आदिवासी समाज ख्रिस्ती मिशनरी आणि सी.पी.एम्. यांच्या प्रभावाखाली काम करत आहे ! – विवेक विचार मंच  

पालघर येथे झालेले साधूंचे हत्याकांड प्रकरण

ठाणे, १६ जून (वार्ता.) – गडचिंचले (जिल्हा पालघर) येथे झालेली साधूंची हत्या हे हिंसक हिमनगाचे टोक आहे. पालघर जिल्ह्यातील तलासरी, डहाणू, जव्हार येथील आदिवासी समाज निरनिराळ्या ख्रिस्ती मिशनर्‍या आणि सी.पी.एम्. यांसारख्या राजकीय पक्षांच्या प्रभावाखाली काम करत आहे. या मंडळींचे खरे हेतू समोर येणे आवश्यक आहे. या सगळ्याची पाळेमुळे खणून काढून त्यांना आरोपी करणे, तसेच त्यांच्या विविध कारवायांमुळे निर्माण होणार्‍या कायदा-सुव्यवस्थेच्या प्रश्‍नापासून ते नक्षलग्रस्त भाग होण्यापर्यंतचे सगळे प्रश्‍न पडताळणे आवश्यक आहे. हेच लोक येथे घडणार्‍या हिंसक, लोकशाहीविरोधी, विकासविरोधी, घटनाविरोधी आणि हिंदुविरोधी कारवायांना कारणीभूत आहेत. सध्या आरोपी म्हणून ज्या आदिवासींना अटक करण्यात आले आहे, त्यातील खरे गुन्हेगार शोधून निर्दोष आदिवासींची तातडीने मुक्तता करावी, तसेच या प्रकरणाचे अन्वेषण राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणा (एन्.आय.ए.) आणि केंद्रीय अन्वेषण विभाग (सीबीआय) यांच्या माध्यमातून करावे, अशी मागणी विवेक विचार मंचच्या वतीने संतोष जनाठे यांनी केली आहे.

पालघर येथे झालेल्या साधूंच्या हत्याकांड प्रकरणानंतर विवेक विचार मंचच्या वतीने मुंबई उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती अंबादास जोशी यांच्या अध्यक्षतेखाली सत्यशोधन समिती स्थापन करण्यात आली आहे. त्यांनी केलेल्या चौकशीच्या अहवालाविषयी माहिती देण्यासाठी १६ जूनला ऑनलाईन पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.

(सौजन्य : NewsBharati)

या वेळी जनाठे यांनी मांडलेली अन्य सूत्रे . . .

१. आदिवासींना हिंदु परंपरांपासून तोडण्याचे षड्यंत्र या ठिकाणी चालू आहे. याला ख्रिस्ती मिशनर्‍यांचीही मोठी फूस आहे. ‘हिंदूंचे देव आपले नाहीत, हिंदूंच्या परंपरा आपल्या नाहीत’, असा मोठा अपप्रचार या ठिकाणी केला जात आहे. आदिवासी मेळाव्यात फादर निकोलस बारला आणि मिशनचे काम करणारे धर्मप्रचारक, तसेच ख्रिस्ती मिशनरी यांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती असणे, श्रीरामाला विरोध, वारकरी परंपरांना विरोध किंवा रावणपूजनाचा आग्रह करणे, अशा घटना येथे घडत आहेत.

२. हिंदुविरोधी काम करणारे आदिवासी एकता परिषदेचे काळूराम दोधडे यांच्यासारखे लोक येथे जातीधर्माच्या नावाखाली समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचे काम राजरोसपणे करत आहेत. हिंदूंच्या परंपरांच्या संदर्भात आदिवासी लोकांमध्ये अशाप्रकारे विषारी वातावरण निर्माण केल्याने हे लोक हिंसक होऊन संघर्ष निर्माण होण्याच्या घटना घडत आहेेत.

३. गडचिरोली, त्रिपुरा, प. बंगाल यांच्यासारख्या नक्षलप्रभावी क्षेत्रांमध्ये ज्या प्रकारे हिंसेचा आधार घेऊन विरोधी विचारांच्या मंडळींना संपवले जाते, तसेच येथेही मागील ४० वर्षे घडत आहे. मृत झालेल्या व्यक्ती साधू असल्याने या घटनेची चर्चा देशभर झाली; मात्र अनेक हिंसक आक्रमणे या भागात घडत आहेत. या सर्व गोष्टी लक्षात घेतल्या असता पालघर जिल्हा हा कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण करणार्‍या असामाजिक तत्त्वांचे केंद्रस्थान बनण्याची भीती निर्माण झाली आहे.