घातक पथकातील २३ वर्षीय हुतात्मा सैनिक गुरतेज सिंह यांनी केले होते १२ चिनी सैनिकांना ठार

भारत-चीन सैनिकांतील १५ जूनची धुमश्‍चक्री

हुतात्मा सैनिक गुरतेज सिंह

नवी देहली – पूर्व लडाखच्या गलवान खोर्‍यात १५ जूनच्या रात्री झालेल्या भारत आणि चीन यांच्या सैनिकांमधील धुमश्‍चक्रीच्या संदर्भात माहिती आता हळूहळू समोर येत आहे. त्यात २३ वर्षीही हुतात्मा सैनिक गुरतेज सिंह यांनी केलेला पराक्रम समोर आला आहे. येथे संघर्ष चालू झालेल्या सैन्याच्या ‘थर्ड पंजाब घातक पथका’ला बोलावण्यात आले होते. यातील सैनिकांनी त्यांच्याकडील पारंपरिक कृपाण, लाठ्या आणि धारदार चाकू आदी हत्यार्‍यांद्वारे चिनी सैनिकांवर आक्रमण केले. त्यात गुरतेज यांचाही समावेश होता. त्यांनी या धुमश्‍चक्रीत १२ चिनी सैनिकांना ठार केले. या धुमश्‍चक्रीत त्यांनाही वीरमरण आले.

(सौजन्य : IndiaTV )

घातक पथक येथे पोचल्यावर गुरतेज यांना चीनच्या ४ सैनिकांनी घेरले. ते पाहून गुरतेज यांनी त्यांच्यावर आक्रमण करून दोघांना ठार केले. या चकमकीत गुरतेज यांनी चिनी सैनिकांना दरीत ढकलून दिले. स्वतः गुरतेजही तोल जाऊन दरीत पडले; मात्र एका दगडामुळे ते अडकले. त्यांच्या डोक्याला मार लागला. त्या स्थितीत ते पुन्हा वर आले आणि कृपाण घेऊन चिनी सैन्यावर तुटून पडले. एका चिनी सैनिकाकडून एक धारदार हत्यार हिसकावत चिन्यांवर वार करण्यास चालू केले. यात ७ चिनी सैनिक ठार झाले. त्यात गुरतेज यांच्यावरही चिन्यांकडून वार करण्यात आल्याने ते गंभीररित्या घायाळ झाले. त्या स्थितीतही त्यांनी एका चिनी सैनिकाला ठार करून त्यानंतरच देह ठेवला.