विमानाने येणार्‍या प्रवाशांची ‘अ‍ॅन्टीबॉडी’ चाचणी करण्यासंबंधी गोवा शासनाची नागरी विमानसेवा खात्याला विनंती

पणजी, २३ मे (वार्ता.) – सोमवारपासून गोव्यातील विमानतळावर देशांतर्गत विमानसेवा चालू होणार आहे. या पार्श्‍वभूमीवर आरोग्यमंत्री विश्‍वजित राणे यांनी विमानातून आलेल्या प्रवाशांची अ‍ॅन्टीबॉडी चाचणी करण्याविषयी नागरी विमान खात्याला विनंती केली आहे. दाबोळी येथील विमानतळावर सोमवारी बेंगळुरू, हैद्राबाद, देहली, मुंबई, मैैसुरू आणि इतर ठिकाणांहून एकूण १५ विमाने गोव्यात येणार आहेत.  ते म्हणाले, ‘‘गोवा राज्याच्या हिताच्या दृष्टीने मी भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद (आयसीएम्आर्) आणि नागरी विमानसेवा खात्याला ही विनंती केली आहे. असे झाल्यास गोव्यात येणार्‍या विमानातील प्रवाशांची अ‍ॅन्टीबॉडी चाचणी करून त्यांचा कोविड-१९ चाचणीचा अहवाल नकारात्मक आल्यास त्यांना तसे प्रमाणपत्र देता येईल. या प्रवाशांची विमानतळावरच चाचणी केल्यामुळे कोरोनाचे सामाजिक प्रसारण थांबवता येईल. आम्हाला या संदर्भात सकारात्मक प्रतिसाद मिळेल, अशी आशा आहे.’’

विमान प्रवाशांसाठी नियमावली लागू

सायंकाळी उशिरा गोवा शासनाने विमान प्रवाशांसाठी नियमावली लागू केली आहे. यात दाबोली विमानतळावर पोचल्यावर थर्मल तपासणी झाल्यानंतर प्रवाशांसाठी २ पर्याय रहातील. एक त्यांनी २ सहस्र रुपये भरून कोरोनाशी संबंधित चाचणी करून घेऊन प्रमाणपत्र घ्यावे आणि दुसरे सरकारला प्रतिज्ञापत्र (डिक्लेरेशन) देऊन १४ दिवस गृहअलगीकरणात रहावे.