते. या वेळी ते लहान बालकाप्रमाणे जाणवतात.’

– सौ. भाग्यश्री योगेश जोशी (सून) (२३.२.२०१८)


पू. जोशीआजोबांनी अनुभवलेली परात्पर गुरुदेवांची अवर्णनीय प्रीती आणि महानता !

अ. सर्वार्थाने मोठे असूनही अतिशय लहान होऊन नम्रतेने वागणारे ज्ञानवृद्ध आणि तपोवृद्ध असलेले परात्पर गुरुदेव ! : ‘मी रामनाथी आश्रमात गेलो त्या वेळी गुरुदेवांनी मला अतिशय उत्साहाने त्यांच्या खोलीत झालेले सर्व पालट दाखवले. त्यांनी माझी पुष्कळ आपुलकीने चौकशी केली. तेव्हा मला वाटले, ‘परात्पर गुरुदेव कुठे आणि मी कुठे ? मी वयाने मोठा असलो, तरी ते माझ्यापेक्षा कित्येक पटींनी ज्ञानवृद्ध आणि तपोवृद्ध आहेत, तरीही ते लहान होऊन नम्रतेने वागतात. यावरून त्यांची महानता लक्षात येते. त्यांनी मला पुष्कळ प्रेम दिले. केवळ परात्पर गुरुदेवच हे सर्व करू शकतात.

आ. हृदयविकाराचा झटका येऊन गेलेल्या मुलाची काळजी घेऊन आणि त्याच्याकडून आनंदाने सेवा करवून घेणारे प्रीतीवत्सल परात्पर गुरुदेव ! : माझा मुलगा श्री. योगेश मिरज आश्रमात सेवा करतो. त्याला हृदयविकाराचा त्रास आहे. त्याला हृदयविकाराचा झटका आल्याने त्याची ‘अँजिओप्लास्टी’ करावी लागली होती, तरीही तो आनंदाने सेवा करत असतो. त्याला सेवेसाठी जिन्यांवरून सतत वर-खाली करावे लागते; परंतु सेवा करतांना त्याला त्याची जाणीवही नसते. तो सूक्ष्मातून परात्पर गुरुदेवांकडे शक्ती मागून घेऊन झोकून देऊन सेवा करत असतो. एकदा आधुनिक वैद्यांनी त्याची पडताळणी केल्यावर त्याला सांगितले, ‘‘तुम्ही जिन्यावर चढउतार करता; म्हणूनच तुम्ही व्यवस्थित आहात.’’ तेव्हा ‘देवच (परात्पर गुरुदेव) सेवेची संधीही देतो, त्यासाठी शक्ती तोच देतो आणि काळजीही तोच घेतो’, याची आम्हाला अनुभूती आली. केवढी ही त्यांची साधकांवर प्रीती !

इ. ६१ टक्के आध्यात्मिक पातळी असलेल्या नातीची (कु. ऐश्‍वर्या जोशी हिची) शालेय आणि आध्यात्मिक उन्नती करून घेणारे महान परात्पर गुरुदेव ! : माझी नात कु. ऐश्‍वर्या ही शालेय आणि शाळाबाह्य इतर परीक्षा यांमध्ये चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होते. ‘शाळेतही देवच तिच्यासमवेत आहे आणि तिचे रक्षण करत आहे’, याची आम्हाला अनुभूती येते. ‘परात्पर गुरुदेवांच्या कृपेमुळेच तिची शालेय आणि आध्यात्मिक प्रगती होत असून तेच तिचा सांभाळ करत आहेत’, असे जाणवते.

ई. रुग्णाईत अवस्थेतही सुनेला भावावस्थेत आणि आनंदी ठेवणारे कृपाळू परात्पर गुरुदेव ! : माझी सून सौ. भाग्यश्री ही गेल्या काही वर्षांपासून रुग्णाईत आहे. तिला थोडा आध्यात्मिक त्रासही आहे. इतर साधकांची प्रगती झाल्यावर तिला पुष्कळ आनंद होतो. तेव्हा ‘आपली प्रगती का होत नाही ?’ असे तिला वाटत नाही. ‘पातळी नसली, तरी चालेल. मला केवळ गुरुचरण हवेत’, असा तिचा भाव असतो. ती नेहमी आनंदी असते. हे सर्व काही गुरुदेवांच्या कृपेमुळेच घडत आहे. तेच तिच्या रुग्णाईत अवस्थेतही तिला भावावस्थेत ठेवत आहेत. यामुळे तीही सतत कृतज्ञ असते.’

– (पू.) श्री. जयराम जोशी, सनातन आश्रम, मिरज.


• सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे  ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.

• आध्यात्मिक त्रास : याचा अर्थ व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने असणे. व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने ५० टक्के किंवा त्यांहून अधिक प्रमाणात असणे, म्हणजे तीव्र त्रास, नकारात्मक स्पंदने ३० ते ४९ टक्के असणे, म्हणजे मध्यम त्रास, तर ३० टक्क्यांहून अल्प असणे, म्हणजे मंद आध्यात्मिक त्रास असणे होय. आध्यात्मिक त्रास हा प्रारब्ध, पूर्वजांचे त्रास आदी आध्यात्मिक स्तरावरील कारणांमुळे होतो. आध्यात्मिक त्रासाचे निदान संत किंवा सूक्ष्म स्पंदने जाणू शकणारे साधक करू शकतात.

• येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक