पडवे येथील वैद्यकीय महाविद्यालयात कोरोना बाधित रुग्णांचे ‘स्वॅब’चे नमुने तपासण्याची यंत्रणाच अस्तित्वात नाही ! – पालकमंत्री उदय सामंत

मंत्री उदय सामंत

कणकवली – तालुक्यातील पडवे येथील वैद्यकीय महाविद्यालयात कोरोनाबाधित रुग्णांच्या घशातील स्राव (स्वॅब) स्वीकारण्याची प्रयोगशाळा अस्तित्वात नसल्याने या विषयावर वाद निरर्थक असल्याचे मत पालकमंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केले. या वैद्यकीय महाविद्यालयात ‘स्वॅब’ तपासण्याची प्रयोगशाळा कार्यान्वित नसल्याचा अहवाल जिल्हा शल्यचिकित्सक यांनी दिल्यामुळे हा वाद संपुष्टात आला आहे.

‘सिंधुदुर्ग शिक्षण प्रसारक मंडळ’ संचलित पडवे येथील वैद्यकीय महाविद्यालयाला नुकतीच अनुमती मिळाली असून तेथे १५० विद्यार्थी एम्.बी.बी.एस्. पदवीचे शिक्षण घेऊ शकतात, अशी माहिती माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान खासदार नारायण राणे यांनी नुकतीच दिली. जिल्ह्यातील कोरोनाबाधितांच्या ‘स्वॅब’चे नमुने यापूर्वी मिरज येथे पाठवण्यात येत होते. त्यानंतर ते बांबोळी, गोवा येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे ‘जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांचे ‘स्वॅब’चे नमुने तपासणीसाठी इतरत्र पाठवले जातात, पालकमंत्री जाणीवपूर्वक राजकारण करत आहेत’, असे आरोप होत होते. त्यामुळे पालकमंत्री उदय सामंत यांनी ‘यात कोणतेही राजकारण नसल्याचे सांगून उपरोक्त वैद्यकीय महाविद्यालयात ‘स्वॅब’ तपासणीची सुविधा आहे का ? हे तपासावे’, असा आदेश जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. चाकूरकर यांना दिला होता. त्यानुसार पडवे वैद्यकीय महाविद्यालयात पहाणी करून अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सकांनी, ‘पडवे वैद्यकीय महाविद्यालयात कोरोनाग्रस्त रुग्णांचे ‘स्वॅब’चे नमुने तपासणीची यंत्रणाच अस्तित्वात नाही. स्वतंत्र ‘मायक्रोबायोलॉजी’ची प्रयोगशाळा नाही. प्रयोगशाळा तंत्रज्ञांनादेखील ‘मायक्रोबायोलॉजी प्रयोगशाळेत काम केल्याचा अनुभव नाही’, असा अहवाल पाठवल्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी या वेळी सांगितले.