पाकच्या कराची येथील ‘स्टॉक एक्सचेंज’वर ‘बलुचिस्तान लिबरेशन आर्मी’चे आक्रमण

५ पोलीस आणि ४ आक्रमणकर्ते ठार

कराची (पाकिस्तान) – येथील ‘स्टॉक एक्सचेंज’वर (‘शेअर बाजारा’वर) ‘बलुचिस्तान लिबरेशन आर्मी’च्या सैनिकांनी केलेल्या आक्रमणात एका पोलीस उपनिरीक्षकासह ५ सुरक्षारक्षक ठार झाले, तर आक्रमण करणारे ४ बलुची सैनिक ठार झाले. पाकने याला ‘आतंकवादी आक्रमण’ म्हटले आहे. या आक्रमणानंतर ‘बलुचिस्तान लिबरेशन आर्मी’ने या आक्रमणाचे दायित्व स्वीकारले आहे. पाकच्या बलुचिस्तानमध्ये स्वातंत्र्यासाठी संघर्ष करणार्‍या बलुची लोकांची ही सशस्त्र संघटना आहे. पाककडून बलुची लोकांवर करण्यात येणार्‍या अत्याचारांना या संघटनेकडून विरोध केला जातो.

बलुची सैनिकांनी ‘स्टॉक एक्सचेंज’च्या मुख्य प्रवेशद्वारावर ‘ग्रेनेड’द्वारे आक्रमण केले आणि नंतर गोळीबार करत इमारतीमध्ये प्रवेश केला. या वेळी येथे सुरक्षेसाठी तैनात असलेले पोलीस आणि सुरक्षारक्षक घायाळ झाले. त्यांना रुग्णालयात नेल्यावर त्यांचा मृत्यू झाला. आक्रमणाच्या वेळी इमारतीत अडकलेल्या लोकांना मागील दाराने बाहेर काढण्यात आले. आक्रमण करणार्‍या चारही सैनिकांना पोलिसांनी चकमकीत ठार केले. सध्या हा परिसर सुरक्षेच्या कारणामुळे ‘सील’ करण्यात आला आहे.