रंग आणि अंतरंग !

‘हिंदुस्थान युनिलिव्हर’ या आस्थापनाने त्याचे उत्पादन असलेले ‘फेअर अँड लवली’ या क्रिमचे नाव पालटण्याचा निर्णय घेतला आहे. ‘क्रिम लावा आणि १४ दिवसांत उजळ कांती अनुभवा’, अशा आशयाची विज्ञापने करून या क्रिमचा प्रसार गेली कित्येक दशके चालू आहे. तसेच ‘जो गोरा आहे, तोच आयुष्यात यशस्वी होतो’, असा छुपा संदेशही या विज्ञापनांतून देण्यात येत होता. अलीकडेच अमेरिकेत जॉर्ज फ्लॉईड या कृष्णवर्णियाची तेथील पोलिसांनी हत्या केली. त्यानंतर गोरे विरुद्ध कृष्णवर्णीय हा वाद पुन्हा एका उफाळून आला. भारतातही याचे पडसाद उमटले. अनेकांनी गोरे होण्याचा दावा करणार्‍या अशा क्रिम्सवर टीकेची झोड उठवली, तसेच अशा आस्थापनांची विज्ञापने करणार्‍या अभिनेत्रींनाही टीका सहन करावी लागली. समाजाचा वाढता रोष लक्षात घेऊन ‘हिंदुस्थान युनिलिव्हर’ने हे पाऊल उचलल्याचे सांगितले जात आहे. जगभरात वर्णद्वेष मिटवण्यासाठी आपापल्या परीने प्रयत्न केले जात आहेत; मात्र ते प्रयत्न तोकडे आहेत, हेही तितकेच खरे !

वर्णद्वेष का संपत नाही ?

अमेरिकेतील समाज हा उच्चभ्रू आणि सुशिक्षित समजला जातो. तेथील बरेच कृष्णवर्णीय हे मोठमोठ्या पदांवर कार्यरत आहेत; मात्र तरीही गोर्‍यांच्या मनातील कृष्णवर्णियांविषयी असलेला द्वेष काही अल्प होत नाही. केवळ अमेरिकेतच नव्हे, तर युरोपीय खंडामध्येही हीच स्थिती आहे. वास्तविक ‘मानवाधिकार’, ‘माणुसकी’ यांसाठी कार्यरत असलेल्या संस्थांची प्रगत राष्ट्रांमध्ये रेलचेल असते; मात्र ‘वर्णद्वेषापुढे या संस्थांचे कार्य कुचकामी पडते का ?’, असा प्रश्‍न आहे.

भारतात थोडी वेगळी समस्या आहे. बहुतांश भारतियांचा मूळ रंग हा ‘सावळा’ (ब्राऊन) असतो. इंग्रज यायच्या आधी भारतात रंगाला एवढे महत्त्व नव्हते. सौंदर्याची परिभाषा वेगळी होती. रंगापेक्षा व्यक्तीच्या अंतरंगाला महत्त्व होते; मात्र इंग्रजांनंतर शिक्षणपद्धत पालटली आणि भारितयांमध्ये स्वतःच्या सावळेपणाविषयी न्यूनगंड निर्माण झाला. तो वाढवण्यास गोर्‍या इंग्रजांनी हातभार लावला. इंग्रज गेले; मात्र जाता जाता त्यांनी भारतियांच्या सौंदर्याच्या संकल्पनेला छेद दिले. हा छेद आजही मिटलेला नाही. घरात सावळ्या अथवा काळ्या रंगाची मुलगी जन्माला आल्यास अजूनही तिच्या आईवडिलांच्या जिवाला घोर लागतो. भारतियांचा हाच न्यूनगंड लक्षात घेऊन विदेशी आस्थापनांनी विविध क्रिम्स, लोशन्स बाजारात आणली. ‘क्रिम लावा, गोरेपणा अनुभवा’, ‘त्वचा उजळण्याचा हमखास उपाय’ यांसारखी विज्ञापने प्रसारित करून या आस्थापनांनी स्वतःच्या तुंबड्या भरून घेतल्या. या क्रिममुळे त्वचा खरोखरंच उजळते का, हा एक संशोधनाचा विषय आहे. थोडक्यात गोर्‍यांना काळ्यांविषयी असलेला तिरस्कार आणि सावळा वर्ण असणार्‍यांना ‘आपण गोरे नाही’ यामुळे निर्माण झालेला न्यूनगंड ही मोठी समस्या आहे. वरवरच्या उपाययोजना करून ती नष्ट होणारी नाही.

वर्णद्वेषावर ‘सनातन’ उपाय !

काही दिवसांपूर्वी वेस्ट इंडिजच्या खेळाडूने आयपीएल्च्या काळात भारतीय खेळाडूंनी त्याला ‘काळू’ म्हणून चिडवल्याचे सांगितले होते. हेच कशाला ईशान्य भारतातील लोक, ‘भारतात आम्हाला ‘चिनी’ किंवा ‘विदेशी’ म्हणून चिडवले जाते’, असे सांगत त्यांचे बारीक डोळे आणि अंगकाठी यांमुळे त्यांना मिळणार्‍या अवमानकारक वागणुकीच्या व्यथा सांगतात. हे सुसंस्कृत आणि सभ्य समाजाचे लक्षण नाही. भारतीय संस्कृतीत व्यक्तीच्या बाह्य सौंदर्याकडे न पहाता तिच्या आंतरिक सौंदर्याकडे पहाण्याची शिकवण दिली आहे. यामुळे कोण गोरा किंवा काळा यापेक्षा त्याचे कर्तृत्व, दैवी गुण यांकडे पाहून त्याला मान-सन्मान देणे, ही आपली संस्कृती आहे. याचे उत्तम उदाहरण म्हणून ऋषि अष्टवक्री आणि राजा जनक यांच्याकडे पहाता येईल. ऋषि अष्टवक्री यांच्यामुळे राजा जनक यांना आत्मज्ञान प्राप्त झाले. ऋषि अष्टवक्री यांचे शरीर ८ ठिकाणी वक्र होते. राजा जनक यांनी त्यांच्यातील दिव्यत्व ओळखल्यावर त्यांच्यासमोर नतमस्तक होतांना त्यांना कमीपणा वाटला नाही. याचे कारण ऋषि अष्टवक्री यांचे आंतरिक तेज, त्यांचे ज्ञान यांपुढे त्यांचे बाह्य दिसणे या गोष्टी राजा जनक यांना फिक्या वाटल्या. ‘ज्या देशात राजा जनक यांच्यासारखे राजाच गुणांचा मान करणारे असतील, तेथील प्रजाही तशीच असणार’, हे वेगळे सांगायला नको. अशी समाजाभिमुख आणि व्यापक शिकवण कालौघात लोप पावली आणि समाज बहिर्मुख बनला.

हिंदूंचे देव हे ‘काळे-सावळेच’ आहेत, हे आपण लक्षात घेतले आहे का ? विठ्ठलाचे वर्णन हे ‘रूपे सुंदर सावळा गे माये ।’, असे केले आहे, तर भगवान श्रीकृष्णाला ‘काळा कृष्ण’ संबोधले आहे. असे हे काळे-सावळे देव भक्तांसाठी जीव कि प्राण आहेत. त्यांच्या प्राप्तीसाठी भक्त तहान-भूक विसरून त्यांना आळवतात. रंगभेद हे भक्तीच्या आड येत नाही. मुळात वर्णभेद किंवा वर्णद्वेष हा ‘मी श्रेष्ठ आणि तू कनिष्ठ’ या भावनेतून निर्माण होतो. हा तीव्र अहंकार घालवायचा असेल, तर त्याच्यातील हा अहंयुक्त विचार नष्ट करायला हवा. ‘सर्वांना ईश्‍वराने निर्माण केले आहे. त्यात आपले असे कर्तृत्व काहीच नाही’, याची जाणीव प्रत्येकाला झाल्यास कुणी स्वतःच्या रंगाचा अहंकार का बाळगेल किंवा इतरांना तुच्छ का लेखेल ?

थोडक्यात क्रिमचे नाव पालटले, सामाजिक माध्यमांवर चर्चा घडवून आणली म्हणून वर्णद्वेष अल्प होणार नाही. ही समस्या सुटण्यासाठी समाजाला अंतर्मुख बनवावे लागेल. अंतर्मुख असणारा समाज व्यक्तीचा रंग नव्हे, तर अंतरंग पाहील. त्यामुळे वर्णद्वेषाची समस्याही मिटेलच, त्यासह समाजात परस्पर सौहार्दाची भावनाही निर्माण होईल. समाजाला साधना शिकवण्याचा उपाय समाजधुरिण आणि सरकारी यंत्रणा यांच्या का लक्षात येत नाही ? हाच मुळात प्रश्‍न आहे !