(म्हणे) ‘सामाजिक अंतर पाळून मद्यालये चालू करण्यास अनुमती द्या !’

फोंडा येथील मद्यालय आणि रेस्टॉरंट संघटनेची मागणी

  • कित्येक सामान्य आणि सुशिक्षित नागरिकच अद्याप सामाजिक अंतर पाळत नाहीत, तर मद्यपान केल्यावर मद्यपी सामाजिक अंतर कसे पाळतील ?
  • मद्यपी मास्क वापरतील, रस्त्यावर थुंकणार नाहीत, घरी गेल्यावर भांडणार नाहीत, कुटुंबियांना संसर्ग होणार नाही, याची शाश्‍वती फोंडा येथील मद्यालय आणि रेस्टॉरंट संघटना देऊ शकणार आहे का ?

फोेंडा, २१ मे (वार्ता.) – गोव्यात चौथ्या स्तरावरील दळणवळण बंदीमध्ये बर्‍याच प्रमाणात सूट देण्यात आली आहे. सामाजिक अंतर पाळण्याच्या अटीवर अनेक व्यवसायांना अनुमती देण्यात आलेली आहे; मात्र मद्यालय आणि रेस्टॉरंट यांना अजूनही अंधारात ठेवण्यात आले आहे. यामुळे पोटापाण्याचा प्रश्‍न उभा ठाकला आहे. सामाजिक अंतराचे पालन करून मद्यालय आणि रेस्टॉरंट व्यवसाय चालू करण्यास अनुमती द्यावी, अशी मागणी फोंडा येथील मद्यालय आणि रेस्टॉरंट संघटनेच्या पदाधिकार्‍यांनी स्थानिक आमदार रवि नाईक यांची भेट घेऊन केली आहे. फोंडा तालुक्यात किमान ७००, तर संपूर्ण गोव्यात सुमारे १२ सहस्र मद्यालये आहेत.

मद्यालय आणि रेस्टॉरंट संघटनेच्या मते मद्यालय आणि रेस्टॉरंट यांमुळे अनेकांना रोजगार उपलब्ध झालेला आहे; मात्र आता बंदीमुळे या कामगारांना पोसायचे कसे ? असा प्रश्‍न उभा ठाकला आहे. (हा प्रश्‍न सर्वांनाच आहे; पण सध्याच्या आपत्काळात जीवनावश्यक गोष्टी आणि जेथे सुरक्षित वातावरण असेल त्यांनाच अनुमती देण्यात आली आहे. मद्यालये चालू केल्यावर स्थानिकांत कोरोना विषाणूचा संसर्ग झाल्यास त्याला कोण उत्तरदायी ? – संपादक)