दळणवळण बंदीच्या काळात अवैध कृत्यांना आळा घालण्यासाठी सिंधुदुर्ग पोलीस दलाकडून ‘सिंधु पोलीस अ‍ॅप’ची निर्मिती

सिंधुदुर्ग (जि.मा.का) – दळणवळण बंदीच्या काळात जमावबंदीचे उल्लंघन, अवैध स्थलांतर, विध्वंसक वर्तन, संशयास्पद हालचाली किंवा अन्य अवैध कृत्ये, तसेच अलगीकरणाचे नियम न पाळणारे या सर्वांची माहिती पोलिसांना तात्काळ कळावी, यासाठी सिंधुदुर्ग पोलीस दलाच्या वतीने ‘सिंधु पोलीस’ (Sindhu Police) हे ‘अ‍ॅप’ सिद्ध करण्यात आले आहे.

या ‘अ‍ॅप’च्या माध्यमातून जिल्ह्यातील नागरिक एखाद्या नियमबाह्य कृत्याचे छायाचित्र काढून तात्काळ जिल्हा पोलीस नियंत्रण कक्षास कळवू शकणार आहेत. नागरिकांनी पाठवलेल्या छायाचित्रासह अक्षांश आणि रेखांश यांची सुविधा उपलब्ध असल्याने पोलीस नियंत्रण कक्षास सदर कृत्य कोणत्या पोलीस ठाण्याच्या सीमेत घडत आहे, याविषयी अचूक माहिती मिळणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील ३० विभागीय गस्तीच्या (सेक्टर पेट्रोलिंग) वाहनांपैकी जवळच्या वाहनास संपर्क साधून संबंधित ठिकाणी पोलीस पथक तात्काळ पाठवून नियमबाह्य कृत्यास आळा घालू शकतील. हे ‘अ‍ॅप’ ‘गूगल प्ले स्टोअर’वर उपलब्ध असून त्याची लिंक https://play.google.com/store/apps/details?id=com.sindhu.police अशी आहे. हा ‘अ‍ॅप’ ‘डाऊनलोड’ करता यावा, यासाठी https://rebrand.iy/sindhupolice ही सोपी लिंक सिद्ध करण्यात आली आहे. ‘तरी जिल्ह्यातील अधिकाधिक नागरिकांनी या सुविधेचा लाभ घेऊन समाजात घडणार्‍या नियमबाह्य कृती तात्काळ जिल्हा पोलीस दलास कळवाव्यात आणि कोरोना विरुद्धच्या लढ्यात सहभागी व्हावे’, असे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक दीक्षितकुमार गेडाम यांनी केले आहे.