काँग्रेसचे दुःसाहस

ज्या वीर योद्ध्यांच्या शौर्यामुळे भारतभूमीने परकीय आक्रमकांशी झुंज देऊन देशाची संस्कृती आणि सार्वभौमत्व यांचे रक्षण केले, त्या योद्ध्यांचा स्वातंत्र्योत्तर काळात योग्य तो सन्मान झाला नाही, हे भारताचे दुर्दैव ! याला अर्थातच देशावर ६ दशके राज्य करणार्‍या काँग्रेसची नेभळट, स्वार्थी आणि देशविरोधी वृत्ती कारणीभूत आहे. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर पंडित म्हणवणार्‍यांनी शैक्षणिक संस्था भारतियत्वाशी नाळ नसलेल्या व्यक्तींच्या हाती सोपवून एक फार मोठे राष्ट्रीय पातक केले. देशाच्या राष्ट्रीय आणि सामाजिक जीवनात त्याचे अनेक दुष्परिणाम झाले. इतिहासाच्या अभ्यासातून भारतीय विरांच्या शौर्याचे पोवाडे गायले जाण्याऐवजी परकीय आक्रमकांच्या उदात्तीकरणाचे भेसूर राग आळवले जाऊ लागले. १४ विद्या, ६४ कला, संस्कृती, धर्म-परंपरा, विज्ञान यांच्याविषयी हीनपणाची भावना शैक्षणिक अभ्यासक्रमांतून कळत-नकळत रुजवली गेली. परिणामी भारताने स्वातंत्र्य मिळवूनही देशात ‘अँग्लो-इंडियन’ (ब्रिटिशधार्जिणे भारतीय) पदवीधर निर्माण झाले. आजही ज्या ठिकाणी काँग्रेस सत्तेत आहे, त्या ठिकाणी इतिहासाचे विकृतीकरण चालूच आहे. राजस्थानच्या काँग्रेस सरकारने इयत्ता १० वीच्या सामाजिक विज्ञानाच्या पाठ्यपुस्तकामध्ये महाराणा प्रताप यांचा केलेला अवमानकारक उल्लेख हा त्याचा नमुना !

काँग्रेसच्या शिकवणीचा दोष

महाराणा प्रताप हे राजस्थानमधील छत्रपती शिवाजी महाराज होते. इस्लामी पद्धतीने साम्राज्यविस्तार करणार्‍या क्रूर अकबराला मेवाड प्रांत कह्यात घ्यायचा होता; पण महाराणा प्रताप यांचे अतुलनीय शौर्य आणि युद्धनीती यांमुळे अकबराला त्याचे मनसुबे साध्य करता आले नाहीत. हळदीघाटी येथे अकबर आणि महाराणा प्रताप यांच्यात झालेली लढाई ही त्याची साक्ष आहे. एक दिवस चाललेल्या या लढाईत मोगल आणि रजपूत यांनी समोरासमोर लढत दिली अन् रजपूतांनी कडवी झुंज देऊन मोगल सैन्याला धूळ चारली. काही इतिहासकार ही लढाई अनिर्णित असल्याचे मांडत असले, तरी वस्तूतः कित्येक पटींनी अधिक असणार्‍या शत्रूला जेरीस आणून माघारी जायला भाग पाडणे, हा विजयच आहे. अकबर तब्बल ९ वर्षे पूर्ण ताकदीनिशी महाराणा प्रताप यांच्यावर आक्रमण करत होता; पण प्रत्येक वेळी अकबराला हार मानावी लागली आणि अखेर अकबराने मेवात कह्यात घेण्याचा विचार सोडून दिला. शत्रूने आपला नाद सोडून देणे, हा आपला विजय नाही, तर दुसरे काय आहे ?; पण सर्व निष्ठा परकियांच्या चरणी वहाणार्‍या काँग्रेसला स्वत्व, अभिमान किंवा संस्कृतीरक्षण अशी सूत्रे कळणार कशी ? याच वृत्तीमुळे राजस्थानच्या गेहलोत सरकारने सुधारित आवृत्तीच्या नावाखाली महाराणा प्रताप यांच्यावरील पाठ्यपुस्तकातील लिखाण न्यून केले आणि त्यांचा अवमानकारक उल्लेख केला. ‘महाराणा प्रताप यांच्यात एक सेनानायक म्हणून धाडस, समाजावर पकड आणि नियोजन यांची कमतरता होती. ही महाराणा प्रताप यांच्या हळदीघाटीतील लढाईच्या पराभवाची कारणे आहेत’, असे सामाजिक विज्ञानातील ‘संघर्षकालीन भारत’ या धड्यात म्हटले आहे. अशा सुधारणा (?) राजकीय हस्तक्षेपाविना होत नाहीत. आपल्याला भविष्य घडवता येत नसेल आणि वर्तमानात योग्य पद्धतीने वागण्याचे ताळतंत्र नसेल, तर पूर्वजांनी घडवलेल्या तेजस्वी इतिहासाशी तरी प्रतारणा करू नये; पण शौर्याचे मोल समजेल, ती काँग्रेस कुठली ? ज्यांच्याविषयी शत्रूनेही गौरवोद्गार काढले, अशांच्या पराक्रमाचे अवमूल्यन करणे, हे काँग्रेसचे दुःसाहस नाही, तर काय आहे ? एका गालावर मारल्यानंतर दुसरा गाल पुढे करण्याच्या काँग्रेसच्या शिकवणीचा हा दोष आहे. ज्यांना केवळ सत्ता आणि स्वार्थ एवढेच कळते, त्यांना देशरक्षणार्थ गाजवलेला पुरुषार्थ काय कळणार ? यापूर्वीही राजस्थान काँग्रेसने इयत्ता १२ वीच्या पुस्तकातील वीर सावरकर यांच्या नावाच्या आधीचा ‘वीर’ हा शब्द काढला होता. वीरतेशी शत्रुत्व असणार्‍यांच्या हाती सत्ता जाणे दुर्दैवी आहे.

भारत हा जगाच्या पाठीवर एकमेव देश आहे की, जिथे स्वतःचा स्फूर्तीदायी इतिहास दडपून टाकण्याचा प्रयत्न होतो. आज विदेशी विद्यापिठांमध्ये छत्रपती शिवरायांची युद्धनीती, तसेच भारतीय युद्धशास्त्र यांचा अभ्यास होतो, तर आपल्याकडे मोगल आक्रमकांच्या वंशावळीचा अभ्यास होतो. खरे तर भारत हा योद्ध्यांचा देश आहे; मात्र आज अशी स्थिती आहे की, बहुतांश विद्यार्थी २५ क्रांतीकारक किंवा महापुरुष यांची नावे सलग सांगू शकणार नाहीत. या परिस्थितीमध्ये पालट व्हायला हवा; कारण विद्यार्थी, पर्यायाने राष्ट्र घडवण्यामध्ये शैक्षणिक अभ्यासक्रमाचा मोठा वाटा असतो. शेळपट अभ्यासक्रम विद्यार्थ्यांच्या माथी मारला, तर त्यांच्याकडून उत्तुंग कार्य घडण्याची अपेक्षा कशी बाळगणार ? जो इतिहासातून धडा घेत नाही, त्याला इतिहासही धडा शिकवल्याविना रहात नाही. वर्ष २०१४ मध्ये सत्तापालट झाल्यापासून शैक्षणिक क्षेत्रात एखादा ‘सर्जिकल स्ट्राईक’ होण्याची अर्थात् सर्व अभ्यासक्रमांची भारतीय संस्कृती आणि इतिहास यांच्या दृष्टीकोनातून पुनर्रचना होण्याची अपेक्षा आहे.

काँग्रेसला क्षमा मागायला लावा

काँग्रेसने चालवलेल्या इतिहासाच्या विकृतीकरणाच्या विरोधात वैध मार्गाने देशव्यापी आंदोलन उभे रहाण्याची आवश्यकता आहे. उपलब्ध साधनांचा अवलंब करून जनमताचा रेटा निर्माण करून काँग्रेसला क्षमायाचना करायला भाग पाडले गेले पाहिजे. योद्ध्यांच्या पराक्रमाचा सत्य इतिहास पुस्तकांमधून शिकवण्यासाठी सरकारला बाध्य केले पाहिजे. याच्या समांतर बाजूला पालक, ज्येष्ठ किंवा शिक्षकमंडळी यांनी क्रांतीकारक आणि महापुरुष यांची चरित्रे वाचण्यासाठी विद्यार्थ्यांना उद्युक्त केले पाहिजे. क्रांतीकारक आणि महापुरुष यांचा पदोपदी अवमान करून शत्रूचे उदात्तीकरण करणारी मोगलधार्जिणी काँग्रेस राज्य करण्याच्या लायकीची नाही. आज काँग्रेस इतिहास पुसण्याचा प्रयत्न करत आहे; पण भविष्यात हीच काँग्रेस इतिहासजमा होणार, श्‍चिहे नित !