लक्ष्मणपुरी येथे न्यायालयात गावठी बॉम्बद्वारे झालेल्या आक्रमणात अनेक अधिवक्ते घायाळ

अधिवक्त्यांच्या २ गटांतील पूर्ववैमनस्यामुळे आक्रमण झाल्याचा संशय

  • जर अधिवक्त्यांमधील पूर्ववैमनस्यामुळे असे आक्रमण झाले असेल, तर ते गंभीर आहे. स्वतःला कायद्याचे ठेकेदार समजणारेच जर अशा प्रकारे सहकार्‍यांवर आक्रमण करण्याचा कट रचत असतील, तर ते सामाजिक स्वास्थ्यासाठी धोकादायक आहे !
  • न्यायालयाच्या आवारात जर अशा प्रकारे गावठी बॉम्बचा स्फोट होत असेल, तर राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती बिकट आहे, हेच यातून दिसून येते !

लक्ष्मणपुरी (उत्तरप्रदेश) – येथील वजीरगंज न्यायालयात गावठी बॉम्बद्वारे करण्यात आलेल्या आक्रमणामुळे काही अधिवक्ते घायाळ झाले आहेत. त्यांना रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. घटनास्थळावरून २ जिवंत गावठी बॉम्ब हस्तगत करण्यात आले आहेत.

‘बार असोसिएशन’चे पदाधिकारी अधिवक्ता संजीव लोधी यांच्यावर हा बॉम्ब फेकण्यात आला होता; मात्र सुदैवाने ते यातून वाचले. या वेळी आक्रमणकर्त्यांनी बंदुकाही दाखवल्या. ‘अधिवक्ता संजीव लोधी यांचे ‘असोसिएशन’चे सचिव अधिवक्ता जितेंद्र यादव उपाख्य जीतू यांच्याशी भांडण झाले होते’, असे सांगितले जात आहे. जीतू आणि त्यांचे समर्थक यांनीच हे आक्रमण केल्याचा संशय आहे. ‘अधिवक्त्यांच्या २ गटांमधील संघर्षामुळे हे आक्रमण झाले’, असे पोलिसांनी सांगितले.