‘नेटफ्लिक्स’वरील तेलुगु चित्रपटातून भगवान श्रीकृष्णाचा अवमान

  • धर्मप्रेमींकडून ट्विटर ‘#BoycottNetflix’ या ‘ट्रेंड’द्वारे विरोध

  • राष्ट्रीय ‘ट्रेंड’मध्ये हा ‘ट्रेंड’ तिसर्‍या स्थानी

अशा प्रकारचा अवमान जर अन्य धर्मियांच्या श्रद्धास्थानांच्या संदर्भात झाला असता, तर त्यांनी लोकशाही मार्गाने नव्हे, तर हिंसाचार करून विरोध केला असता आणि मग पोलीस, प्रशासन यांनी त्याची त्वरित नोंद घेऊन अवमानाचा भाग वगळला असता ! हिंदू असे काही करत नाहीत, त्यामुळे त्यांच्या विरोधाकडे नेहमीच दुर्लक्ष केले जाते. ‘हिंदूंनीही कायदा हातात घ्यावा’, असे पोलीस आणि प्रशासन यांना वाटते का ?

साभार : अरे

नवी देहली – देशात दळणवळण बंदी असल्यामुळे चित्रपटगृहे बंद आहेत. त्यामुळे आता ‘नेटफ्लिक्स’ या ‘ऑनलाईन’ कार्यक्रम प्रसारित करणार्‍या संकेतस्थळावर चित्रपट प्रदर्शित केले जात आहेत. नुकताच येथे प्रदर्शित करणार्‍यात आलेला ‘कृष्णा अँड हिज लीला’ या तेलुगु चित्रपटातून भगवान श्रीकृष्णाचा अवमान करण्यात आल्याने त्यास विरोधात ट्विटरवरून विरोध केला जात आहे. धार्मिक भावना दुखावल्यावरून धर्मप्रेमी हिंदूंनी या विरोधात ‘#BoycottNetflix’ हा ‘हॅशटॅग’ चालू करून ट्वीट केले. या ‘हॅशटॅग’द्वारे सहस्रो धर्मप्रेमींनी ट्वीट करत या चित्रपटाला विरोध केला. हा ‘ट्रेंड’ राष्ट्रीय स्तरावर काही काळ तिसर्‍या क्रमांकावर होता.

‘या चित्रपटामध्ये हिंदु धर्मातील देवांची नावे प्रमुख भूमिका साकारणार्‍यांना देऊन निर्मात्यांनी हिंदु धर्माचा अपमान केला आहे. या चित्रपटावर ‘नेटफ्लिक्स’ने बंदी आणावी आणि हिंदूंची क्षमा मागावी’, अशी मागणी या ‘ट्रेंड’द्वारे करण्यात आली.

चित्रपटातून भगवान कृष्णाचा होणारा अवमान

या चित्रपटामधील मुख्य भूमिका साकारणार्‍याचे नाव ‘कृष्णा’ दाखवण्यात आले असून त्याच्या भोवती चित्रपटाची कथा फिरते. कृष्णाचे अनेक मुलींसमवेत प्रेमसंबंध असल्याचे दाखवण्यात आले आहे. यांपैकी एका मुलीचे नाव ‘राधा’ असल्याचे दाखवण्यात आले आहे. अनेक मुलींसमवेत कृष्णाचे शारीरिकसंबंध असल्याचेही चित्रपटात दाखवण्यात आले आहे. यावरून हिंदूंकडून याला विरोध होत आहे.