महापुराचा संभाव्य धोका लक्षात घेऊन समन्वय समितीची स्थापना करा !

खासदार धैर्यशील माने यांची मुख्यमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे मागणी

कोल्हापूर – महापुराचा संभाव्य धोका लक्षात घेऊन उपाय म्हणून कोल्हापूर, सांगली आणि सातारा या तिन्ही जिल्ह्यांचे पालकमंत्री अन् जिल्हाधिकारी यांनी पाणी व्यवस्थापनासाठी समन्वय समिती स्थापन करावी. तसेच महापुराचे पाणी दुष्काळी भागात नेण्यासाठी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी खासदार धैर्यशील माने यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.

निवेदनात म्हटले आहे की, वर्ष २०१९ मध्ये आलेल्या महापुरामुळे कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यातील शेती, व्यापार, उद्योग यांची पुष्कळ हानी झाली. यावर्षीही हवामान विभागाने जास्त पावसाची शक्यता वर्तवली आहे. सध्या धरणांमध्ये पाणीसाठा अधिक असल्याने अधिक पाऊस पडल्यास महापुराचा धोका निर्माण होईल. यावर्षीची हानी टाळण्यासाठी सरकारने आतापासूनच दक्षता घेण्याची आवश्यकता आहे. कर्नाटक राज्याच्या मुख्यमंत्र्यांशी आतापासून संपर्क करून अलमट्टी धरणातील पाण्याच्या विसर्गाचे योग्य नियोजन करावे. दोन्ही राज्यांची मिळून एक समिती सिद्ध करावी. अतिरिक्त पाणी दुष्काळी भागात वळवण्यासाठी प्रयत्न व्हावेत. (संभाव्य धोक्याविषयी महत्त्वपूर्ण उपाययोजना सुचवणारे खासदास धैर्यशील माने यांचे अभिनंदन ! सर्वच उपाययोजना अमलात येईपर्यंत खासदारांनी शेवटपर्यंत पाठपुरावा घ्यावा ! – संपादक)