देशाची सुरक्षा आणि सार्वभौमत्व यांसाठी सर्व काही करू ! – भारताची चीनला चेतावणी

चीन भारताच्या सातत्याने कुरापती काढत असतांना भारताने अधिक कठोर होण्याची आवश्यकता आहे !

नवी देहली – भारत-चीन सीमेवर शातंता राखण्यासाठी आम्ही कटीबद्ध आहोत; पण देशांची सुरक्षा आणि सार्वभौमत्व यांसाठी सर्व आवश्यक पावले उचलू, अशा शब्दांत भारताने चीनला त्याच्या भारतविरोधी कृत्यांविषयी चेतावणी दिली. भारतीय सैन्य स्वतःच्या सीमेमध्ये गस्त घालत असतांना चीनकडून अडथळा निर्माण केला जात आहे, अशी माहितीही भारताने दिली. भारतीय सैन्याच्या तुकड्यांनी नियंत्रण रेषा ओलांडल्यामुळे लडाख आणि सिक्कीम येथे तणाव निर्माण झाला, असा खोटा आरोप चीनने केले होता. त्यावर भारताने वरील उत्तर दिले आहे.

लडाखच्या गालवान व्हॅली भागात अधिक तणाव आहे. येथे दोन्ही देशांनी अतिरिक्त सैन्य तुकडया तैनात केल्या आहेत. वर्ष १९६२ मधील चीनसमवेतचे युद्ध याच ठिकाणी झाले होते. लडाखमध्ये चालू असलेल्या सीमावादात अमेरिकेने भारताला पाठिंबा दिला आहे.