रिझर्व्ह बँकेकडून रेपो रेटमध्ये कपात

बँकांच्या कर्जाचा हप्ता न भरण्याची मुभा ३ मासांनी वाढवली

मुंबई – कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर रिझर्व्ह बँकेने रेपो रेटमध्ये कपात करण्याचा निर्णय घेतला. रेपो दरात ४० बेसिस पॉईंट्सची कपात करण्यात आल्याची माहिती रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तीकांता दास यांनी पत्रकार परिषदेत दिली. रेपो रेट आता ४.४ टक्क्यांवरून ४ टक्के इतका करण्यात आला आहे. रिव्हर्स रेपो रेट ३.३५ टक्क्यांपर्यंत न्यून करण्यात आला आहे. या कपातीमुळे कर्जावरील व्याज न्यून होणार आहे. यापूर्वी कर्जाच्या हप्ते न भरण्याची मुभा ३ मासांसाठी देण्यात आली होती. ही मुदत आता आणखी ३ मासांसाठी वाढवण्यात आली आहे. आता ऑगस्टपर्यंत कर्जाचा हप्ता न भरण्याची मुभा असेल. कर्जावरील व्याज भरण्यास दिलेली स्थगिती आणखी ३ मासांनी वाढवण्यात आली आहे.

रेपो रेट आणि रिव्हर्स रेपो रेट म्हणजे काय ?

देशभरातील बँका जेव्हा रिझर्व्ह बँकेकडून अल्पमुदतीसाठी कर्ज घेतात त्यावेळी बँकांना रिझर्व्ह बँक जो व्याजदर आकारते त्याला रेपो रेट म्हणतात. ज्यावेळी बँका स्वतःकडचा अधिक असलेला निधी रिझर्व्ह बँकेकडे अल्पमुदतीसाठी जमा करते, त्यावेळी रिझर्व्ह बँक अशा बँकांना जो व्याजदर देते त्याला रिव्हर्स रेपो रेट असे म्हणतात.