पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्रशासनाने प्रभावी कामगिरी केली ! – भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष प्रसाद लाड

मोदी शासनाच्या कामगिरीची माहिती देण्यासाठी भाजपची पत्रकार परिषद

रत्नागिरी – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्रशासनाने दुसर्‍या कार्यकाळाच्या पहिल्या वर्षात अत्यंत प्रभावी कामगिरी केली आहे, असे प्रतिपादन आमदार, तसेच भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष प्रसाद लाड यांनी येथे केले. मोदी शासनाच्या कामगिरीची माहिती देण्यासाठी भाजपच्या वतीने आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या वेळी जिल्हाध्यक्ष दीपक पटवर्धन, तालुकाध्यक्ष मुन्ना चवंडे आणि अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

आमदार प्रसाद लाड म्हणाले की,

१. भारताची लोकसंख्या आणि कोरोनाचा सर्वाधिक फटका बसलेल्या १४ देशांची एकत्रित लोकसंख्या जवळपास सारखीच आहे; मात्र १ जून २०२० ला या १४ देशांमधील एकत्रित लोकसंख्येपैकी कोरोनाचा संसर्ग झालेल्यांची संख्या भारताच्या २२.५ पट अधिक आहे. या १४ देशांमध्ये कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्याही भारतातील मृत्यूसंख्येच्या तुलनेत ५५.२ पट इतकी आहे. वेळीच लागू केलेली दळणवळण बंदी, झटपट वैद्यकीय सुविधा आणि रुग्णांवर प्रभावी उपचार यांमुळे हे शक्य झाले आहे.

२. कोरोनामुळे अर्थव्यवस्था ठप्प झाल्यामुळे झळ बसलेल्या दुर्बल घटकांना साहाय्यासाठी केंद्रशासनाने तातडीने १ लाख ७० सहस्र कोटी रुपयांचे प्रधानमंत्री गरीब कल्याण ‘पॅकेज’ घोषित केले.

३. आतापर्यंत सुमारे ४२ कोटी गरजूंना ५३,२४८ कोटी रुपयांचे साहाय्य देण्यात आले आहे.

४. कोट्यवधी लोकांना विनामूल्य धान्य, शेतकर्‍यांच्या बँक खात्यात थेट पैसे जमा करणे, गरीब कुटुंबांना विनामूल्य गॅस सिलिंडर देणे असे अनेक उपाय केंद्रशासनाने केले.

५. जम्मू काश्मीरला स्वतंत्र दर्जा देणारे घटनेचे कलम ३७० रहित करणे, तिहेरी तलाक बंदी घालणे, अयोध्या येथे राममंदिराच्या बांधकामासाठी ‘ट्रस्ट’ स्थापन करून बांधकाम चालू करणे असे महत्त्वाचे ऐतिहासिक निर्णय मोदी सरकारने घेतले.

कोरोना आणि निसर्ग चक्रीवादळाच्या काळात कोकणच्या मागे भाजप खंबीरपणे उभा आहे ! – प्रसाद लाड

महाराष्ट्र राज्यामध्ये ज्या व्यवस्था आपण उभ्या करायला हव्या होत्या, त्या आपण उभ्या करायला न्यून पडलो. ‘दळणवळण बंदी’ हे या व्यवस्था उभ्या करण्यासाठी केले होते. घरात बसून सरकार चालवता येत नाही. पर्यटनाला गेले म्हणणे सोपे असते, पर्यटनाला येण्याचेसुद्धा धाडस येथील मुख्यमंत्र्यांनी दाखवावे. महाराष्ट्रातील भाजप आणि केंद्रशासन या कोरोनाच्या काळात शंभर टक्के राज्यशासनाच्या मागे अन् निसर्ग चक्रीवादळाच्या काळात कोकणच्या मागे खंबीरपणे उभा आहे.