आषाढी वारीनिमित्त एस्.टी. किंवा वाहन यांद्वारे संतांच्या पादुका नेण्यासाठी शासनाची अनुमती

पिंपरी (जिल्हा पुणे) – कोरोनामुळे यंदा पायी पालखी सोहळा रहित करण्यात आला असल्याने आषाढी वारीची परंपरा चालू ठेवण्यासाठी काही संतांच्या पादुका पंढरपूर येथे श्री विठ्ठल-रुक्मिणी यांच्या भेटीसाठी नेण्यात येणार आहेत. या संतांच्या पादुका एस्.टी. किंवा वाहन यांद्वारे ३० जून या दिवशी पंढरपूर येथे नेण्यासाठी शासनाने अनुमती दिली आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यातून संत ज्ञानेश्‍वर महाराज संस्थान, संत तुकाराम महाराज संस्थान, संत सोपानदेव महाराज संस्थान आणि संत चांगवटेश्‍वर देवस्थान येथून संतांच्या पादुका नेता येणार आहेत.

पालखी सोहळा झाल्यानंतर पादुका प्रस्थानाच्या ठिकाणी सुरक्षित येण्याचे नियोजन करण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार ‘इन्सिडंट कमांडर’ म्हणून नेमणुका करण्यात आल्या आहेत. पादुका प्रस्थान झाल्यापासून पंढरपूरपर्यंत आणि पंढरपूर येथून पुन्हा प्रस्थानस्थळी सुरक्षित पोचाव्यात यासाठी नियुक्त केलेल्या विनोद पाटील यांच्याशी समन्वय करून नियोजन करण्यात आल्याचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी स्पष्ट केले.