श्री महालक्ष्मी मंदिर दर्शनासाठी खुले करावे ! – श्री पूजकांची मागणी

कोल्हापूर – गेल्या ३ मासांपासून राज्यातील सर्व मंदिरे भाविकांना दर्शन घेण्यासाठी बंद आहेत. त्यामुळे यावर अवलंबून असणार्‍या घटकांवर परिणाम जाणवत आहे. अनेक छोट्या-मोठ्या व्यवसायांना आर्थिक फटका बसला आहे. ‘अनलॉक-२’मध्ये भाविकांसाठी श्री महालक्ष्मी मंदिरासह राज्यातील इतर मंदिरे दर्शनासाठी खुली करावीत, अशी मागणी श्री पूजक मंडळाच्या वतीने श्री. मकरंद मुनीश्‍वर यांनी शासनाकडे केली आहे.

श्री पूजकांनी केलेल्या मागणीत म्हटले आहे की, मंदिरावर अवलंबून असणारे जवळपास ५०० हून अधिक लहान मोठे व्यवसाय आहेत. हार, ओटी साहित्य, नारळ, फुल, प्रसाद विक्री करणे यांसारखे अनेक व्यवसाय अडचणीत आले आहेत. अनेकांचा उदरनिर्वाह या व्यवसायावर चालतो. त्यामुळे गेल्या ३ मासांपासून त्यांना आर्थिक झळ बसत आहे. त्यामुळे राज्यशासनाने या गोष्टींचा विचार करून ‘अनलॉक’च्या दुसर्‍या टप्प्यात राज्यातील मंदिरे दर्शनासाठी खुली करावीत.