(म्हणे) ‘काश्मीर पाकसाठी जितके महत्त्वाचे तितके तुर्कस्थानसाठीही महत्त्वाचे !’ – तुर्कस्थानचे राष्ट्रपती रिसेप तैयप एर्दोगान

इस्लामी देश कसे एकमेकांना मिळालेले असतात, त्याचे हे उदाहरण. हे लक्षात घेऊन भारतानेही तुर्कस्थानच्या विरोधात कठोर धोरण अवलंबून त्याने काश्मीरच्या प्रश्‍नात नाक खुपसू नये, अशी ताकीद दिली पाहिजे. परत असे विधान केल्यास भारताने त्याच्याशी असलेले सर्व प्रकारचे संबंध तोडले पाहिजेत !

इस्लामाबाद (पाकिस्तान) – काश्मीरमध्ये अत्याचार होत आहेत आणि मी गप्प राहू शकत नाही. काश्मीर पाकसाठी जितके महत्त्वाचे आहे, तितके तुर्कस्थानसाठीही महत्त्वाचे आहे, असे विधान तुर्कस्थानचे राष्ट्रपती रिसेप तैयप एर्दोगान यांनी पाकच्या संसदेत बोलतांना केले. ते सध्या पाकच्या दौर्‍यावर आहेत.

१. एर्दोगान म्हणाले की, कोणत्याही भूमीवर मारलेल्या रेषेमुळे इस्लामला मानणार्‍या लोकांना विभाजित केले जाऊ शकत नाही. मध्य-पूर्वेमध्ये अमेरिकेची शांती निर्माण करण्याची योजना वास्तविक आक्रमकतेच्या उद्देशाने प्रेरित आहे. कुठेही मुसलमान मारले जात असतील, तर त्याच्या विरोधात मुसलमान देशांनी संघटित झाले पाहिजे.

२. एर्दोगान यांनी या वेळी स्पष्ट केले की, फायनेन्शियल अ‍ॅक्शन टास्क फोर्सच्या (एफ्.ए.टी.एफ्.च्या) बैठकीत तुर्कस्थान पाकला विनाअट समर्थन करील. ते म्हणाले की, तुमचे दुःख ते माझे दुःख आहे. पाकच्या प्रगतीमध्ये तुर्कस्थानचे नेहमीच सहकार्य राहील. ‘पाकच्या संसदेत येऊन मी धन्य झालो’, असेही ते म्हणाले. वर्ष २०१६ मध्येही त्यांनी संसदेत भाषण केले होते.