सनातनच्या रामनाथी आश्रमात श्री भवानीदेवीच्या नूतन मंदिरावर कलशाची स्थापना होत असतांना मिळालेल्या दैवी प्रचीती आणि त्यांचे अध्यात्मशास्त्रीय विवेचन

  • नावीन्यपूर्ण आध्यात्मिक संशोधन करणारे  महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालय

  • ‘युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर (यू.ए.एस्.)’ या उपकरणाद्वारे केलेली वैशिष्ट्यपूर्ण वैज्ञानिक चाचणी

१. रामनाथी आश्रमातील श्री भवानीदेवीच्या नूतन मंदिराची पार्श्‍वभूमी

वस्त्रालंकारांनी सजवलेली श्री भवानीदेवीची मूर्ती

१ अ. रामनाथी येथील सनातनच्या आश्रम-परिसराच्या देवळीतील श्री भवानीदेवीच्या मूर्तीखाली पाणी लागल्याचे समजणे : ‘श्री विद्याचौडेश्‍वरीदेवीने सांगितल्यानुसार पौष कृष्ण दशमीला (१९.१.२०२०) या दिवशी श्री भवानीदेवीच्या मूर्तीची सनातनच्या आश्रम-परिसरातील देवळीत (देवतेच्या लहान मंदिराला ‘देवळी’ असे म्हणतात.) स्थापना करण्यात आली होती. २६.२.२०२० या दिवशी श्री विद्याचौडेश्‍वरीदेवी आणि प.पू. श्री श्री बालमंजुनाथ महास्वामीजी यांचे रामनाथी आश्रमात आगमन झाले. देवळीतील श्री भवानीदेवीच्या मूर्तीकडे पाहून महास्वामीजींनी सांगितले की, ‘श्री भवानीदेवीच्या मूर्तीखाली पाणी आहे.’

१ आ. जाणकारांनी केलेल्या मार्गदर्शनानुसार रामनाथी आश्रमाच्या परिसरात श्री भवानीदेवीच्या नूतन मंदिराचे बांधकाम होणे : श्री भवानीदेवीच्या मूर्तीखाली पाणी असल्याचे कळल्यावर त्याविषयी जाणकारांचे मार्गदर्शन घेण्यात आले. त्यांनी ‘मंदिर-स्थापत्य’ शास्त्रानुसार (मंदिर बांधण्याचे वास्तूशास्त्र) थोड्या मोठ्या आकाराचे नवीन मंदिर बांधून त्यामध्ये देवीची पुनर्स्थापना करण्यास सांगितले. त्यानुसार आश्रम-परिसरात श्री भवानीदेवीच्या नूतन मंदिराचे बांधकाम करण्यात आले.

२. श्री भवानीदेवीच्या नूतन मंदिरावर कलशाची स्थापना होत असतांना तेथे फुलपाखरू येणे आणि एक गरूड दिसणे

श्री भवानीदेवीच्या नूतन मंदिरावर कलशाची स्थापना होत असतांना पाऊस येत होता. असे असूनही तेथे एक फुलपाखरू आले. तसेच आश्रम-परिसराजवळ एक गरूड घिरट्या मारत असल्याचे दिसले.

३. श्री भवानीदेवीच्या नूतन मंदिराचा ‘कलश’ आणि ‘धर्मध्वज’ यांची ‘यू.ए.एस्. (युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर)’ या उपकरणाद्वारे केलेली वैज्ञानिक चाचणी

यु.ए.एस्. उपकरणाद्वारे चाचणी करतांना श्री. आशिष सावंत

‘यू.ए.एस्. (युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर)’ या ऊर्जामापक उपकरणाद्वारे व्यक्ती किंवा वस्तू यांच्यातील सकारात्मक ऊर्जा, नकारात्मक ऊर्जा आणि त्यांची एकूण प्रभावळ (ऑरा) मीटरमध्ये मोजता येते. सर्वच व्यक्ती किंवा वस्तू यांमध्ये सकारात्मक किंवा नकारात्मक ऊर्जा असतेच असे नाही. व्यक्तीच्या संदर्भात तिची लाळ आणि वस्तूच्या संदर्भात तिच्यावरील धुलीकण किंवा तिचा थोडासा भाग यांचा ‘नमुना’ म्हणून उपयोग करून त्या व्यक्तीची किंवा वस्तूची ‘एकूण प्रभावळ’ मोजतात. सामान्य व्यक्ती किंवा वस्तू हिची प्रभावळ अनुमाने १ मीटर असते.

मंदिराचा कलश आणि धर्मध्वज यांना परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी हस्तस्पर्श करण्यापूर्वी अन् हस्तस्पर्श केल्यानंतर त्यांच्या (कलश अन् धर्मध्वज यांच्या) ‘यू.ए.एस्. (युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर)’ उपकरणाद्वारे केलेल्या मोजण्यांच्या नोंदी करण्यात आल्या. त्यांचे विवरण पुढे दिले आहे.

३ अ. मंदिराचा कलश आणि धर्मध्वज यांमध्ये ‘इन्फ्रारेड’ अन् ‘अल्ट्राव्हायोलेट’ या नकारात्मक ऊर्जा आढळल्या नाहीत.

३ आ. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी मंदिराचा कलश आणि धर्मध्वज यांना हस्तस्पर्श केल्यानंतर त्यांच्या सकारात्मक ऊर्जेच्या प्रभावळीत पुष्कळ वाढ झाली, हे पुढे दिलेल्या सारणीतून लक्षात येते.

३ इ. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी मंदिराचा कलश आणि धर्मध्वज यांना हस्तस्पर्श केल्यानंतर कलश अन् धर्मध्वज यांच्या एकूण प्रभावळीत पुष्कळ वाढ झाली. हे पुढे दिलेल्या सारणीतून लक्षात येते.

३ ई. चाचणीचा निष्कर्ष : मंदिराचा कलश आणि धर्मध्वज धर्मशास्त्रानुसार सिद्ध केलेले (बनवलेले) असल्याने आरंभीही त्यांमध्ये पुष्कळ सकारात्मक ऊर्जा आढळली. परात्पर गुरु डॉक्टरांनी कलश आणि धर्मध्वज यांना हस्तस्पर्श केल्यावर त्यांच्या सकारात्मक ऊर्जेच्या प्रभावळीत पुष्कळ वाढ झाली. संतांमधील चैतन्याचा हा परिणाम आहे.

४. श्री भवानीदेवीच्या नूतन मंदिरावर कलशाची स्थापना होत असतांना तेथे एक फुलपाखरू येणे आणि एक गरूड दिसणे, यांमागील अध्यात्मशास्त्रीय विवेचन

कु. प्रियांका लोटलीकर

४ अ. श्री भवानीदेवीच्या नूतन मंदिरावर कलशाची स्थापना होत असतांना वायुमंडलात पसरलेल्या चैतन्याकडे आकृष्ट होऊन तेथे एक फुलपाखरू येणे : ‘ब्रह्मांड आणि वायूमंडल यांमध्ये पसरलेले देवतेचे तत्त्व मंदिराकडे आकृष्ट व्हावे आणि मंदिरातील चैतन्य समष्टीत प्रक्षेपित व्हावे’, या उद्देशाने मंदिरावर कलशाची स्थापना केली जाते. थोडक्यात, मंदिराचा कलश म्हणजे चैतन्याची देवाण-घेवाण करणारा ‘अ‍ॅन्टिना’ आहे. यासाठी मंदिरात प्रवेश करण्यापूर्वी मंदिराच्या कलशाचे दर्शन घेण्यास हिंदु धर्मशास्त्रात सांगितले आहे.

श्री भवानीदेवीच्या नूतन मंदिराचा कलश आणि धर्मध्वज यांमध्ये पुष्कळ चैतन्य होते. उच्च आध्यात्मिक पातळी असलेले सद्गुरु (डॉ.) मुकुल गाडगीळ यांच्या हस्ते मंदिरावर कलश स्थापित करण्यात आला. यामुळे कलशातून पुष्कळ प्रमाणात चैतन्य वायूमंडलात प्रक्षेपित होत होते. चैतन्य असलेल्या ठिकाणी सात्त्विक पशु-पक्षी सहजपणे आकृष्ट होतात. त्यामुळे कलश स्थापनेच्या वेळी अवेळी आलेला पाऊस पडत असूनही एक फुलपाखरू तेथे आले. कलश स्थापनेच्या ठिकाणी चैतन्य आकृष्ट होण्याची दैवी प्रचीती मिळाली. यातून देवाने कलश स्थापनेचा उद्देश, म्हणजे देवतातत्त्व मंदिरात आकृष्ट होणे आणि चैतन्य समष्टीत पसरणे साध्य झाल्याची प्रचीती दिली.

४ आ. नूतन मंदिरावर कलश स्थापना होतांना गरूड येण्यामागील अध्यात्मशास्त्रीय विवेचन : आतापर्यंत सनातनच्या रामनाथी आश्रमात श्री विद्याचौडेश्‍वरीदेवीचे २ वेळा शुभागमन झाले आहे. दोन्ही वेळी देवीचे आगमन झाल्यावर त्या ठिकाणी गरूड घिरट्या घालत असल्याच्या दैवी प्रचीती मिळाल्या आहेत. श्री विद्याचौडेश्‍वरीदेवीच्या गळ्यात गरूड कोरलेला हार घातलेला असतो. ‘गरूड’ हे श्री विद्याचौडेश्‍वरीदेवीचे बोधचिन्ह आहे.

सनातनच्या रामनाथी आश्रमात श्री विद्याचौडेश्‍वरीदेवीने सांगितल्यानुसार श्री भवानीदेवीच्या मूर्तीची पुनर्स्थापना करण्यात आली. ज्या वेळी देवता किंवा अध्यात्मातील अधिकारी, उदा. संत, सद्गुरु एखादी कृती करायला सांगतात, त्या वेळी त्या कार्यासाठी त्यांचा संकल्प आणि शक्ती कार्यरत होते. अनेक वेळा त्या कार्याला पूर्णत्वाला नेण्यास ते सूक्ष्मातून त्या ठिकाणी उपस्थितही असतात. सनातनच्या रामनाथी आश्रम-परिसरात बांधलेल्या श्री भवानीदेवीच्या नूतन मंदिरावर कलश स्थापना होतांना तेथे गरूड येणे, हे देवीने कार्याला पूर्णत्व प्रदान केल्याची आणि तिचे सूक्ष्म अस्तित्व विधीच्या ठिकाणी उपस्थित असण्याची प्रचीती होय.’

– कु. प्रियांका लोटलीकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.

सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे  ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केेलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत

सूक्ष्मातील दिसणे, ऐकू येणे इत्यादी (पंच सूक्ष्मज्ञानेंद्रियांनी ज्ञानप्राप्ती होणे) : काही साधकांची अंतर्दृष्टी जागृत होते, म्हणजे त्यांना डोळ्यांना न दिसणारे दिसते, तर काही जणांना सूक्ष्मातील नाद किंवा शब्द ऐकू येतात.

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक