रत्नागिरी जिल्ह्यात १ ते ८ जुलै या कालावधीत कडक दळणवळण बंदी ! – मंत्री उदय सामंत

रत्नागिरी – जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढू लागल्याने पुन्हा एकदा १ ते ८ जुलै या कालावधीत कडक दळणवळण बंदी (लॉकडाऊन) करण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे, अशी माहिती उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी ‘ऑनलाईन’ पत्रकार परिषदेत दिली.

मंत्री उदय सामंत म्हणाले,

१. सध्या कोरोनाचे सक्रीय (अ‍ॅक्टिव्ह) ११७ रुग्ण असून ती संख्या शून्यावर आणण्यासाठी आणि कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यपातळीवर सर्व संबंधितांशी चर्चा करून हा निर्णय घेण्यात आला आहे.

२. रत्नागिरी शहरासह दापोली तालुक्यातील दोन गावांत कोरोना रुग्णांचा कोणताही इतिहास नसल्याने जिल्ह्यात सामाजिक संसर्ग (कम्युनिटी स्प्रेड) होण्याची शक्यता आहे. त्याविषयी चौकशी चालू आहे; परंतु सावधानता म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे.

३. आठ दिवसांनंतर पुन्हा एकदा परिस्थिती पाहून दळणवळण बंदी शिथील करण्याविषयी निर्णय घेण्यात येईल. नागरिकांच्या आरोग्यासाठी नाईलाजाने हा निर्णय घेण्यात आला आहे.

४. रत्नागिरी जिल्ह्यातील मृत्यूंची संख्या वाढत आहे. त्यामुळे आता ‘टास्क फोर्स’चीही  स्थापना करण्यात येत असून मुंबई आणि पुण्यात असलेले ‘प्लाझ्मा थेरेपी’ आता रत्नागिरीतही चालू करण्यात येणार असून त्याद्वारे कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार केले जाणार आहेत. यासाठी डॉक्टरांना प्रशिक्षणसुद्धा देण्यात आले आहे.

नागरिकांच्या हिताच्या दृष्टीने दळणवळण बंदीचा निर्णय ! – जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा

‘ऑपरेशन ब्रेक द चेन’ विषयी बोलतांना जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी सांगितले की, ‘नागरिकांच्या हिताच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आला आहे. १ ते ८ जुलै या कालावधीत सकाळी ९ ते सायंकाळी ५ पर्यंत कडक दळणवळण बंदी रहाणार आहे. या वेळेत अत्यावश्यक सेवा वगळता, इतर कुणालाही घराबाहेर पडता येणार नाही. जिल्ह्यात प्रवेशबंदी करण्यात येणार असून जिल्ह्याच्या सीमा पूर्णपणे बंद रहाणार आहेत. या काळात संपूर्ण दुकाने, चारचाकी वाहने, दुचाकी वाहने, रिक्शा आदींना पूर्ण बंदी घालण्यात आली आहे. केवळ अत्यावश्यक सेवेतील दुकाने, दवाखाने, पशूवैद्यकीय दवाखाने आणि अन्य अत्यावश्यक गोष्टी चालू  रहातील. या काळात खासगी कार्यालयेही पूर्णपणे बंद रहाणार असून शासकीय कार्यालयात केवळ १० टक्के कर्मचार्‍यांची उपस्थिती रहाणार आहे. बँका आणि टपाल (पोस्ट) सेवा चालू रहाणार आहेत. तसेच कृषी संबंधीची दुकाने चालू रहाणार आहेत.’’