अतीवृष्टी झाल्यास कोल्हापूर जिल्ह्यास यावर्षीही महापुराचा धोका

कोल्हापूर – ऑगस्ट २०१९ मध्ये जिल्ह्यातील १२ तालुके महापुराने बाधित झाले होते. एकूण ३४५ गावांना महापुराचा धोका निर्माण झाला होता. हवामान खात्याने यावर्षीही चांगल्या पावसाचा अंदाज वर्तवल्यामुळे महापुराचा धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. वर्षभरात सरकारी पातळीवर कायमस्वरूपी ठोस उपाययोजना झाल्या नसल्यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

महापुरामुळे नदीकाठावरील गावे, तर अतीवृष्टीमुळे डोंगराळ तालुक्यातील गावे यांना फटका बसला होता. भूमी खचल्याने डोंगरालगतच्या वाड्यांना धोका निर्माण झाला होता. अशा धोकादायक गावांचे सुरक्षितस्थळी स्थलांतर करण्याचे नियोजन केवळ कागदावरच राहिले आहे. हानी झालेली घरे आणि रस्ते यांची कामेही राज्य सरकारकडून मिळणार्‍या निधीअभावी रखडली आहेत. जिल्हा प्रशासनाच्या वतीने याविषयी बैठक घेऊन ‘पंचगंगा नदीने धोक्याची पातळी ओलांडल्यास ग्रामस्थांचे सक्तीने स्थलांतर करण्यात येईल’, असे घोषित केले आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लोकप्रतिनिधी, प्रशासन व्यस्त असल्याने महापूर नियंत्रणासाठी व्यापक उपाययोजना करण्यावर मर्यादा येत आहेत.