निष्काळजीपणामुळे स्वत:सह इतरांचा जीव धोक्यात घालू नका ! – सुनील थोपटे, पोलीस निरीक्षक, दोडामार्ग

दोडामार्ग – निष्काळजीपणामुळे स्वतःसह कुटुंब अथवा समाजातील कुठल्याही व्यक्तीचा जीव धोक्यात घालू नका. दक्ष रहाण्याची हीच खरी वेळ आहे, असे आवाहन येथील पोलीस निरीक्षक सुनील थोपटे यांनी तालुकावासियांना केले. पुणे, मुंबई आदी ठिकाणांहून आलेल्यांनी कोरोनाचा विळखा टाळायचा असेल, तर घरातच थांबावे, विनाकारण घराबाहेर पडू नका, अशी विनंतीही त्यांनी केली.

तालुक्यातील सर्व सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, नगरसेवक, पोलीस पाटील, तलाठी, ग्रामसेवक, कृषी साहाय्यक, बीट जमादार, तसेच तालुक्यातील व्यापारी, दुकानदार आणि नागरिक यांना आवाहन करतांना पोलीस निरीक्षक थोपटे यांनी म्हटले आहे की, ‘मुंबई, पुणे येथील ‘रेड झोन’मधून मोठ्या प्रमाणावर नागरिक अनुमतीसह किंवा अनुमतीविना तालुक्यात प्रवेश करत आहेत. या सर्व लोकांची वैद्यकीय तपासणी करून त्यांचे विलगीकरण केले जाते; तरीही बर्‍याचशा व्यक्ती अशा आहेत की, त्या रात्री-अपरात्री तालुक्यात प्रवेश करतात आणि त्या ‘रेड झोन’मधून आल्याचे लपवण्याचा प्रयत्न करतात. त्यामध्ये त्यांच्या कुटुंबातील सदस्यांचा मोठा हातभार असतो. अशा व्यक्तींना नगरसेवक, सरपंच किंवा ग्रामपंचायत सदस्य बोलवायला गेला, तर त्यांनाही ते धुडकावून लावतात. हे त्यांचे वागणे बरोबर नाही. त्यामुळे ते स्वतःचा आणि स्वतःच्या कुटुंबाचाही जीव धोक्यात घालत आहेत. सध्या कोरोना विषाणूंचा संसर्ग पसरण्याचा धोका मोठ्या प्रमाणात निर्माण झाला आहे. अद्यापही बरेच नागरिक बाजारात जातांना मास्क वापरत नाहीत. विनाकारण शहरात किंवा ग्रामीण भागात फिरत असतात. अनेकजण दिवसा आणि रात्री अनावश्यक फिरून जीव धोक्यात घालत आहेत. हे सर्व जण कोरोनामुळे जीव जाण्याची वाट बघत आहेत का ? घरात थांबणे, हा कोरोनावर मात करण्याचा सर्वांत सोपा उपाय आहे.’