पश्‍चिम महाराष्ट्रातील ठळक घडामोडी

१. कराड तालुक्यात शिधावाटप दुकानांमधून नागरिकांना देण्यात येणारे धान्य अत्यंत निकृष्ट प्रतीचे आहे. त्यात खडे, माती, कचरा असतो. (शिधावाटप दुकानांमध्ये देण्यात येणार्‍या धान्याच्या गुणवत्तेवर प्रशासनाचे नियंत्रण नाही का ? – संपादक)

२. कोयता घेऊन दहशत निर्माण करणार्‍या आरोपीला पकडण्यासाठी गेलेल्या पोलीस कर्मचार्‍यांना शिवीगाळ करत त्यांच्या अंगावर धावून जाणार्‍या ५ महिलांविरोधात येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. (महिलांकडून पोलिसांना होणारी शिवीगाळ म्हणजे पोलिसांचा धाक संपल्याचेच लक्षण ! – संपादक)

३. पुणे येथील वाहतूक विभागात कार्यरत असलेल्या ४२ वर्षीय पोलीस कर्मचार्‍याचा कोरोनामुळे २१ मे या दिवशी मृत्यू झाला. कोरोना ‘हॉटस्पॉट’ असलेल्या परिसरात ते वाहतूक विभागात कार्यरत होते. कोरोनामुळे झालेला शहर पोलीस दलातील हा दुसरा मृत्यू आहे.

४. मुरारजी पेठ (सोलापूर) येथील मांस विक्रेत्याला कोरोना झाला. ३०० ग्राहक त्याच्या संपर्कात आले असल्याने त्यांचा शोध घेण्यात येत आहे.

५. परराज्य किंवा परजिल्हे येथून मूळ गावी येणारे काही नागरिक कोरोनाबाधित असल्याने पुणे जिल्ह्यात येणार्‍या प्रत्येकाचे १४ दिवसांचे अलगीकरण करण्याचे आदेश जिल्हाधिकार्‍यांनी दिले आहेत.

६. सातारा जिल्ह्यात दुष्काळी भागात पाणीटंचाईमुळे १८ गावे आणि ३० वाड्यावस्त्या यांना टँकरद्वारे पाणीपुरवठा चालू करण्यात आला आहे.

७. दळणवळण बंदीमुळे सर्व सहली रहित करण्यात आल्याने २२५ कोटी रुपयांची हानी पर्यटन संस्थांना सहन करावी लागली. ‘ट्रॅव्हल्स एजंट असोसिएशन’ने बैठकीच्या माध्यमातून शासनाकडे विविध मागण्या केल्या. शासनाने ‘ट्रॅव्हल्स एजंट’ संस्थांना ‘जीएस्टी’ मध्ये सवलत द्यावी, क्षमतेनुसार विनातारण कर्ज मिळावे, तसेच एका वर्षासाठी कर, घरफाळा आणि वीज आकारणीमध्ये सवलत देऊन साहाय्य करावे, अशा मागण्यांचे निवेदन शासनाला देण्याचे बैठकीत ठरवण्यात आले. तसेच आरक्षित रकमेचा परतावा न करता हमी देऊन नियोजित सहली पुढे ढकलण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला.

८. पुणे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी जिल्ह्यातील ११ तालुक्यांमधील ४६ गावे प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर केली आहेत. यामध्ये सर्वाधिक म्हणजे १६ गावे हवेली तालुक्यातील आहेत.

९. कोरोनामुळे गेल्या २ मासांपासून मुख्य बाजारपेठ बंद आहे. नागरिकांची दैनंदिन आवश्यकता ओळखून बाजारपेठेतील इतर दुकाने चालू करणे आवश्यक आहे, अशी मागणी सातारा येथील आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, विरोधी पक्षनेते आणि राज्याचे मुख्य सचिव यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

१०. ‘रेड झोन’मधून बाहेर पडल्यानंतर पिंपरी-चिंचवड येथे २ मासांच्या कालावधीनंतर दुकाने उघडण्यात आली. नागरिकांनी तेथे पुष्कळ गर्दी केली. ठरलेल्या नियमांचेही उल्लंघन होत होते.