परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या अमृत महोत्सवाच्या कार्यक्रमाच्या वेळी नृत्यसेवा सादर करतांना सौ. सावित्री इचलकरंजीकर यांना झालेले त्रास आणि आलेल्या अनुभूती !

‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या अमृत महोत्सवाच्या कार्यक्रमाच्या वेळी (१९.५.२०१७ या दिवशी) श्रीरामासमोर, म्हणजेच महर्षींनी सांगितल्यानुसार प्रत्यक्ष श्रीविष्णूचे अवतार असलेल्या परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यासमोर नृत्य करण्याची दुर्मिळ संधी त्यांच्याच कृपेने भगवंताने मला दिली. त्या कालावधीत मला झालेले त्रास आणि आलेल्या अनुभूती पुढे देत आहे.

सौ. सावित्री इचलकरंजीकर

१. नृत्याची पूर्वसिद्धता करतांना झालेले त्रास

अ. अमृत महोत्सवाच्या आधी ८.५.२०१७ या दिवसापासून मला घशात खवखव होऊन सर्दी, ताप आणि खोकला चालू झाला. १८ मे पर्यंत मला सतत ताप, चक्कर येणे, खोकला असे त्रास होत होते. माझे मन मात्र आनंदी होते.

आ. मला १२ दिवस ताप असल्यामुळे सतत चक्कर येत होती. ‘अचानक मी खाली पडेन कि काय ?’, असे मला वाटायचे.

इ. कार्यक्रमाच्या आधी सिद्धता करतांना नृत्यासाठी आदल्या दिवशी शिवलेल्या नव्याकोर्‍या घागर्‍याची नाडी आपोआप तुटली. खरेतर ती तशी तुटणे शक्यच नव्हते. ‘कोणीतरी पुष्कळ शक्ती लावून तोडावी’, तशी ती तुटली होती.

ई. आभूषणांपैकी कानावर लावायचे वेल केसांत नीट बसत नव्हते. शेवटपर्यंत मी तेच लावत होते. भांगात लावलेली बिंदी अचानक गळून पडली. ती लावण्यासाठी वेळ द्यावा लागला.

२. कार्यक्रमासाठी नृत्याचे सादरीकरण करण्याचे ठरणे

सौ. सावित्री इचलकरंजीकर यांची नृत्याच्या वेळची भावमुद्रा

२ अ. कार्यक्रमासाठी दोन साधिकांचे नृत्य करण्याचे ठरणे; परंतु स्वतःचे तसे काहीच न ठरल्याने सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी नृत्य करण्यास सांगणे : परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या अमृत महोत्सवाच्या (१८.५.२०१७) दिवशी डॉ. (कु.) आरती तिवारी आणि बालसाधिका कु. अपाला औंधकर  यांची नृत्य करण्याची इच्छा होती. कार्यक्रमाचे स्वरूप महर्षि सांगतील, तसे निश्‍चित होणार होते. तत्पूर्वी नृत्य निवडून त्याचा सराव करण्याचे ठरले. त्यानुसार ‘कु. अपाला श्रीकृष्णाचे स्वागत करणार्‍या आणि डॉ. आरती श्रीकृष्णाचे वर्णन करणार्‍या गीतांवर नृत्य करू शकतात’, असे ठरले. १५.५.२०१७ या  दिवशी डॉ. (कु.) आरती आणि कु. अपाला यांचे नृत्य सद्गुरु (सौ.) गाडगीळकाकू आणि सद्गुरु (सौ.) बिंदाताई पहाणार होत्या. त्या वेळी नृत्य करण्याचा माझा काहीही विचार नव्हता. त्यामुळे मला अस्वस्थ वाटत होते; म्हणून मी सद्गुरु (सौ.) गाडगीळकाकूंना विचारले, ‘‘कु. आरतीने नृत्य करण्याचा विचार आल्यावर तसे विचारून घेतले. कु. प्रियांका लोटलीकर यांना वाटते, ‘मी नृत्य करावे’; पण माझ्या मनात तसा विचारच येत नाही. मी काय करू ?’’ त्यावर त्या म्हणाल्या, ‘‘प्रकृतीनुसार असते. आवश्यकता असेल, तर देव सांगणारच आहे.’’ आमचे हे संभाषण संपते न संपते तोच सद्गुरु (सौ.) बिंदाताई तेथे आल्या. त्यांनी मला विचारले, ‘‘तू नृत्य करणार नाहीस का ? तूही नृत्य कर. अमृत महोत्सवाच्या निमित्ताने महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाच्या नृत्य-विभागाचा आरंभ होईल.’’ प्रत्यक्षात त्या वेळी मला थकवा होता आणि ‘मी नृत्य करू शकेन कि नाही ?’, असेही मला वाटत होते; पण त्यांनी सांगितले आणि त्यांनीच ते माझ्याकडून करवूनही घेतले.

२ आ. सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी ‘श्रीरामाशी संबंधित भजनावर आधारित नृत्य करावे’, असे सुचवणे : मी नृत्याचा नियमित सराव करत होते. तो शुद्ध कथकमधील नृत्यप्रकार असल्याने परात्पर गुरूंच्या अमृत महोत्सवाच्या वेळी तो करण्यासारखा नव्हता. तेव्हा ‘काय करायचे ?’, असा मला प्रश्‍न पडला. त्या वेळी सद्गुरु (सौ.) बिंदाताईंनी मला ‘‘श्रीरामाशी संबंधित भजनावर आधारित नृत्य कर आणि निवडलेले भजन सद्गुरु काकूंना ऐकव’’, असे सांगितले. मी ‘हो’, म्हटले आणि त्यासाठी गाणे शोधणे चालू केले. अमृत महोत्सवाच्या तीन दिवस आधी हे सर्व ठरले. त्या वेळी ‘१९.५.२०१७ या दिवशी श्रीरामाशी संबंधित कार्यक्रम असणार’, हे सद्गुरु ताईंनी सांगितले; पण ‘त्या वेळी नेमके काय असणार ?’, हे ठाऊक नव्हते. देव मला सतत शिकण्याच्या आणि स्वीकारण्याच्या स्थितीत ठेवून त्याच्या लीलांची अनुभूती घेण्याची संधी देत होता.

२ इ. श्रीरामाच्या रूपातील परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यासमोर नृत्य करण्याचे ठरल्यावर ‘हे नृत्य रामराज्यातील पहिलेच नृत्य असणार’, असा भाव मनात ठेवणे आणि त्यानंतर मन प्रफुल्लित होणे : त्या वेळी मी पुढीलप्रमाणे भाव ठेवला होता. ‘मला श्रीरामाच्या अवतार रूपातील परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या राज्याभिषेकाच्या वेळी नृत्य करण्याची अमूल्य संधी मिळाली आहे. त्यांच्या राज्याभिषेकानंतर रामराज्यच असणार आहे. हे नृत्य रामराज्यातील पहिलेच नृत्य असणार आहे. त्यामुळे ‘भगवंताने मला केवढे मोठे भाग्य प्रदान केले आहे !’  ‘ही कला त्यांच्या कोमल चरणी पूर्ण समर्पित होणार’, या विचारानेच माझे मन प्रफुल्लित झाले.

२ ई. २ – ३ दिवसांतच नृत्यासाठी भजन शोधून नृत्य बसवायचे असूनही मन शांत असणे : एखादा नृत्याचा कार्यक्रम करायचा असतो, तेव्हा त्यासाठी न्यूनतम १ मास तरी त्याचा सराव करणे अपेक्षित असते. मला २ – ३ दिवसांतच नृत्यासाठी भजन शोधून आणि त्याचा अर्थ उमजून घेऊन त्यावर नृत्य बसवणे आणि नृत्यासाठी लागणार्‍या वस्तू जमवणे, हे सगळे करायचे होते. जेव्हा हे ठरले, त्या वेळी मनही पुष्कळ शांत होते. जे सांगतील ते स्वीकारायचे, अशा स्थितीत मी होते.

३. नृत्यासाठी गीत निवडतांना झालेली प्रक्रिया

३ अ. आरंभी नृत्यासाठी श्रीरामाच्या अवतार रूपातील परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा विजय दर्शवणारे ‘जय राम रमा रमनम्…’ हे भजन निवडणे : संत तुलसीदासलिखित ‘श्रीरामचरितमानस’मधील (तुलसीरामायणातील) श्रीरामाच्या वर्णन करणार्‍या काही चौपाया मला ठाऊक होत्या. त्यातील श्रीरामाच्या स्तुतीपर भजनांपैकी ‘श्रीरामचंद्र कृपाळू भजमन हरण…’ आणि ‘जय राम रमा रमनम् शमनम्…’ ही दोन भजने मी १५.५.२०१७ च्या रात्री निवडून ती १६.५.२०१७ ला सकाळी सद्गुरु (सौ.) गाडगीळकाकूंना ऐकवली. कु. प्रियांका लोटलीकर, पू. (डॉ.) गाडगीळकाका आणि सद्गुरु (सौ.) गाडगीळकाकू या तिघांनीही त्यांतील दुसरे भजन निवडले. ‘त्या भजनातील स्वरांत पुष्कळ आर्तता आहे. त्या भजनात ‘जय राम’ असे शब्द असल्याने ते श्रीरामाचा विजय दर्शवणारे, तसेच श्रीराम आणि परात्पर गुरु डॉ. आठवले या दोघांच्याही नावांचा समावेश असलेले आहे’, अशी हे भजन निवडण्यामागील कारणमीमांसा सद्गुरु (सौ.) गाडगीळकाकूंनी सांगितली. त्यामुळे मला पुष्कळच आनंद होत होता.

३ आ. ‘जय राम रमा रमनम् शमनम्…’ या भजनावर यापूर्वी कुठल्याही नर्तकाचे नृत्य बसवलेले आढळून न येणे आणि तरीही हेच भजन निवडण्यास सांगितल्यावर देव वर्तमानकाळात ठेवत असल्याचे जाणवणे : मी संदर्भासाठी अनेक नर्तकांची श्रीरामाच्या भजनावर आधारित नृत्ये मायाजालावर शोधली. त्यात सर्व नर्तकांनी ‘श्रीरामचंद्र कृपाळू भजमन हरण…’ या भजनावर नृत्य केलेले होते; पण दुसर्‍या भजनावरील नृत्य कुठेच मिळाले नाही. ‘मला हे सर्व जमेल का ?’, असे वाटून मी सद्गुरु (सौ.) गाडगीळकाकूंना पुन्हा ‘श्रीरामचंद्र कृपाळू भजमन हरण…’ या भजनावरील नृत्य बसवण्याविषयी विचारले. त्या वेळी त्यांनी पुन्हा ‘जय राम रमा रमनम शमनम…’ याच भजनावर नृत्य बसवण्यास सांगितले. तेव्हा ‘देवाला मला या प्रसंगातही पूर्णपणे वर्तमानकाळातच ठेवायचे आहे’, असे वाटले. भगवंत त्याच्यासमोर पूर्वी कुणीही न केलेले नृत्य सादर करण्याची अमूल्य संधी या अज्ञानी आणि क्षुद्र जिवाला देत होता.

३ इ. भजनाचा अर्थ शोधतांना भगवंताला शरण गेल्यावर एका साधकाचे साहाय्य मिळणे आणि ती सेवा काही मिनिटांतच पूर्ण होणे : ज्या गाण्यावर नृत्य बसवायचे असते, त्याचा अर्थ जाणून घेणे पुष्कळ महत्त्वाचे असते. अर्थ समजला, तरच नृत्य करतांना त्यातून योग्य ते भाव प्रदर्शित होऊ शकतात. ते भजन संत तुलसीदासांनी अवधी हिंदी भाषेत लिहिले आहे. ही भाषा जरा कठीण असल्याने त्याचा शब्दशः अर्थ शोधणेही कठीण होते. बराच वेळ मायाजालावर अर्थ शोधून, तसेच हिंदी भाषा येत असलेल्या साधकांना विचारूनही त्याचा पूर्ण आणि योग्य अर्थ समजेना. शेवटी मी भगवंताला शरण गेले. त्यालाच प्रार्थना केली, ‘देवा, तूच मला साहाय्य कर.’ त्यानंतर देवाने मला एका साधकाचे नाव सुचवले. त्या साधकाला मी माझी समस्या सांगितल्यावर त्याने मला लगेचच एक लिखाण वाचायला दिले. त्यात मला काही मिनिटांतच त्या सगळ्या चौपायांचा अर्थ मिळाला. त्या वेळी भगवंताच्या चरणी पुष्कळ कृतज्ञता व्यक्त झाली.

३ ई. निवडलेल्या भजनात श्रीरामप्रभूंची राज्याभिषेकानंतर केलेली स्तुती असल्याचे लक्षात आल्यावर ते भजन निवडण्याविषयीचा उलगडा होणे : त्या भजनाचा अर्थ शोधत असतांना ‘त्यातील ओव्या तुलसीरामायणातील उत्तरकांडातील असून ती श्रीरामप्रभूंची राज्याभिषेकानंतर केलेली स्तुती आहे’, हे समजले. १९.५.२०१७ या दिवशीदेखील श्रीरामावतार रूपातील परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा राज्याभिषेकच (अवतारी कार्याचा आरंभ) होणार होता. ‘भगवंताने नृत्य करण्यासाठी हे भजन का निवडून दिले ?’, याचादेखील उलगडा त्या वेळी झाला.

३ उ. संत वास्तव्यास असलेल्या खोलीत नृत्याचा सराव केल्याने थोड्या कालावधीतच नृत्य बसवता येणे आणि सद्गुरु (सौ.) गाडगळकाकूंना ते दाखवल्यानंतर त्यांनी भजनात नृत्यातील हालचालींपेक्षा त्यातील भाव महत्त्वाचा असल्याचे सांगणे : १६.५.२०१७ या दिवशी अन्य सेवा असल्याने मला केवळ त्या भजनाचा अर्थ जाणून घेणे शक्य झाले; मात्र त्यावर नृत्य बसवणे शक्य झाले नाही. त्या रात्री १० वाजता थोडासा वेळ मिळाला, म्हणून मी एका साधिकेच्या खोलीत नृत्याच्या सरावासाठी गेले. दोन संतांचे वास्तव्य असल्याने त्या खोलीत नृत्य करतांना पुष्कळ चैतन्य जाणवत होते आणि रात्री १२ पर्यंत त्या साधिकेच्या साहाय्याने भजनाच्या निम्म्यापेक्षा अधिक ओळींवर नृत्य बसवून झाले. हे केवळ त्या संतांच्या चैतन्यामुळेच शक्य झाले, हे लक्षात आले. १७.५.२०१७ या दिवशी जेवढ्या ओळींवर नृत्य बसवले होते, तेवढे सद्गुरु (सौ.) काकूंना करून दाखवले. ते पाहून त्यांनी सांगितले, ‘‘या भजनात भाव आणि आर्तता अधिक आहे. त्यामुळे त्यात नृत्यातील हालचालींपेक्षा त्यातील भावच अधिक महत्त्वाचा आहे.’’

३ ऊ. आदल्या दिवशी नृत्य करतांनाची दिशा पालटल्याचे कळल्यावर तसा सराव करणे : आदल्या दिवशी कार्यक्रमस्थळी नृत्याचा सराव करतांना आयोजकांनी मागील वर्षीच्या अनुभवानुसार मला ‘परात्पर गुरूंकडे तोंड करून अधिकाधिक वेळ नृत्य करावे’, असे सुचवले. मी नृत्य बसवतांना ‘त्या भजनातील प्रभूंची स्तुतीपर वाक्ये परात्पर गुरूंसमोर आणि काही प्रसंगात्मक दृश्ये त्यांच्या समोर बसलेल्या साधकांसमोर करायची’, असे ठरवले होते. त्यात सुधारणा करायची, म्हणजे मला संपूर्ण नृत्याची दिशा पालटावी लागणार होती. त्या वेळी ‘त्यांनी सांगितलेले पालट स्वीकारून एकदा नृत्य करून पाहूया’, असा विचार करून नृत्य करण्याचे ठरवले. तसा सराव सायंकाळी केला आणि १९.५.२०१७ ला सकाळी निरोप मिळाला की, परात्पर गुरूंकडे तोंड करून ७० टक्के, तर समोर बसलेल्या साधकांकडे तोंड करून ३० टक्के नृत्य करावे. १८.५.२०१७ च्या रात्रीपर्यंत अन्य सेवांमुळे आणि अमृत महोत्सवाच्या कार्यक्रमामुळे मला सरावाला पुरेसा वेळ मिळाला नव्हता. त्यामुळे मी देवाला सांगितले, ‘मी नृत्य बसवते; पण तू सर्व सांभाळ.’

३ ए. एका संतांनी श्रीरामाच्या बाललीलांचे वर्णन करणार्‍या भजनावर नृत्य करण्याचा निरोप पाठवणे आणि त्यानुसार पुन्हा नवीन भजन शोधून त्यावर नृत्याचा सराव करणे : १९.५.२०१७ ला मी सरावासाठी गेले असता सकाळी ११.४० ला एका संतांनी मला एक निरोप पाठवला, ‘श्रीरामाच्या बाललीलांचे वर्णन करणारे भजन असल्यास त्यावर नृत्य बसवू शकतेस का ? शक्य असल्यास त्या भजनावर नृत्य बसव.’ मी लगेचच त्या सिद्धतेला लागले. त्या वेळी पुन्हा भजन निवडणे आणि त्याचा अर्थ शोधण्यापासून त्यावर नृत्य बसवणे, ही सर्वच प्रक्रिया करायची होती. काही घंट्यांत हे सर्व अचूक करणे केवळ अशक्य होते; पण भगवंताने तेही करवून घेतले. ‘ठुमक चलत रामचंद्र, बाजत पैंजनियां…’ या भजनाचा अर्थ शोधून त्यावर नृत्य बसवले.

३ ऐ. मनात अचानक ‘कार्यक्रमाच्या वेळी ध्वनीफीतीवर पूर्वीचे भजन लागले, तर काय करायचे ?’, असा विचार येणे; परंतु तेव्हा ‘वर्तमानकाळात रहायचे’, असे ठरवणे : १९.५.२०१७ ला दुपारी १२ ते दुपारी ३ पर्यंत मनात केवळ याच भजनाचे बोल आठवत होते. पूर्ण सिद्धता झाल्यावर कार्यक्रमाच्या स्थळी जातांना माझ्या मनात अचानक विचार आला, ‘समजा ‘ठुमक चलत रामचंद्र…’ या भजनाच्या ऐवजी ‘जय राम रमा…’ हे भजन लागले, तर…?’ त्या वेळी केवळ देवाला प्रार्थना झाली, ‘भगवंता, तुला जसे अपेक्षित आहे, तसे तू करवून घे.’ या वेळी ‘१०० टक्के वर्तमानकाळ’ हेच वाक्य डोळ्यांपुढे दिसत होते.

४. नृत्याच्या पोशाखाविषयी आलेली अनुभूती

१६.५.२०१७ पर्यंत नृत्यासाठी आवश्यक असलेला पोशाख कोणत्याच साधिकेकडे नव्हता. त्या वेळी ‘या अमूल्य क्षणी अन्य कोणाचा पोशाख न घालता स्वतःचा नृत्याचा पोशाख असल्यास चांगले’, असे वाटून पोशाख शिवण्यासंदर्भात आश्रमातील शिवणाची सेवा करणार्‍या साधिकांचे साहाय्य घेतले. त्या वेळी त्यांनी एका साधिकेचे नाव सुचवले. त्या साधिकेला त्या कालावधीत काही कारणास्तव अन्य सेवा करणे शक्य नव्हते आणि तिला जमेल, अशी सेवा मिळण्यासाठी ती देवाला पुष्कळ आळवत होती. मी तिला या सेवेविषयी विचारल्यावर तिने एका दिवसात नृत्याला शोभेल असा पोशाख शिवून दिला. १७.५.२०१७ ला नृत्यासाठीचा पोशाख सिद्ध झाला होता. तो पोशाख सर्वांना आवडला. त्या वेळी ‘भगवंत कुणालाही त्याच्या सेवेपासून वंचित ठेवत नाही’, या जाणिवेने त्याच्या चरणी पुष्कळ कृतज्ञता व्यक्त झाली.

५. प्रत्यक्ष कार्यक्रमाच्या वेळी आलेल्या अनुभूती

५ अ. नृत्य करण्यास आरंभ करतांना अचानक ध्वनीक्षेपकावर ‘ठुमक चलत रामचंद्र…’ याऐवजी पूर्वीचेच ‘जय राम रमा रमनम् शमनम्…’  भजन लागून त्यावर आधारित नृत्य करावे लागणे : मी कार्यक्रमाच्या ठिकाणी गेले. त्या वेळी माझ्यासमोर प्रत्यक्ष प्रभु श्रीरामाची (श्रीरामाच्या वेशातील परात्पर गुरुदेवांची) नयनमनोहर सुंदर छबी होती. त्यांचे मनमोहक सुहास्यवदन पाहून मनात आनंद आणि कृतज्ञता असे मिश्र भाव दाटून आले.

तुलसीदासांनी लिहिल्याप्रमाणे ‘तुलसीदास अति आनंद देखके मुखारविंद । रघुवर छबिके समान रघुवर छबि बनियाँ ।’ (अर्थ : तुलसीदासांना श्रीरामाचे मुखकमल पाहून अतिव आनंद झाला आहे. ते म्हणतात, ‘श्रीरामासारखा केवळ श्रीरामच आहे.’) माझ्याही मनाची अशीच स्थिती होती. भजन चालू झाल्यावर आरंभीचे संगीत ऐकले आणि भानावर आले. लक्षात आले, ‘जय राम रमा…’ हे भजन लागले आहे आणि त्या भजनाच्या बोलांवर माझ्याकडून नृत्य करण्यास सहजतेने आरंभ झाला.

५ आ. नृत्य करतांना माऊलीच्या प्रेमळ अन् कौतुकाच्या दृष्टीने पहाणार्‍या परात्पर गुरुदेवांकडे पाहिल्यावर केवळ ‘माझा भगवंत आणि मी’, अशी वेगळीच भावावस्था अनुभवून देहभान हरपणे : आरंभीचे संगीत संपून भजनाच्या आरंभी ‘जय राम श्रीराम’ या बोलावर नृत्य करत असतांना मी परात्पर गुरूंकडे पाहिले आणि त्यांनी माझ्याकडे माऊलीच्या प्रेमळ अन् कौतुकाच्या दृष्टीने पाहिले. त्यानंतर मात्र मी एका वेगळ्याच भावावस्थेत गेले. ती अवस्था शेवटपर्यंत होती.

तेथे नृत्य करतांना मी आणि केवळ माझा भगवंतच होता. अन्य कोणीच नव्हते. माझे मन केवळ त्याच्या चरणांशी होते आणि माझा देह त्या भजनाच्या बोलांवर ठरवल्याप्रमाणे हालत-डुलत हातवारे करत होता. माझ्या बुद्धीला काहीच कळत नव्हते. मी काय मुद्रा केल्या, काय नाही केल्या, हे मला काहीच कळत नव्हते कि नंतर आठवतही नव्हते. आर्तभावाने मी समोर बसलेल्या भगवंताला केवळ आळवत होते. तेथे शब्द नव्हतेच. ती वेगळीच अवस्था होती. शेवटी मी खाली बसले. भावावस्थेत असल्याने तोल गेला कि चक्कर आली, नेमके काय झाले, ते कळले नाही; पण ठरल्याप्रमाणे देह सावरला आणि नंतर आपोआप देवाच्या चरणांवर नतमस्तक झाला. त्यानंतर ‘मी तिथून उठू शकेन कि नाही ?’, असे मला वाटत होते. १५ दिवसांपासून डोक्यात सतत वेदना असायची. ज्या क्षणी मी सूक्ष्मातून श्रीरामाच्या कोमल कमलचरणांवर माझे डोके ठेवले, त्या क्षणी माझ्या डोक्यातून एक जोरदार कळ निघून एक जडपणा डोक्यातून बाहेर पडला. त्यानंतर मला पुष्कळ हलके वाटले. त्यानंतर उठून उभे राहून चालत जाण्याइतके बळ देवाने मला दिले.

६. नृत्य सादर झाल्यावर संत, साधक आणि कुटुंबीय यांचे अनुभवलेले प्रेम

अ. संत

१. मी नृत्य करत असतांना सद्गुरु (सौ.) गाडगीळकाकू आणि सद्गुरु (सौ.) बिंदाताई दोघीजणी माझ्यासाठी सतत प्रार्थना करत होत्या. माझ्याकडे एकटक पाहून मला नृत्य करण्यासाठी जणूकाही त्या शक्तीच देत होत्या. ज्याप्रमाणे एखादे अशक्त मूल एखादी कृती करत असतांना आईचे सगळे लक्ष त्याच्याकडेच असते, त्याप्रमाणेच दोघी माऊलींचे त्या वेळी माझ्याकडे स्थुलातून आणि सूक्ष्मातूनही लक्ष होते.

आ. कुटुंबीय

१. माझ्या सासू-सासर्‍यांना पुष्कळ आनंद झाला.

२. कार्यक्रमाच्या रात्री आईने ‘नृत्य शिकवल्याचे सार्थक झाले’, असे सांगितले.

इ. साधक

१. आश्रमातील जवळजवळ सगळ्या साधकांनी, तसेच निरनिराळ्या जिल्ह्यांतून पुष्कळ साधकांनी संपर्क साधून ‘नृत्य पाहून भावजागृती झाली’, असे सांगितले.

२. काही साधिकांनी सांगितले, ‘तुझ्या ठिकाणी मला मीच दिसत होते.’

३. ‘नृत्यातील चक्री (स्वतःभोवती गोलाकार फिरणे) पाहून ‘देवासाठी असेच वेडे होता आले पाहिजे’, असे वाटून त्यानंतर नामजप वाढला’, असे एका साधिकेने सांगितले.

४. एकाने सांगितले, ‘नृत्यातून ईश्‍वरप्राप्ती कशी शक्य आहे ?’, असे वाटायचे; पण अमृत महोत्सवाच्या वेळचे तुझे नृत्य पाहिल्यावर त्याचे उत्तर मिळाले. पुष्कळ भावजागृती होत होती.’

७. नृत्य पाहून साधकांची पुष्कळ प्रमाणात भावजागृती होण्याविषयी लक्षात आलेली कारणे

अ. या दिवशी परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या श्रीराम अवतारातील कार्याचा आरंभ झाल्याने वातावरणात चैतन्याचे प्रमाण पुष्कळ वाढले होते. त्या चैतन्यामुळे भावाची स्पंदनेही पुष्कळ वाढली होती.

आ. त्या दिवशी प्रत्यक्ष श्रीरामचंद्रांच्या रूपातील परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे दर्शन साधकांना झाले. त्यामुळे साधकांचा भाव जागृत झाला होता.

इ. वातावरणातील चैतन्य, भाव आणि साधकांतील भाव यांचे प्रमाण वाढले असल्यामुळे साधकांची पुष्कळ प्रमाणात भावजागृती होत होती.

८. कृतज्ञता

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या अमृत महोत्सवाच्या वेळी मला प्रत्यक्ष श्रीरामासमोर (त्यांच्यासमोर) नृत्य करण्याची दुर्मिळ संधी भगवंताने दिली. त्या कालावधीत घडलेल्या विविध प्रसंगांत भगवंताने साधनेचे विविध पैलू शिकवले. त्यासाठी मी त्यांच्या (गुरुदेवांच्या) चरणी कोटीशः कृतज्ञ आहे !’                                     (समाप्त)

– सौ. सावित्री वीरेंद्र इचलकरंजीकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (४.६.२०१७)

या अंकात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक