कोरोनामुळे आर्थर रोड कारागृहातील बंदीवानांचे मृत्यू झाल्यास परिस्थिती हाताबाहेर जाईल ! – अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर, हिंदु विधिज्ञ परिषद

अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर

मुंबई, २३ मे (वार्ता.) – ११ मे या दिवशी प्रसिद्ध झालेल्या बातमीनुसार आर्थर रोड कारागृहातील कर्मचारी आणि बंदीवान मिळून १८० जणांची कोरोना चाचणी केली केली असता त्यामध्ये १५८ जण कोरोनाबाधित असल्याचे आढळून आले. हे अत्यंत गंभीर आहे. या पार्श्‍वभूमीवर साधारण १८ मार्चपासून बंदीवानांना त्यांचे नातेवाईक आणि अधिवक्ता यांना भेटण्यास बंदी करण्यात आली आहे. कारागृह प्रशासन कारागृहातील गंभीर परिस्थिती लपवून ठेवत आहे. अशामुळे कारागृहातून बंदीवानांचे मृतदेह बाहेर आणावे लागतील. असेच चालू राहिले, तर आर्थर रोड कारागृहातील परिस्थिती हाताबाहेर जाईल, अशी भिती हिंदु विधीज्ञ परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर यांनी व्यक्त केली. अधिवक्ता इचलकरंजीकर यांनी २३ मे या दिवशी फेसबूकद्वारे पत्रकार परिषद घेऊन ही माहिती दिली. या वेळी नालासोपारा शस्त्रसाठा खटल्यातील काही आरोपींच्या नातेवाइकांनीही पत्रकारांना संबोधित केले.

या वेळी अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर म्हणाले की,

१. बंदीवानांना नातेवाईक आणि अधिवक्ता यांना दूरभाषवरून संपर्कही बंद करण्यात आले आहेत. आता तर कारागृह प्रशासन बाहेरून आलेले दूरभाष घेत नाहीत, अशी परिस्थिती आहे. त्यामुळे बंदीवान आणि नातेवाईक यांना एकमेकांची चिंता असणे स्वाभाविक आहे.

२. कारागृह प्रशासन बंदीवानांच्या मानवाधिकारांचे हनन करत आहे. कारागृहात बंदीवानांचा मृत्यू झाला, तर तो मृत्यू नसून हत्या असेल. कारागृह प्रशासनाने बंदीवानांच्या आरोग्याची काळजी घ्यावी.

३. या प्रकरणी न्यायालयात याचिका प्रविष्ट केलेली असली, तरी कारागृह प्रशासनाने माणुसकी दाखवायला हवी.

अटकेत असलेले गोरक्षक श्री. वैभव राऊत यांच्या पत्नी सौ. लक्ष्मी राऊत या वेळी म्हणाल्या की, श्री. राऊत यांची शेवटची भेट होऊन २ मासांहून अधिक काळ गेला आहे. श्री. राऊत यांच्या जीवाला काही बरे-वाईट झाले, तर त्याचे दायित्व कोण घेणार ?

अटकेत असलेले श्री. सुधन्वा गोंधळेकर (जिल्हा सातारा) यांच्या पत्नी सौ. गीतांजली गोंधळेकर त्यांची व्यथा मांडतांना म्हणाल्या की, माझे पती निर्दोष आहेत. अटक होऊन २ वर्षे झाली तरी, अद्याप खटलाही चालू झालेला नाही. अटकेत असलेले गणेश मिस्किन यांचे भाऊ श्री. रवि मिस्किन यांनीही या वेळी त्यांची व्यथा मांडली. या सर्व नातेवाईकांनी सांगितले की, प्रशासन आणि गृहमंत्री यांना पत्रे लिहूनही त्यावर काहीही झालेले नाही. त्यामुळे पत्रकारांनी आमची व्यथा शासनापर्यंत पोचवावी आणि सर्वच बंदीवानांना न्याय मिळावा.

या वेळी बंदीवानांच्या नातेवाइकांनी पुढील मागण्या केल्या –

१. बंदीवानांना स्वत:च्या नातेवाइकांशी किमान १ दिवस आड बोलू दिले जावे.

२. न्यायाधिशांनी कारागृहाला भेट देणे बंद झाले आहे, ते पुन्हा चालू करावे. जेणेकरून बंदीवानांच्या अडचणी सुटतील.

३. बंदीवानांना चांगल्या प्रतीचे मास्क, सॅनिटायझर्स, आयुष मंत्रालयाने प्रमाणित केलेली औषधे देऊन तज्ञ आधुनिक वैद्यांकडून त्यांची नियमितपणे आरोग्य पडताळणी करण्यात यावी.

४. सर्व बंदीवानांची एकदा तरी कोरोना चाचणी करण्यात यावी. तसेच बंदीवानांना  रत्नागिरी, सिंधुदुर्ग अशा अल्प लागण असलेल्या जिल्ह्यांतील कारागृहात हालवले जावे.