सांगलीत ‘एम्स्’ (AIIMS) रुग्णालय होण्यासाठी केंद्रशासनाकडे पाठपुरावा करणार ! – अमित देशमुख, वैद्यकीय शिक्षणमंत्री

श्री. अमित देशमुख

सांगली, १५ जून (वार्ता.) – कोरोनाचा संसर्ग ही जागतिक आपत्ती आहे. सांगली जिल्हा प्रशासनाने योग्य पद्धतीने परिस्थिती हाताळल्यामुळे येथे रुग्ण आणि मृत्यू दर अल्प आहे. भविष्यात कोरोनाचे रुग्ण लवकरात लवकर बरे व्हावेत, या उद्देशाने पूर्णपणे बरे झालेल्यांच्या रक्त संकलनासाठी ‘प्लाझ्मा बँक’ स्थापन करण्याचा शासनाचा मानस आहे, तसेच सांगलीमध्ये ‘एम्स्’ (अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था)रुग्णालय व्हावे, याविषयी केंद्रशासनाकडे पाठपुरावा करण्यात येईल, अशी माहिती राज्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी १५ जूनला पत्रकार बैठकीत दिली.

या वेळी वैद्यकीय शिक्षणमंत्री म्हणाले की,

१. राज्यशासनाच्या वतीने कोरोनावर अत्याधुनिक उपचारपद्धतीचा अवलंब करण्यात येत आहे. सध्या जगभरात प्रभावी ठरलेल्या ‘प्लाझ्मा थेरपी’च्या चाचण्या राज्यात विविध ठिकाणी चालू करण्यात आल्या आहेत. हा उपचार प्रभावी असून रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही चांगले आहे.

२. सांगली जिल्ह्याचा आढावा घेतला असता जिल्हा प्रशासन दायित्व घेऊन कार्य करीत असल्याचे दिसत आहे. राज्यशासनाच्या उपाययोजनांची सर्वांत प्रभावी कार्यवाही करण्यात सांगली जिल्हा प्रशासन यशस्वी ठरले आहे.

३. काहींच्या मते परगावाहून आलेल्या प्रवाशांमुळे कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत; परंतु पुणे, मुंबई येथून येणारे प्रवासी हे मूळ सांगलीचेच आहेत. त्यामुळे त्यांना अटकाव करण्याचा प्रश्‍नच येत नाही.

४. शासकीय रुग्णालयाचा विस्तार करण्याच्या संदर्भात आराखडा सिद्ध करण्याचे निर्देश देण्यात आले असून याविषयी कोणताही निधी शासनाकडून अल्प पडू देणार नाही. कोरोनाबाधितांवर आयुर्वेदिय आणि ‘होमिओपॅथी’ उपचार पद्धतीच्या अनुषंगानेही काम चालू आहे.