खेड येथे अपघातात चारचाकीने ३ वाहनांना ठोकरले : दुचाकीस्वाराचा मृत्यू

खेड – भरणे महामार्गावर एका चारचाकी वाहनाने २ दुचाकी आणि रुग्णवाहिका यांना धडक दिल्याने मोठा अपघात झाला. या अपघातात एका दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला असून वाहनांचीही हानी झाली आहे. पोलिसांनी चारचाकी चालकावर भादंवि कलम ३०४(अ), २७९, ३३७, ३३८ नुसार गुन्हा नोंदवला आहे.

सैफअली मोहजम परकार हा वेर्ना ही चारचाकी (क्रमांक एम्एच् ०६ बीएम् ६५५५) चालवत असतांना त्याने प्रथम दुचाकीला (क्रमांक एम्एच् ०८ एन् ७२७८) जोराची ठोकर दिली. त्यानंतर रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या आरोग्य विभागाच्या १०८ रुग्णवाहिकेला आणि दुचाकलाही जोरात धडक दिली. या अपघातात ५ जणांना गंभीर दुखापत झाली, तर खेर्डी येथील प्रकाश चव्हाण या दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. घायाळांवर कळंबणी उपजिल्हा रुग्णालयात उपचार चालू करण्यात आले आहेत.  या प्रकरणी पोलीस अधिक अन्वेषण करत आहेत.