कोरोनाच्या चाचणीचा सकारात्मक अहवाल एका घंट्यात नकारात्मक !

हा चमत्कार केवळ सिंधुदुर्गातच होऊ शकतो ! – आमदार नितेश राणे यांची उपहासात्मक टीका

आमदार नितेश राणे

सिंधुदुर्ग – सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुंबई, पुणे आदी ठिकाणाहून आलेल्या नागरिकांमुळे कोरोनाचे संकट वाढत आहे. त्यामुळे कोरोनाला रोखण्याचे आव्हान प्रशासनासमेर उभे आहे. २० मे या दिवशी एका तरुणीचा कोरोना चाचणी अहवाल पहिल्यांदा सकारात्मक (पॉझिटिव्ह) आला आणि एका घंट्यानंतर केलेल्या दुसर्‍या चाचणीत तो नकारात्मक (निगेटिव्ह) आल्याचा प्रकार घडला. यामुळे भाजपचे आमदार नितेश राणे यांनी ट्वीट करून प्रशासन आणि राज्य सरकार यांच्यावर टीका केली आहे. राणे म्हणाले की, ‘या सरकारवर कोण विश्‍वास ठेवणार ? एका घंट्यात अहवाल पालटतो, हा चमत्कार केवळ सिंधुदुर्ग जिल्ह्यात होतो.’

सिंधुदुर्ग जिल्ह्यात आतापर्यंत कोरोनाचे ८ रुग्ण सापडले आहेत. २० मे या दिवशी एका तरुणीचा अहवाल सकारात्मक आल्याचे वृत्त सामाजिक माध्यमातून पसरले; मात्र या तरुणीचा दुसरा अहवाला नकारात्मक आल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. त्यामुळे काही काळ संभ्रम निर्माण झाला.