रत्नागिरीत वार्षिक सरासरीच्या २० टक्के पाऊस १८ दिवसांत पडल्याने सहस्रो रुपयांची हानी

रत्नागिरी – जिल्ह्यात एकूण वार्षिक सरासरीच्या २० टक्के पाऊस अवघ्या १८ दिवसांत पडला आहे. या कालावधीत सहस्रो रुपयांची हानी झाली आहे. गेल्या २४ घंट्यांत सरासरी ११२.७८ मि.मी. पाऊस झाला असून एकूण १ सहस्र १५ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. सर्वाधिक पावसाची नोंद राजापूर तालुक्यात १९० मि.मी. झाली. जिल्ह्यात पावसाची वार्षिक सरासरी ३ सहस्र ३५५ मि.मी. आहे.

जिल्हा नियंत्रण कक्षाकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार दापोली तालुक्यात मंडणगड-दापोली रस्त्यावर पिसई गावाजवळ झाड पडल्याने वाहतूक बंद झाली होती. सार्वजनिक बांधकाम विभागाने झाड हटवल्यानंतर वाहतूक सुरळीत झाली. संगमेश्‍वर तालुक्यात मौजे देवरुख येथे श्रीमती रेश्मा विष्णु करंडे यांच्या घराची पावसामुळे २० सहस्र रुपयांची, मौजे मुचरी महादेव मोरे आणि केशव मोरे यांच्या घराची ३ लाख ७२ सहस्र २५, मौजे बेलारी येथील आदर्श माध्यमिक शिक्षण मंदिर शाळेची संरक्षक भिंत पावसामुळे कोसळल्याने ३५ सहस्र रुपयांची हानी झाली आहे. मौजे माखजन येथील शरद पोंक्षे, मौजे मावळंगे येथे किरण दामू ओगले यांच्या घराजवळील संरक्षक भिंत पावसामुळे कोसळल्याने अंशत: हानी झाली आहे. राजापूर तालुक्यात मौजे बेदंखळे येथील सदू गणू म्हादे यांचा गोठा पडल्याने २ बैल घायाळ झाले. सुहास धोंडू म्हादे यांच्या गोठ्याची पावसामुळे अंशत: हानी झाली आहे.