५ कोटींपेक्षा अधिक भारतियांकडे हात धुण्याची सुविधा नाही ! – अमेरिकेतील संशोधकांचा दावा

हा दावा सत्य असेल, तर भारताने यावर उपाययोजना केली पाहिजे ! सरकारने यासाठी प्रयत्न केले पाहिजेत !

वॉशिंग्टन (अमेरिका) – भारत, पाकिस्तान, चीन, बांगलादेश, नायजेरिया, इथियोपिया, कांगो आणि इंडोनेशिया या देशांपैकी प्रत्येक देशामध्ये ५ कोटींपेक्षा अधिक लोकांकडे हात धुण्याची व्यवस्था नाही. त्यामुळे त्यांना आणि त्यांच्यामुळे इतरांना कोरोनाची लागण होण्याची अधिक शक्यता आहे, असा दावा अमेरिकेच्या वॉशिंग्टन विद्यापिठातील इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ मॅट्रिक्स अँड इव्हॅल्युएशनच्या संशोधकांनी केला आहे. एन्व्हार्मेंटल हेल्थ पर्सपेक्टिव्ह जर्नलमध्ये त्यांचा अहवाल प्रसिद्ध करण्यात आला आहे.

१. या संशोधकांनी म्हटले आहे की, मध्यम आणि त्याखालील दरडोई उत्पन्न असणार्‍या देशांमधील २०० कोटींपेक्षा अधिक लोकांकडे साबण आणि स्वच्छ पाण्याची सोय नाही. त्यामुळे श्रीमंत देशातील लोकांच्या तुलनेत त्यांच्यामध्ये कोरोनाचे संक्रमण होण्याचा धोका अधिक आहे. ही संख्या जगाच्या एकूण लोकसंख्येच्या एक चतुर्थांश आहे. ४६ देशांमधील निम्म्याहून अधिक लोकसंख्येकडे साबण आणि स्वच्छ पाणी उपलब्ध नाही.

२. इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ मॅट्रिक्स अँड इव्हॅल्युएशनचे प्रा. मायकल ब्राउएर यांनी म्हटले की, कोरोनाचे संक्रमण रोखण्यासाठी महत्त्वाच्या उपायांमध्ये हात धुणे, हा एक महत्त्वाचा उपाय आहे; पण अनेक देशांमध्ये ही सुविधा उपलब्ध नाही; कारण त्या देशांमध्ये आरोग्याच्या सुविधाच मर्यादित स्वरूपात आहेत, हे निराशाजनक आहे. हँड सॅनिटायझरसारख्या सुविधा तर गरजेच्या गोष्टी आहेत. कोरोनापासून बचावासाठी दीर्घकालीन उपायांची आवश्यकता आहे. हात धुण्याची योग्य सुविधा नसल्याने प्रत्येक वर्षी ७ लाखांहून अधिक लोकांचा मृत्यू होतो. अफ्रिका आणि आशिया खंडांतील ५० टक्क्यांंपेक्षा अधिक लोकांजवळ हात धुण्याची चांगली व्यवस्था नाही.