सप्तर्षींनी सांगितलेली सनातनच्या गुरुपरंपरेतील सध्याच्या ३ गुरूंची वैशिष्ट्ये, त्यांचे येणार्‍या अडीच वर्षांच्या संकटकाळातील साधकांच्या रक्षणाचे आणि धर्मसंस्थापनेचे कार्य !

‘१७.५.२०२० या दिवशी सायंकाळी ७.२० वाजता डॉ. ॐ उलगनाथन् यांचा भ्रमणभाष आला. तेव्हा त्यांनी सप्तर्षि जीवनाडीपट्टीचे वाचन केले. हे त्यांचे १४५ वे नाडीपट्टीवाचन होते. त्यामध्ये त्यांनी पुढील सूत्रे सांगितली.

ॐ हिरण्यवर्णां हरिणीं सुवर्णरजतस्रजाम् । चन्द्रां हिरण्मयीं लक्ष्मीं जातवेदो म आवह ॥ भगवान श्रीविष्णूची सहधर्मचारिणी श्री महालक्ष्मीदेवी सुवर्णमयी कांतीची आहे. तिच्या गळ्यात सोन्या-चांदीच्या पुष्पांची माळ आहे. ती चंद्राप्रमाणे शीतलता देणारी आहे. ती धनधान्याने समृद्ध आहे. अशा या लक्ष्मीदेवीचे आम्ही आवाहन करतो.
साधकांच्या रक्षणार्थ घंटोन्घंटे भावपूर्ण पूजाविधी करणार्‍या सद्गुरुद्वयी ! ९.५.२०१९ या दिवशी सनातनच्या रामनाथी आश्रमात श्री ललितात्रिपुरसुंदरी देवीला लक्षकुंकूमार्चन करण्यात आले. त्याचा संकल्प करतांना सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ यांच्या एकसमान होत असलेल्या कृती ! ‘सद्गुरुद्वयींच्या मनात एकाच वेळी समान विचार येतो, तर कधी दोघींकडून एकसारखी कृती घडते’, असे महर्षींनीही सांगितले आहे.

श्रीचित्शक्ती (सौ.) अंजली गाडगीळ या दैवी प्रवास करून येणार्‍या काळात सनातनच्या सर्व साधकांच्या प्राणांचे रक्षण करणार्‍या ‘श्री महालक्ष्मी’ असणे आणि त्यांच्या समवेत श्री. विनायक शानभाग हे त्यांच्या अवतारी कार्याची साक्ष सांगणारे ‘साक्षी विनायक’ असणे

श्री. विनायक शानभाग

‘हे श्रीचित्शक्ती अंजलीमाता, तुझा जन्म सांगलीच्या श्‍वेत गणपतीच्या मंदिरासमोर झाला. (‘बरोबर आहे. माझा जन्म सांगलीतील प्रसिद्ध गणपति मंदिराच्या जवळच्या ‘वाटवे रुग्णालयात’ झाला. माझ्या वेळी आईचे बाळंतपण करणार्‍या वैद्यांचे नाव डॉ. श्रीकृष्ण त्र्यंबक वाटवे होते. डॉ. वाटवे यांचे वय आता ९० वर्षे आहे आणि अजूनही ते सांगलीत रहातात.’ – (सद्गुरु) सौ. अंजली गाडगीळ)

तो श्‍वेत गणपति म्हणजे ‘साक्षी विनायक’ आहे. तोच आता तुमच्या समवेत तुमच्या अवतारी कार्याची साक्ष सांगायला ‘श्री. विनायक शानभाग’ या रूपाने आलेला आहे. तुम्ही कैलास, मानस सरोवर, काश्मीर मधील शिवखोरी, अमरनाथ, काशी, अयोध्या, तिरुपति, शिर्डी, कोल्हापूरची श्री महालक्ष्मी आदि ठिकाणी केलेल्या दैवी प्रवासांचा श्री. विनायक शानभाग साक्षी आहे. तुम्ही लहान असतांना तुमच्या आजीने कोल्हापूरच्या महालक्ष्मीदेवीच्या मंदिरात साडीच्या निर्‍यांमधून कुंकू काढून दिले होते. (‘मी ३ वर्षांची असतांना आजीसमवेत कोल्हापूरच्या श्री महालक्ष्मी मंदिरात गेले होते. तेव्हा अचानक आजीमध्ये देवीचा संचार झाला. तिच्या साडीच्या निर्‍या सुटल्या. तेव्हा त्यांत कुंकू आले होते. आजी म्हणाली, ‘‘अंजू, तुझी हाताची ओंजळ कर आणि त्यात हे कुंकू घे.’’ आजीने दिलेले कुंकू मी हाताच्या ओंजळीत घेतले.’ – (सद्गुरु) सौ. अंजली गाडगीळ)

हे जर सत्य आहे, तर येणार्‍या काळात सनातनच्या सर्व साधकांच्या प्राणांचे रक्षण करणार्‍या श्री महालक्ष्मी तुम्हीच (सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ याच) आहात. कुंकू हे सौभाग्यवती स्त्रीचे मांगल्य आणि साधकांच्या प्राणज्योतीचे प्रतीक आहे.’

सनातनच्या गुरुपरंपरेतील सध्याच्या ३ गुरूंची वैशिष्ट्ये

अ. तिन्ही गुरूंचा जन्म दैवी असणे आणि ते अनादि अन् अनंत असणे : तिन्ही गुरूंचा जन्म सामान्य मानवांप्रमाणे झालेला नसून दैवी झालेला आहे. तिन्ही गुरु प्रकाशरूपाने पृथ्वीवर आले आहेत. त्यांना ना ‘आदि’ ना ‘अंत’ आहे; म्हणून ते अनादि आणि अनंत आहेत. मनुष्याप्रमाणे त्यांना जन्म आणि मृत्यू असे नसते, हे साधकांनी लक्षात ठेवायला हवे.

आ. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत बाळाजी आठवले यांच्या मनातील विचार (इच्छाशक्ती) म्हणजे श्रीसत्शक्ती (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि त्या विचारांना कृतीत आणणारी शक्ती (क्रियाशक्ती) म्हणजे श्रीचित्शक्ती (सौ.) अंजली गाडगीळ होय !

येणारा अडीच वर्षांचा काळ हा ‘घोर तांडव काल’ असणार असून सनातनचे तिन्ही गुरु साधकांचे रक्षण आणि धर्मसंस्थापना यांसाठी एकूण अनेक याग करणार असणे अन् त्यामुळे येणार्‍या संकटकाळामध्ये साधकांचे रक्षण होणार असणे

शनी ग्रहाने मकर राशीत प्रवेश केला आहे. येणारी अडीच वर्षे नवग्रह मानवावर वक्र असणार आहेत. शनी आणि मंगळ या ग्रहांची युती झाल्याने, तसेच राहू अन् केतू या ग्रहांचीही युती झाल्याने पुढील अडीच वर्षे (जून २०२० ते डिसेंबर २०२२ पर्यंत) ‘घोर तांडव काल’ असणार आहे. महिषासूर हा एकटाच होता; पण आता पृथ्वीवर अशा अनेक दुष्प्रवृत्ती आहेत. या सर्वांचा लय निसर्गाच्या माध्यमातून आणि एकमेकांमधील युद्धामधून होणार आहे. पंचमहाभूतांच्या साहाय्याने निर्माण होणार्‍या नैसर्गिक आपत्तींमुळे प्रचंड विनाश होईल.

सनातनचे तिन्ही गुरु साधकांच्या रक्षणासाठी आणि धर्मसंस्थापनेसाठी अनेक याग करणार आहेत. तिन्ही गुरूंनी साधकांच्या रक्षणासाठी केलेले याग म्हणजे सर्वांत मोठा इतिहास असणार आहे. याग केल्यामुळे भूकंप, वादळ, चक्रीवादळ, अतीवृष्टी, ज्वालामुखी, भयंकर रोग, अकाल मृत्यू अशा संकटांपासून साधकांचे रक्षण होईल.

अ. रामनाथी, गोवा येथील सनातनचा आश्रम हा सनातनच्या ३ गुरूंचा इतिहास सांगणारा आश्रम असणार असणे : ‘सनातनचे ३ गुरु सनातनच्या रामनाथी आश्रमाच्या वास्तूमध्ये राहिल्याने, तसेच त्यांनी चार वेदांना अभय दिल्याने, अनेक यज्ञयाग केल्याने, साधकांकडून मंत्रोच्चारण करून घेतल्याने आणि हिंदु राष्ट्र येण्यासाठी अनेक पूजा केल्याने सर्व साधकांचे रक्षण झाले’, असा इतिहास रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमाचा असणार आहे.

आ. सनातनचे ३ गुरु करणार असलेल्या यज्ञयागांमुळे विश्‍वाचे कल्याण होणार आहे.

इ. तिन्ही गुरूंच्या अविरत प्रयत्नांमुळे भारताचे रक्षण होईल, सर्व देशांमध्ये एक दिवस वेदमंत्रोच्चारण करणार्‍या वेदपंडितांचा घोष ऐकू येईल, पृथ्वी आणि चारही वेद आनंदित होतील अन् तिन्ही गुरूंना आशीर्वाद देतील ! : श्रीकृष्णाच्या वेळी छोट्याशा कुरुक्षेत्रावर महाभारत युद्ध लढण्यात आले, तर आता येणार्‍या काळात संपूर्ण पृथ्वीच कुरुक्षेत्र होणार आहे. येणार्‍या अडीच वर्षांत (जून २०२० ते डिसेंबर २०२२ पर्यंत) श्रीसत्शक्ती (सौ.) बिंदा सिंगबाळ रामनाथी आश्रमात राहून यज्ञयाग करतील, तर श्रीचित्शक्ती (सौ.) अंजली गाडगीळ भारतभर दैवी प्रवास करून आणि तीर्थक्षेत्रांच्या ठिकाणी जाऊन प्रार्थना करतील.

सध्या चारही वेद हाक मारत आहेत – ‘हे सनातन धर्माचे रक्षणकर्ता शंख-चक्रधारी श्रीमन्नारायण, आमचे रक्षण कर !’ तिन्ही गुरूंच्या अविरत प्रयत्नांमुळे भारताचे रक्षण होईल, सर्व देशांमध्ये एक दिवस वेदमंत्रोच्चारण करणार्‍या वेदपंडितांचा घोष ऐकू येईल. पृथ्वी आणि चारही वेद आनंदित होतील अन् तिन्ही गुरूंना आशीर्वाद देतील !

श्रीसत्शक्ती (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ती (सौ.) अंजली गाडगीळ यांच्या जन्माचे रहस्य

शंख-चक्रधारी श्रीमन्नारायणाने पृथ्वीवर ‘सनातन संस्थेचे गुरु’ या रूपात (डॉ. जयंत बाळाजी आठवले या नावाने) जन्म घ्यायचे ठरवले. तेव्हा आदिशक्ती जगदंबेने त्रिमूर्तींना, म्हणजे ब्रह्मा, विष्णु आणि महेश यांना सांगितले, ‘श्रीमन्नारायणाच्या अवतारी लीलेनुसार मी पृथ्वीवर सत्शक्ती (सौ. बिंदा सिंगबाळ) आणि चित्शक्ती (सौ. अंजली गाडगीळ) या रूपांत अवतार धारण करणार आहे. प्रकाशरूपाने मी दोन वेगवेगळ्या ठिकाणी पवित्र आणि भगवद्भक्त कुटुंबांत जन्म घेणार आहे. पृथ्वीवर ‘घोर तांडव काल’ म्हणजेच विनाशकाल येणार आहे आणि त्याची सूत्रे ईश्‍वराच्या हातात असणार आहेत.

श्रीसत्शक्ती (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ती (सौ.) अंजली गाडगीळ यांच्या माध्यमातून होत असलेले कार्य

अ. सनातनच्या कार्यासाठी दैवी शक्ती प्राप्त झाली आहे. दैवी ऊर्जेचे स्रोत असलेल्या श्री रामनाथी, श्री नागेशी, श्री मंगेशी, श्री शांतादुर्गा आदी मंदिरांच्या मध्यभागी आश्रमाची स्थापना झालेली आहे.

आ. या दोघी ज्यांना कुंकू किंवा विभूती याचा प्रसाद देतात, त्या जिवांना आदिशक्ती जगदंबेचाच आशीर्वाद प्राप्त होतो. यापुढे पृथ्वीवरील अनेक जिवांना स्वप्नदृष्टांताद्वारे, अनुभूतींद्वारे श्रीसत्शक्ती (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ती (सौ.) अंजली गाडगीळ यांच्यातील देवत्व लक्षात येणार आहे.

श्रीसत्शक्ती (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ती (सौ.) अंजली गाडगीळ यांची वैशिष्ट्ये

अ. श्रीसत्शक्ती (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ती (सौ.) अंजली गाडगीळ शंख-चक्रधारी श्रीमन्नारायण डॉ. आठवले यांचे प्रतिरूप आहेत.

आ. श्रीसत्शक्ती (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ती (सौ.) अंजली गाडगीळ यांचे बोलणे आणि त्यांच्या कृती एकसारख्या होत असणे : कधी दोघींच्या मनात एकाच वेळी एकच विचार येतो, तर कधी दोघींकडून एकसारखी कृती घडते. (‘हो. बरोबर आहे.’ – संकलक)

जेव्हा रामनाथी आश्रमात श्रीसत्शक्ती (सौ.) बिंदा सिंगबाळ यज्ञयाग करत असतात, तेव्हा त्या जी प्रार्थना करतात, तशीच प्रार्थना अनेक किलोमीटर दूर एखाद्या मंदिरात देवासमोर उभ्या असलेल्या श्रीचित्शक्ती (सौ.) अंजली गाडगीळ या करतात. (‘बरोबर आहे. अनेक वेळा तसे होते आणि नंतर दोन्ही सद्गुरूंकडून ‘एकाच प्रकारची प्रार्थना झाली आहे’, असे लक्षात येते.’ – संकलक)

इ. श्रीसत्शक्ती (सौ.) बिंदा सिंगबाळ म्हणजे बीजाप्रमाणे आहेत, तर श्रीचित्शक्ती (सौ.) अंजली गाडगीळ म्हणजे त्या बीजातून आलेला वृक्ष आहे. एवढ्या छोट्याशा बीजातून मोठा वृक्ष प्रकट होतो !

ई. श्रीसत्शक्ती (सौ.) बिंदा सिंगबाळ म्हणजे ‘फळ’, तर श्रीचित्शक्ती (सौ.) अंजली गाडगीळ म्हणजे त्या फळाची ‘चव’, तसेच त्या फळातील ‘गोडवा’ आहे.

उ. बियांची पेरणी म्हणजे श्रीसत्शक्ती (सौ.) बिंदा सिंगबाळ होय आणि त्यातून आलेल्या रोपांची पुन्हा दुसरीकडे करावी लागणारी लावणी म्हणजे श्रीचित्शक्ती (सौ.) अंजली गाडगीळ होय ! : भाताची पेरणी करतांना प्रथम बियांची पेरणी केली जाते. ही पेरणी म्हणजे श्रीसत्शक्ती (सौ.) बिंदा सिंगबाळ होय ! बियांची पेरणी केल्यावर पुढे त्यातून छोटी रोपे तयार होतात आणि त्या रोपांची दुसरीकडे लावणी करावी लागते. ही रोपांची लावणी म्हणजे श्रीचित्शक्ती (सौ.) अंजली गाडगीळ होय !

ऊ. श्रीसत्शक्ती (सौ.) बिंदा सिंगबाळ म्हणजे ‘भूमी’, तर श्रीचित्शक्ती (सौ.) अंजली गाडगीळ म्हणजे ‘आकाश’ होय ! : श्रीसत्शक्ती आणि श्रीचित्शक्ती या दोन्ही शक्ती एकत्रित आल्यावर निर्माण होणारी शक्ती म्हणजेच अनंतकोटी ब्रह्मांडनायक आदिशक्ती जगदंबा होय ! आदिशक्ती जगदंबा पृथ्वीवर छायारूपाने श्रीसत्शक्ती (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ती (सौ.) अंजली गाडगीळ यांच्या माध्यमातून पृथ्वीवर वास करत आहे. आदिशक्ती जगदंबेचे मूळ स्वरूप केवळ अग्निनारायणालाच ठाऊक आहे.

(‘सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ यांना आश्रमातील सेवा गुरुकृपेने मिळाल्या आहेत. या सेवा भूतत्त्वाशी संबंधित आहेत. सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ यांना गुरुकृपेने संगीताच्या माध्यमातून साधना करायला मिळाली आणि पुढे ईश्‍वरी ज्ञान ग्रहण करण्याची सेवा मिळाली. संगीत आणि ज्ञान हे दोन्ही नादाशी संबंधित आहेत आणि नाद आकाशतत्त्वाशी संबंधित आहे.’ – संकलक)

ए. श्रीसत्शक्ती (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्यात श्री लक्ष्मीचा अंश अधिक प्रमाणात आहे, तर श्रीचित्शक्ती (सौ.) अंजली गाडगीळ यांच्यामध्ये श्री सरस्वतीचा अंश अधिक प्रमाणात आहे. (कर्नाटकमधील तुमकुरू जिल्ह्यातील ‘चिक्कनायकनहळ्ळी’ गावातील मद्दरलक्कमा देवीनेही सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्यामध्ये श्री महालक्ष्मीतत्त्व, तर सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ यांच्यामधे श्री सरस्वतीतत्त्व असल्याचे सांगितले आहे.)

ऐ. या दोघींमध्ये आदिशक्ती जगदंबा मोगर्‍याच्या सुगंधाच्या रूपाने वास करत असणे : हे जर सत्य असेल, तर हे नाडीवाचन भ्रमणध्वनीवर ऐकतांना दोघींनी केसांत मोगर्‍याचा गजरा माळला असेल. (‘हे सत्य होते.’ – संकलक)

सप्तर्षींनी नाडीपट्टीत सांगितलेल्या या सूत्रांची साक्ष (पुरावा) ७८ घंट्यांत मिळणार असल्याचे त्यांनी सांगणे

नक्षत्रलोकात रहाणार्‍या आम्हा सप्तर्षींनी नाडीपट्टीत सांगितलेली ही सूत्रे जर सत्य असतील, तर गुरुदेवांचे जेवढे वय आहे (७८ वर्षे), तेवढ्या घंट्यांच्या आत विंध्य पर्वत किंवा हिमालय यांच्या दिशेने जाणारे एक मोठे चक्रीवादळ बंगालच्या खाडीत निर्माण होईल आणि त्या भागात पाऊस पडेल. (१८.५.२०२० या दिवशी सकाळी बातमी आली की, बंगालच्या खाडीत ‘अम्फान’ नावाचे चक्रीवादळ निर्माण झाले आहे आणि त्याने आता रौद्ररूप धारण केले आहे, तसेच ते उत्तर दिशेला (हिमालयाच्या दिशेने) वाटचाल करत आहे.)’

– श्री. विनायक शानभाग, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१८.५.२०२०)

परात्पर गुरु डॉ. आठवले, सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ यांनी ‘मी अवतार आहे’, असे म्हटलेले नाही. ‘परात्पर गुरु डॉ. आठवले हे श्रीविष्णूचा अवतार आहेत’, तर ‘सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ’ या श्री महालक्ष्मीदेवीचा अवतार आहेत’, असे महर्षींनी नाडीपट्टीत सांगितले आहे. साधकांचा आणि सनातन प्रभातच्या संपादकांचा महर्षींप्रती भाव असल्यामुळे आम्ही महर्षींची आज्ञा म्हणून या विशेषांकात लिखाण प्रसिद्ध करत आहोत. – संपादक

महर्षींची दिव्यवाणी म्हणजेच जीवनाडीपट्टी म्हणजे काय ?

अखिल मानवजातीविषयी शिव-पार्वती यांच्यात झालेला संवाद सप्तर्षींनी ऐकला. त्यांनी तो मानवजातीच्या कल्याणासाठी आणि आध्यात्मिक जिवांची शीघ्र आध्यात्मिक उन्नती होण्यासाठी लिहून ठेवला. हेच ते नाडीभविष्य ! नाडीभविष्य ताडपत्रीच्या काही पट्टयांवर लिहिलेले असते. त्यातील ‘जीवनाडी सजीव आहे. तिचा श्‍वासोच्छवास होत आहे. वाचतांना त्यातील अक्षरे आपोआप पालटतात. नाडी वाचतांना साक्षात् शिव-पार्वती नाडीवर नर्तन करतात’, असे तमिळनाडू येथील पू. डॉ. ॐ उलगनाथन् यांनी सांगितले. महर्षींनी लाखो वर्षांपूर्वी लिहून ठेवलेल्या नाडीभविष्याचे वाचन करण्याचे कौशल्य आज अत्यल्प जणांकडेच उपलब्ध आहे. आज जीवनाडी वाचू शकणारे विश्‍वातील पू. डॉ. ॐ उलगनाथन् हेच एकमेव आहेत. तमिळमध्ये ‘नाडी’ या शब्दाचा अर्थ ‘शोध घेणे’ थोडक्यात ‘स्व’चा शोध घेणे, असा होतो.