हाँगकाँगवर अधिक नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला, तर कठोर प्रतिक्रिया व्यक्त करू ! – अमेरिकेची चीनला चेतावणी

वॉशिंग्टन (अमेरिका) – हाँगकाँगवर अधिक नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केल्यास अमेरिकेकडून अत्यंत कठोर प्रतिक्रिया उमटू शकतेे, अशी चेतावणी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनला दिली. हाँगकाँगची स्वायत्तता आणि मानवी हक्कांचा आदर राखणे अत्यंत महत्त्वाचे आहे, असेही त्यांनी सांगितले. गेल्या वर्षी लोकशाही हक्कांसाठी हाँगकाँगमध्ये मोठे आंदोलन झाले होते. त्यानंतर चीन आता राष्ट्रीय सुरक्षा विधेयकाद्वारे हाँगकाँगसाठी नवा कायदा आणण्याची सिद्धता करत आहे. त्यावरून ट्रम्प यांनी ही चेतावणी दिली आहे.

हाँगकाँग वर्ष १९९७ पासून चीनच्या नियंत्रणाखाली आहे. चीनच्या तुलनेत हाँगकाँगमध्ये अनेक सवलती आहेत. तेथील जनता लोकशाही हक्कांविषयी जागरूक आहे. त्यामुळे चीनचे सर्व कायदे हाँगकाँगमध्ये लागू होत नाहीत. मागील वर्षी लोकशाही हक्कांसाठी हाँगकाँगमध्ये हिंसक आंदोलन झाले होते. आताही चीनने येथे कायद्यामध्ये पालट करण्याचा प्रयत्न केल्यास हिंसक आंदोलन होऊ शकते, असे सांगितले जात आहे.