आपत्काळ चालू झाल्याने अयोग्य आणि दिशाहीन मार्गदर्शन करणार्‍यांपासून सावध रहा अन् ‘ईश्‍वरप्राप्ती’ हे नरजन्माचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी तीव्र साधना करा !

सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ यांचे अनमोल विचारधन !

सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ

१. समाजात स्वतःला ‘आध्यात्मिक गुरु’ म्हणवून घेणारे अनेक जण भक्तांना मायेमध्ये अडकवणारे आणि दिशाहीन मार्गदर्शन करत असणे अन् त्यांपैकी एका व्यक्तीने एका साधकाला ईश्‍वरप्राप्तीसाठी पूर्णवेळ साधना करण्यापासून परावृत्त करणे

‘सध्या समाजात स्वतःला ‘आध्यात्मिक गुरु’ म्हणवणारे, भक्तांना मायेमध्ये अडकवणारे, तसेच सकामाचे आणि दिशाहीन मार्गदर्शन करणारे अनेक जण पहावयास मिळतात. एक साधक आध्यात्मिक मार्गदर्शन घेण्यासाठी अशाच एका ‘आध्यात्मिक गुरूं’कडे गेला होता. तेव्हा त्यांनी त्या साधकाला सांगितले, ‘‘तू सर्व सोडून साधना कशाला करतोस ? विवाह कर, नोकरी कर आणि घर सांभाळून साधना कर.’’ प्रत्यक्षात त्या साधकाने स्वेच्छेने आणि त्याच्या घरच्या सर्व परिस्थितीचा अंदाज घेऊनच पूर्णवेळ साधना करण्याचा निर्णय घेतला होता. ‘त्या साधकाला खरा आनंद साधना केल्यानेच मिळणार आहे’, हे त्या तथाकथित आध्यात्मिक गुरूंना जाणता आले नाही.

२. ‘एखाद्याची खरी प्रगती कशात आहे ?’, हे कळणारे समाजात पुष्कळ अल्प असणे आणि बरेच जण सूक्ष्मातील थोडे-फार कळायला लागल्यावर लोकांना फसवून अमाप पैसा मिळवत असणे

‘एखाद्याची खरी प्रगती कशात आहे ?’, हे कळण्यासाठी मार्गदर्शन करणार्‍याचीही तेवढी साधना असणे आवश्यक आहे; परंतु आजकाल अशी साधना बहुतांश व्यक्तींची नाही. सूक्ष्मातील थोडे-फार कळायला लागले की, अशी माणसे आध्यात्मिक मार्गदर्शनाचे दुकानच काढतात आणि लोकांना फसवून अमाप पैसा मिळवतात. सध्या समाजात ‘खरे गुरु’ मिळणे पुष्कळ कठीण झाले आहे.

३. समाजाला अयोग्य मार्गदर्शन करणे आणि ईश्‍वरप्राप्तीसाठी त्याग करणार्‍याला पुन्हा मायेमध्ये ढकलणे, हे घोर पापच असणे

‘समाजाला अयोग्य मार्गदर्शन करणे’, हे एक प्रकारचे पापच आहे. एखादा जीव ईश्‍वरप्राप्तीसाठी एवढा मोठा त्याग करून त्याचे जीवन साधनेसाठी वाहून घेत आहे, तर अशा व्यक्तीला पुन्हा मायेत ढकलणे म्हणजे घोर पापच आहे. नोकरी, विवाह, मुले आदी सर्व (सकामातील) करण्यास सांगून त्याला पुन्हा एक प्रकारे मायाजाळात अडकवण्यासारखेच आहे.

४. सध्याच्या काळात आपण डोळस भावाने ‘अशा मायेत अडकवणार्‍यांचे कितपत ऐकायचे ?’, हे ठरवायला हवे !

सध्या राष्ट्र आणि हिंदु धर्म यांची अवस्था अत्यंत बिकट झाली आहे. अशा स्थितीत ‘निष्काम वृत्तीने साधना करण्याला महत्त्व द्यायचे कि सकामात अडकायचे ?’, हे ज्याचे त्याने ठरवायला हवे. गावोगावी असणार्‍या वरीलप्रमाणे भोंदू, ईश्‍वरप्राप्तीपासून दूर नेणार्‍या आणि स्वतःला अध्यात्मातील अधिकारी, तसेच ‘संत’ म्हणवून घेणार्‍या लोकांनी याकडे गांभीर्याने लक्ष द्यायला हवे. आपणही डोळस भावाने ‘अशा मायेत अडकवणार्‍यांचे कितपत ऐकायचे ?’, हेही ठरवायला हवे !

५. सनातनमध्ये ईश्‍वरप्राप्ती करून घेण्यासाठी व्यक्तीच्या प्रकृतीनुसार मार्गदर्शन केले जाणे आणि काळानुसार राष्ट्र अन् धर्म जागृतीसाठी करावयाच्या समष्टी साधनेला अतिशय महत्त्व असणे

घोर कलियुगामध्येही ईश्‍वरप्राप्ती करून घेण्यासाठी सनातन संस्थेमध्ये व्यक्तीच्या प्रकृतीनुसार मार्गदर्शन केले जाते. ‘आनंदी जीवन जगण्यासाठी साधना करून ईश्‍वरप्राप्ती करवून घेण्यास शिकवणे’, हे सनातनचे ध्येय आहे. काळानुसार राष्ट्र आणि धर्म जागृतीसाठी करावयाच्या समष्टी साधनेला अतिशय महत्त्व आहे. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी साधकांना कशातही न अडकता साधनेत पुढे जाण्याची शिकवण दिली आहे.

६. आपत्काळ चालू झाल्याने अयोग्य आणि दिशाहीन मार्गदर्शन करणार्‍यांपासून सावध रहाणे अन् तीव्र साधना करून ईश्‍वरप्राप्ती करून घेणे आवश्यक असणे

आतातर आपत्काळ चालू झाला आहे. आपल्याकडे साधना करण्यासाठी वेळ अत्यंत अल्प राहिला आहे. अशा स्थितीत साधकांनी मायेत न अडकता तीव्र साधना करण्याकडे अधिक लक्ष द्यावे, तसेच अशा प्रकारचे अयोग्य आणि दिशाहीन मार्गदर्शन करणार्‍यांपासून सावध रहाण्याचा प्रयत्न केला पाहिजे. जास्तीतजास्त आपली साधनाच वाढेल, याकडे गांभीर्याने लक्ष दिले पाहिजे. त्यासाठी मग कोणत्याही प्रकारचा त्याग करावा लागला, तरी चालेल. ‘नरजन्माचे उद्दिष्टच ईश्‍वरप्राप्ती करून घेणे आणि तीव्र साधना करणे हे आहे’, हे आपल्या चित्तावर बिंबवणे आवश्यक आहे.’

– (सद्गुरु) सौ. अंजली गाडगीळ (१७.११.२०१८)