सत्याचा सूर्योदय !

अयोध्येतील ६७ एकरच्या रामजन्मभूमीच्या परिसरात

राममंदिराच्या बांधकामाच्या वेळी विविध देवतांच्या खंडित मूर्ती, वेगवेगळ्या आकृत्यांचे आणि कलाकुसर केलेले दगड, ७ ‘ब्लॅक टच’ स्तंभ, लाल वाळूच्या दगडांचे ६ स्तंभ, पुष्पकलश आणि ५ फुटांच्या आकाराचे नक्षीयुक्त शिवलिंग सापडले आहे. या घटनेमुळे रामभक्त आणि हिंदू यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. मशिदीच्या ठिकाणी आधी राममंदिर होते, हे पुन्हा एकदा निर्विवाद सिद्ध झाले. यानंतर अनेकांनी ‘जय श्रीराम’, असा जयघोषही केला. अयोध्येतील प्रत्येक कणाकणात श्रीराम आहे. त्यामुळे सत्याच्या सूर्याचा उदय झाला आहे. सनातन धर्म हा अनंत आणि अविनाशी आहे. जे सत्य असतेे, ते कधीही नष्ट होत नाही, अयशस्वी होत नाही किंवा लपूनही रहात नाही. त्यामुळे राममंदिराच्या संदर्भातील हे सत्य खरोखर इतिहासात सुवर्णाक्षरांनी कोरले गेले पाहिजे. रामजन्मभूमीचा इतिहास कपोलकल्पित नव्हताच. त्यामुळे ज्यांनी ज्यांनी रामजन्मभूमीचे अस्तित्व मानण्यास विरोध केला, मग ते निधर्मीवादी असोत, पुरोगामी असोत, धर्मांध असोत किंवा श्रीरामाला ‘काल्पनिक’ मानणारे असोत, अशांना साक्षात् भगवान श्रीरामाच्या अस्त्विाचे पुरावे सापडल्याने चपराकच मिळाली आहे. या पुराव्यांची छायाचित्रे तर त्यांच्या डोळ्यांत झणझणीत अंजन घालणारीच आहेत. ‘राम हे ऐतिहासिक व्यक्तिमत्त्व नसून काल्पनिक आहे’, असे प्रतिज्ञापत्र तत्कालीन काँग्रेस सरकारने न्यायालयात सादर केले होते. देशाच्या भावविश्‍वाचा प्राण असलेल्या श्रीरामाचे अस्तित्व धर्मांधांनी नाकारले होते. ते सर्वच आता तोंडघशी पडले आहेत. ‘धर्मांधांच्या कह्यात असणार्‍या सर्वच ठिकाणच्या जमिनी खोदल्यास तेथे मंदिरांशी संबंधित अनेक अवशेष किंवा मूर्ती मिळतील’, अशी हिंदूंची श्रद्धा आहे. परकीय आक्रमकांनी अनेक ठिकाणी लूट करून मंदिरातील पुजार्‍यांच्या हत्या केल्या, तसेच तेथील मूर्तीही तोडल्या. याचीच प्रचीती आज अयोध्येतील घटनेवरून येते; पण केवळ अयोध्याच नव्हे, तर काशी, मथुरा, देहली, आगरा, भाग्यनगर, इंडोनेशिया आणि मलेशिया अशा ठिकाणीही खोदकाम केल्यास विभिन्न आक्रमकांच्या झंझावातात नष्ट झालेली हिंदु संस्कृती, मंदिरे, मूर्ती यांच्या अस्तित्वाचे पुरावे सापडतील, हे निश्‍चित ! हिंदूंनी आजपर्यंत अनेक अन्याय-अत्याचार सहन केले. गेली ७२ वर्षे धर्मांधांचे तुष्टीकरण केले गेल्याने प्रत्येक वेळी आवाज दाबला गेला तो हिंदूंचा ! तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करावा लागला, तोही हिंदूंनाच ! हिंदूंनी रामजन्मभूमी मिळण्यासाठी केलेले आंदोलनही अपकीर्त करण्यात आले. राममंदिरासाठी हिंदूंनाच पुष्कळ वर्षे प्रतीक्षा करावी लागली. शेवटी सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर हिंदू आणि रामभक्त यांचे राममंदिराच्या निर्मितीचे स्वप्न खर्‍या अर्थाने साकार होण्यास प्रारंभ झाला. कोट्यवधी हिंदूंच्या आस्थेचे प्रतीक असणारे राममंदिर उभारले जाणारच आहे. आतापर्यंत विविध आक्रमकांनी केलेल्या र्‍हासामुळे निष्कलंक अयोध्या कलंकित झाली होती; परंतु ‘निकालानंतर घडणार्‍या अशा अनेक सकारात्मक घटनांमुळे अयोध्येला गतवैभव प्राप्त होत आहे. ती पुन्हा एकदा खर्‍या अर्थाने पवित्र होत आहे’, असे म्हणता येईल. राममंदिराचे स्वप्नही दृग्गोचर होत आहे.

रामजन्मभूमीचा प्रेरणादायी इतिहास

इतिहासात अयोध्यानगरी श्रीरामाचे पूर्वज विवस्वणचे पुत्र वैवस्वत मनु यांनी वसवली असल्याचे म्हटले जाते. महाभारताच्या युद्धानंतर अयोध्यानगरी उजाड झाली होती; पण रामजन्मभूमीचे अस्तित्व तसेच होते. एकदा उज्जैनचे सम्राट चक्रवर्ती विक्रमादित्य अयोध्येत आले. ते शरयू नदीच्या किनारी बसले असतांनाही त्यांना वेगळाच अनुभव आल्याने त्यांनी तेथील साधूसंतांना विचारले. तेव्हा ती रामजन्मभूमी असल्याचे त्यांना समजले. त्यानंतर विक्रमादित्य यांनी तेथे भव्य राममंदिर, महाल, तळी बांधली आणि त्या भूमीचा जीर्णोद्धार केला. रामजन्मभूमीचा हा इतिहास हिंदूंसाठी निश्‍चितच प्रेरणादायीच आहे. श्रीरामाच्या अजरामर कर्तृत्वाची पताका ही अयोध्यानगरी आज खांद्यांवर मिरवत आहे.

हिंदूंचा अभूतपूर्व लढा !

‘अयोध्येत बांधकामाच्या वेळी मिळालेल्या मूर्तींमुळे श्रीरामावरील श्रद्धेला समर्थनच मिळत आहे. घुसखोर शासकांनी मंदिर पाडून मशीद उभारल्याचेही सिद्ध होत आहे’, असे मत विश्‍व हिंदु परिषदेचे नेते आणि श्रीरामजन्मभूमी तीर्थक्षेत्र विश्‍वस्त मंडळाचे सरचिटणीस चंपत राय यांनी व्यक्त केले, तर हिंदु महासभेचे रामजन्मभूमी खटल्यातील अधिवक्ता विष्णु शंकर जैन म्हणाले, ‘‘सर्वोच्च न्यायालयात सुनावणीच्या वेळी मुसलमान पक्षाने आमच्यावर ‘हिंदु तालिबान’ असल्याचा आरोप केला होता, तसेच या ठिकाणी कोणत्याही मंदिराचे अवशेष सापडले नसल्याचेही म्हटले होते. आता सापडलेल्या पुरातन मूर्ती त्यांच्या आरोपांना उत्तर आहेत. येथे अनेक मंदिरांचे अवशेष असल्याचे आम्ही सर्वोच्च न्यायालयालाही सांगितले होते. याआधीही खोदकामाच्या वेळी शिवलिंग आढळले होते. पुरातत्व विभागाने परिसरात मंदिरांचे अनेक अवशेष असल्याचे म्हटले होते. याचीच सत्यता पुराव्यांवरून सिद्ध होते.’’ मशिदीच्या खाली राममंदिराची मोठी रचना असल्याचे आता उघड झाले आहेच, तर ‘मुसलमानांना देण्यात आलेल्या ५ एकर भूमीची तरी काय आवश्यकता ? तीसुद्धा लवकरात लवकर परत घ्यायला हवी’, अशी जनभावनाही हिंदूंच्या मनात आहे. आतापर्यंत अनेक हिंदू आणि रामभक्त यांनी रामजन्मभूमीसाठी दिलेल्या अभूतपूर्व लढ्यामुळे राममंदिराच्या उभारणीच्या कामाला प्रारंभ झाला आहे. राममंदिराची उभारणी होऊन ज्या दिवशी सर्व हिंदू श्रीरामाच्या दर्शनासाठी मंदिरात प्रवेश करतील, तो दिवस म्हणजे या लढ्याचा खर्‍या अर्थाने विजयदिनच असेल !