राज्यात १ जून ते ३१ जुलै या कालावधीत मासेमारीवर बंदी  

रत्नागिरी – महाराष्ट्र राज्य सागरी मासेमारी नियमन अधिनियमानुसार माशांच्या साठ्याचे जतन करण्यासाठी १ जून ते ३१ जुलै २०२० या कालावधीत राज्याच्या सागरी जलधी क्षेत्रात यांत्रिक नौकांद्वारे होणार्‍या मासेमारीवर बंदी घालण्यात आली आहे. ही बंदी पारंपरिक पद्धतीने मासेमारी करणार्‍या बिगरयांत्रिकी नौकांना लागू असणार नाही, असा आदेश राज्याच्या मत्स्यव्यवसाय आयुक्त कार्यालयाने काढला आहे.

जून आणि जुलै या मासांत मासेमारी बंदीमुळे माशांच्या बीजनिर्मिती प्रक्रियेला वाव मिळून मत्स्यसाठ्याचे जतन होते. याशिवाय वादळी हवामानामुळे मासेमारांची जीवित आणि वित्तहानी टाळणेही शक्य होते. किनार्‍यापासून १२ सागरी मैलांपर्यंत वरील कालावधीमध्ये यांत्रिक नौकांद्वारे मासेमारी करतांना आढळल्यास महाराष्ट्र सागरी मासेमारी नियमन अधिनियमानुसार कठोर कारवाई करण्यात येईल, अशी चेतावणीही या आदेशात देण्यात आली आहे.