गोव्यात कोरोनाबाधित २ नवीन रुग्ण, तर ९ जण कोरोनामुक्त

  • प्रत्यक्ष कोरोनाबाधितांची संख्या ३८ वर

  • जलद चाचणीत आणखी ३ सकारात्मक; पण गोमेकॉतील चाचणीनंतर होणार शिक्कामोर्तब

पणजी, २२ मे (वार्ता.) – मुंबईहून रस्त्यामार्गे गोव्यात आलेला एक पुरुष आणि एक महिला कोरोनाबाधित असल्याचे गोवा वैद्यकीय महाविद्यालयात केलेल्या चाचणीत निष्पन्न झाले आहे. यामुळे राज्यात आतापर्यंतची कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या ५४ वर पोचली असली, तरी २२ मे या दिवशी ९ जण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे पूर्वीचे कोरोनामुक्त ७ रुग्ण आणि आताचे ९ हे वगळल्यास सध्याची प्रत्यक्ष कोरोनाबाधितांची संख्या ३८ आहे. त्याचप्रमाणे मुंबईहून बसने आलेले ३ जण जलद चाचणीत (ट्रूनेट चाचणीत) सकारात्मक (पॉझिटिव्ह) आढळून आले आहेत. या तिघांच्या कोरोनाशी संबंधित नमुन्यांची अंतिम चाचणी गोवा वैद्यकीय महाविद्यालयातील व्हायरोलॉजी प्रयोगशाळेत करण्यात येणार आहे. त्यानंतरच ते कोरोनाबाधित असल्याचे निश्‍चित होणार आहे. २२ मे या दिवशी सापडलेल्या नवीन दोन्ही कोरोनाबाधित रुग्णांना उपचारार्थ कोविड रुग्णालयात पाठवण्यात आले आहे.

आरोग्यमंत्री विश्‍वजीत राणे यांनी भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेला पत्र पाठवून विमानाने गोव्यात येणार्‍या सर्वांची जलद चाचणी किंवा ‘अ‍ॅन्टीबॉडी’ चाचणी करण्यासाठी राज्यशासनाला अनुमती द्यावी, अशी मागणी केली आहे. २५ मे पासून देशांतर्गत विमानसेवा चालू होणार आहे. या दृष्टीने गोव्यासाठी सावधगिरीचा उपाय म्हणून ही मागणी करण्यात आली आहे.

बाह्यरुग्ण विभागांमध्ये होत आहे सर्व नियमांचे पालन ! – विश्‍वजीत राणे, आरोग्यमंत्री

या अनिश्‍चित काळामध्ये गोवा वैद्यकीय महाविद्यालय नागरिकांना सर्व सुविधा पुरवत आहे. राज्यातील बाह्यरुग्ण विभागांमध्ये कोरोनाचा संसर्ग टाळण्यासंबंधी सामाजिक अंतर पाळणे, ‘थर्मल गन’च्या माध्यमातून प्रवेश करणार्‍यांचे तापमान तपासणे, हात ‘सॅनिटाईझ’ करणे, मास्क घालणे, आदी नियमांचे काटेकोरपणे पालन केले जात आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री विश्‍वजीत राणे यांनी सामाजिक माध्यमाद्वारे दिली आहे.