हिंदु धर्मावरील आघात रोखण्याचे कार्य सनातन प्रभात उत्तमरित्या पार पाडत आहे ! – भारताचार्य सु.ग. शेवडे

तिमिरातून तेजाकडे । वाटचाल हिंदु राष्ट्राच्या दिशेने ॥

सनातन प्रभातचा ‘ऑनलाईन’ वर्धापनदिन सोहळा भावपूर्ण वातावरणात साजरा !

फोंडा – धर्महानी रोखण्यासाठी कुणी तरी नेतृत्व घेणे आवश्यक होते. हे नेतृत्व सनातन प्रभातने स्वीकारले. सनातन प्रभात हिंदु धर्मावर होणारे आघात रोखण्याचे कार्य उत्तम प्रकारे पार पाडत आहे, असे प्रतिपादन भारताचार्य सु.ग. शेवडे यांनी केले. सनातन प्रभातच्या २१ व्या ‘ऑनलाईन’ वर्धापन सोहळ्याच्या निमित्ताने बोलत होते.

यंदा कोरोनाच्या महामारीमुळे सनातन प्रभातचा वर्धापन सोहळा ‘ऑनलाईन’ आयोजित करण्यात आला होता. या सोहळ्याचा प्रारंभ शंखनादाने झाला. त्यानंतर सनातन प्रभात नियतकालिकांचे माजी समूह संपादक पू. पृथ्वीराज हजारे यांनी दीपप्रज्वलन केले. त्यानंतर सनातन प्रभातच्या वर्धापनदिनाच्या विशेषांकाचे अनावरण त्यांच्या हस्ते करण्यात आले. या सोहळ्यात सनातन प्रभातचे उपसंपादक श्री. चेतन राजहंस, तसेच हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक श्री. सुनील घनवट यांची भाषणे झाली. फेसबूक आणि यू ट्यूब या माध्यमांतून कार्यक्रमाचे प्रसारण करण्यात आले. या ‘ऑनलाईन’ वर्धापनदिन कार्यक्रमाला ‘सनातन प्रभात’चे अनेक वाचक, हितचिंतक, विज्ञापनदाते आणि वितरक उपस्थित होते.

सनातन धर्माचा प्रसार समाजामध्ये करणे, हे सनातन प्रभातचे मुख्य कार्य ! – भारताचार्य सु.ग. शेवडे

भारताचार्य सु.ग. शेवडे

२१ वर्षांपूर्वी सनातन प्रभातची स्थापना एका विशिष्ट हेतूने झाली. सनातन प्रभातच्या नावातच हेतू व्यक्त होतो. सनातन धर्माचा, सनातन विचारांचा प्रसार करणे, हिंदूंमध्ये जागृती करणे हा सनातन प्रभातचा हेतू आहे. हे दैनिक काढण्याची आवश्यकता का भासली ? स्वातंत्र्यानंतर ‘आमचा हिंदुत्वाशी काहीही संबंध नाही’, असे सत्तेवर आलेल्या सरकारांचे वर्तन होते. त्यामुळे लोकमानसामध्ये ‘भारत हे हिंदु राष्ट्र’ आहे, याचाच विसर पडला आणि जनता ‘आम्ही निधर्मी आहोत’, याच थाटात वावरू लागली. स्वातंत्र्यानंतर ‘हिंदूंच्या परंपरांना आणि विचारांना न मानण्याचा अपप्रचार प्रसारमाध्यमांतून करण्यात आला. अशा काळात सनातन प्रभातची स्थापना झाली. त्या काळात सनातन प्रभातमधून त्याच्या स्थापनेचा हेतू घोषित करण्यात आला. तेव्हापासून सनातन प्रभात धर्मप्रसाराचे कार्य उत्तमरित्या करत आहे.

काळाची पावले ओळखून त्यानुसार समाजमन घडवणण्याचे कार्य सनातन प्रभात करत आहे ! – श्री. चेतन राजहंस, उपसंपादक, सनातन प्रभात

आज चिनी वस्तूंवर बहिष्कार टाकण्याचे सूत्र जोर पकडू लागले आहे; मात्र मागील १०-१२ वर्षांपासून चिनी उत्पादनांवर बहिष्कार टाकण्याचे सूत्र सनातन प्रभातमधून जोरकसपणे मांडण्यात येत आहे. त्याविषयी विविध प्रबोधनात्मक चौकटी तसेच माहितीजन्य लेख छापण्यात आले. आज त्याचे बीज कुठेतरी समाजात रूजलेले पहायला मिळते. राष्ट्रहिताविषयी दूरगामी विचार मांडणे, हे सनातन प्रभातचे वैशिष्ट्य आहे. केवळ समस्यांविषयी नागरिकांना अवगत करून न थांबता त्यांना सामोरे जाण्याची सिद्धता करण्याचे दायित्व सनातन प्रभात पार पाडत आहे.

सद्गुरु ब्रह्मेशानंद स्वामी यांच्या सनातन प्रभात वर्धापनदिनाच्या निमित्ताने शुभेच्छा

सद्गुरु ब्रह्मेशानंद स्वामी

तपोभूमी, कुंडई (गोवा) येथील सद्गुरु ब्रह्मेशानंद स्वामी यांनी सनातन प्रभातच्या वर्धापनदिनाच्या निमित्ताने शुभेच्छा कळवल्या.