‘श्री जगन्नाथ मूर्ती प्रतिष्ठापना विधी’चा विधीतील घटकांवर सकारात्मक परिणाम होणे

‘महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालया’ने ‘यू.ए.एस्. (युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर)’ या उपकरणाद्वारे केलेली वैज्ञानिक चाचणी

२३ जून २०२० या दिवशी असलेल्या पुरी (ओडिशा) येथील जगप्रसिद्ध जगन्नाथ रथयात्रेच्या निमित्ताने…

यु.ए.एस्. उपकरणाद्वारे चाचणी करतांना श्री. आशिष सावंत

‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांना आरोग्यपूर्ण दीर्घायुष्य लाभावे आणि हिंदु राष्ट्र स्थापनेच्या कार्यासाठी सर्व देवतांचे आशीर्वाद प्राप्त व्हावेत, यासाठी ओडिशा येथून आणलेल्या भगवान जगन्नाथांच्या काष्ठ (दारुमय, म्हणजेच कडूलिंबाच्या झाडापासून बनवलेल्या) मूर्तीचा प्रतिष्ठापना विधी १८.१०.२०१८ या दिवशी रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात करण्यात आला. प्रतिष्ठापना विधीच्या यजमानपदी पू. (डॉ.) मुकुल गाडगीळ आणि त्यांच्या पत्नी सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ हे होते. विधीला सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ यांची वंदनीय उपस्थिती लाभली. प्रतिष्ठापना विधी झाल्यानंतर श्री जगन्नाथदेवाच्या मूर्तीची आश्रमातील ध्यानमंदिरात चलप्रतिष्ठापना (मूर्तीची स्थापना झाल्यानंतर उत्सवसमयी किंवा अन्य प्रसंगी मूर्ती मूळ जागेवरून हलवता येते. उदाहरणार्थ पालखीच्या वेळी) करण्यात आली. ‘श्री जगन्नाथ मूर्ती प्रतिष्ठापना विधी’चा विधीतील घटकांवर काय परिणाम होतो’, हे विज्ञानाद्वारे अभ्यासण्यासाठी ‘महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालया’च्या वतीने एक चाचणी करण्यात आली. या चाचणीसाठी ‘यू.ए.एस्. (युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर)’ या उपकरणाचा उपयोग करण्यात आला. या चाचणीचे स्वरूप, केलेल्या मोजण्यांच्या नोंदी आणि त्यांचे विवरण पुढे दिले आहे.

(या लेखातील लिखाण पूर्वीचे असल्याने संतांच्या नावाचा उल्लेख पूर्वीप्रमाणेच ठेवला आहे. – संपादक)

सनातन आश्रमातील ध्यानमंदिरात स्थापन करण्यात आलेली श्री जगन्नाथाची मूर्ती !
डावीकडून श्रीसत्शक्ति सौ. बिंदा सिंगबाळ, श्री जगन्नाथाचे पूजन करतांना श्रीचित्शक्ति सौ. अंजली गाडगीळ आणि सद्गुरु (डॉ.) मुकुल गाडगीळ, समवेत पौरोहित्य करतांना श्री. अमर जोशी अन् श्री. दामोदर वझेगुरुजी

१. चाचणीचे स्वरूप

या चाचणीत पुढील घटकांच्या प्रतिष्ठापना विधीपूर्वी आणि विधीनंतर ‘यु.ए.एस्.’ उपकरणाद्वारे केलेल्या मोजण्यांच्या नोंदी करण्यात आल्या. या मोजण्यांच्या सर्व नोंदींचा तुलनात्मक अभ्यास करण्यात आला.

अ. श्री जगन्नाथदेवाची मूर्ती

आ. पू. (डॉ.) मुकुल गाडगीळ आणि सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ

इ. सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ

ई. सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ यांनी नेसलेल्या साड्या (सद्गुरुद्वयींनी साडी नेसण्यापूर्वी आणि विधी झाल्यानंतर त्यांनी साडी सोडल्यानंतर त्यांच्या साड्यांची चाचणी करण्यात आली.)

वाचकांना सूचना : जागेअभावी या लेखातील ‘यु.ए.एस्.’ (‘यु.टी.एस्.’) उपकरणाची ओळख’, ‘उपकरणाद्वारे करावयाच्या चाचणीतील घटक आणि त्यांचे विवरण’, ‘घटकाची प्रभावळ मोजणे’, ‘परीक्षणाची पद्धत’ आणि ‘चाचणीमध्ये सारखेपणा येण्यासाठी घेतलेली दक्षता’ ही नेहमीची सूत्रे सनातन संस्थेच्या goo.gl/tBjGXa या लिंकवर दिली आहेत. या लिंकमधील काही अक्षरे कॅपिटल (Capital) आहेत.

२. केलेल्या मोजण्यांच्या नोंदी आणि त्यांचे विवेचन

२ अ. नकारात्मक ऊर्जेच्या संदर्भात केलेल्या मोजण्यांच्या नोंदींचे विवेचन – चाचणीतील घटकांमध्ये नकारात्मक ऊर्जा आढळली नाही.

२ आ. सकारात्मक ऊर्जेच्या संदर्भात केलेल्या मोजण्यांच्या नोंदींचे विवेचन

सर्वच व्यक्ती, वास्तू किंवा वस्तू यांमध्ये सकारात्मक ऊर्जा असतेच, असे नाही.

२ आ १. प्रतिष्ठापना-विधीनंतर चाचणीतील घटकांच्या सकारात्मक ऊर्जेत वाढ होणे

२ इ. एकूण प्रभावळीच्या (टीप) संदर्भात केलेल्या मोजण्यांच्या नोंदींचे विवेचन

टीप – एकूण प्रभावळ : व्यक्तीच्या संदर्भात तिची लाळ, तसेच वस्तूच्या संदर्भात तिच्यावरील धुलीकण किंवा तिचा थोडासा भाग यांचा ‘नमुना’ म्हणून उपयोग करून त्या व्यक्तीची वा वस्तूची ‘एकूण प्रभावळ’ मोजतात.

सामान्य व्यक्ती किंवा वस्तू हिची एकूण प्रभावळ साधारण १ मीटर असते.

२ इ १. प्रतिष्ठापना-विधीनंतर चाचणीतील घटकांच्या एकूण प्रभावळीत वाढ होणे

खालील सर्व सूत्रांविषयी अध्यात्मशास्त्रीय विश्‍लेषण ‘सूत्र ३’ मध्ये दिले आहे.

३. केलेल्या मोजण्यांच्या नोंदींचेे अध्यात्मशास्त्रीय विश्‍लेषण

३ अ. प्रतिष्ठापना-विधीनंतर श्री जगन्नाथदेवाच्या मूर्तीच्या सकारात्मक ऊर्जेत आणि एकूण प्रभावळीत वाढ होणे : श्री जगन्नाथ हे श्रीविष्णूचे रूप आहे. प्रतिष्ठापना-विधीपूर्वीही श्री जगन्नाथदेवाच्या मूर्तीमध्ये सकारात्मक ऊर्जा (७.०८ मीटर) होती. पूजनामुळे श्री जगन्नाथदेवाच्या मूर्तीतील श्रीविष्णुतत्त्व जागृत होऊन ते कार्यरत झाले. त्यामुळे प्रतिष्ठापना-विधीनंतर श्री जगन्नाथदेवाच्या मूर्तीच्या सकारात्मक ऊर्जेत आणि एकूण प्रभावळीत वाढ झाल्याचे चाचणीतून दिसून आले.

३ आ. प्रतिष्ठापना-विधीचे यजमान पू. (डॉ.) मुकुल गाडगीळ आणि त्यांच्या पत्नी सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ यांनी पूजाविधीतील चैतन्य ग्रहण केल्याने त्यांच्यातील सकारात्मक ऊर्जेत आणि एकूण प्रभावळीत वाढ होणे : पू. (डॉ.) मुकुल गाडगीळ आणि त्यांच्या पत्नी सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ हे उच्च आध्यात्मिक पातळीचे संत असल्याने त्यांच्यात पुष्कळ चैतन्य आहे. त्यामुळे आरंभीही त्यांच्यामध्ये पुष्कळ सकारात्मक ऊर्जा आढळली. त्यांनी प्रतिष्ठापना-विधीअंतर्गत पूजाविधी अत्यंत भावपूर्ण केले. पूजाविधीतील चैतन्य त्यांनी ग्रहण केल्याने त्यांच्या सकारात्मक ऊर्जेत आणि एकूण प्रभावळीत वाढ झाली.

इ. प्रतिष्ठापना-विधीला उपस्थित सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनीही पूजाविधीतील चैतन्य ग्रहण केल्याने त्यांच्या सकारात्मक ऊर्जेत आणि एकूण प्रभावळीत वाढ झाली.

३ ई. सद्गुरुद्वयींच्या उत्कट भावामुळे त्यांच्याकडे श्रीविष्णुतत्त्व आकृष्ट होणे : निळा हा रंग श्रीविष्णूशी संबंधित आहे. सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ यांनी नेसलेल्या साड्यांचा रंगही निळा होता. सद्गुरुद्वयींमधील उत्कट भावामुळे त्यांच्याकडे श्रीविष्णुतत्त्व (चैतन्य) आकृष्ट झाले. त्याचा चांगला परिणाम संतद्वयींच्या साड्यांवर झाल्याने साड्यांच्या सकारात्मक ऊर्जेत आणि एकूण प्रभावळीत पुष्कळ वाढ झाली.’

– सौ. स्वाती वसंत सणस, महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालय, गोवा. (१५.११.२०१९)

ई-मेल : [email protected]