युवा पिढी ‘व्हॅलेंटाईन डे’सारख्या फालतू गोष्टींत वेळ वाया न घालवता राष्ट्रासमोरील समस्यांकडे गांभीर्याने लक्ष देईल तो सुदिन !

१. तरुण पिढीने कोण्या प्रेमविराच्या भाकड कथा ऐकून ‘व्हॅलेंटाईन डे’सारख्या कुप्रथेचे अंधानुकरण करणे आणि पुढे एकतर्फी प्रेम, प्रेमभंगाच्या वैफल्यातून हत्या, बलात्कार इत्यादी गुन्ह्यांमध्ये वाढ होणे

कु. प्राजक्ता धोतमल

‘फेब्रुवारी मास (महिना) म्हटला की, आजच्या तरुण पिढीला ‘व्हॅलेंटाईन डे’ एवढेच ठाऊक असते. या दिवसांत विद्यार्जन, सृजनशीलता आणि उद्योगशीलता यांना ग्रहण लागते. जो तो ‘आपल्या आवडत्या व्यक्तीसाठी काय करायचे ?’ या नसत्या उद्योगात रममाण झालेला असतो. ‘व्हॅलेंटाईन डे’ची ही कुप्रथा मुळात आपली नाहीच. ही कुप्रथा पाश्‍चिमात्य देशांकडून आली आणि दुर्दैवाने भारतातील तरुण पिढी कोण्या प्रेमविराच्या भाकड कथा ऐकून या कुप्रथेचे अंधानुकरण करू लागली. पाश्‍चात्त्यांकडून या नको त्या गोष्टी घेतल्याने आपल्या देशातील तरुण पिढी उथळ माथ्याची होत चालली आहे. यातूनच मग एकतर्फी प्रेम, प्रेमभंगाच्या वैफल्यातून हत्या, बलात्कार इत्यादी गुन्ह्यांमध्ये वाढ होत आहे.

२. एक दिवस प्रेमाचे उदात्तीकरण करणे म्हणजे खरे प्रेम नव्हे, तर ‘परमार्थाकडे जाण्यास जे पूरक ठरते, ते खरे प्रेम’, ही हिंदु धर्माची शिकवण असणे

‘केवळ एक दिवस प्रेमाचे उदात्तीकरण करणे म्हणजे खरे प्रेम’, हे प्रेमाचे अयोग्य समीकरण आहे. आपली हिंदु संस्कृती संयत आणि नैतिक प्रेम शिकवते. ‘‘परमार्थाकडे जाण्यास जे पूरक ठरते, ते खरे प्रेम !’’, ही हिंदु धर्माची शिकवण आहे. खरे प्रेम हे त्याग आणि निरपेक्षतेवर आधारित असते. आजकालचे युवक-युवती केवळ ‘स्टंटबाजी’ म्हणून दुसर्‍यावर स्वतःची ‘छाप’ पडण्यासाठी काहीतरी करत असतात.

३. बाह्य गोष्टींपेक्षा आंतरिक गोष्टी अधिक प्रभावशाली आणि चिरंतन असणे अन् युवा पिढीने खरे आंतरिक प्रेम करायला शिकण्यासाठी हिंदु धर्मातील महान तत्त्वे अंगीकारणे आवश्यक असणे

पोकळ डौलाच्या मागे लागलेल्या या युवकवर्गाच्या हे लक्षात येत नाही की, बाह्य गोष्टींपेक्षा आंतरिक गोष्टी अधिक प्रभावशाली आणि चिरंतन असतात. प्रभु श्रीरामचंद्रांनी आपल्या सामर्थ्याने शिवधनुष्याचा ‘पण’ जिंकून जनकनंदिनी सीतेला वरले आणि त्यांनी आयुष्यभर एकपत्नीव्रत आचरले. भगवान शिवाची अर्धांगिनी होण्यासाठी पार्वतीने कठोर तप केले. पुराणातील या कथा आपल्यासाठी आदर्शाचा परिपाठ आहेत. हिंदु धर्मातील या महान तत्त्वांचा आजच्या युवा पिढीने अंगीकार करणे आवश्यक आहे.

४. वेगाने अध:पतनाच्या दिशेने चाललेली तरुण पिढी आणि पर्यायाने देशाची अधोगती यांना रोखण्यासाठी ‘डे’ संस्कृती कायमची बंद करणे आवश्यक !

एकीकडे ‘व्हॅलेंटाईन डे’पेक्षा ‘मातृ-पितृदिन’ साजरा करण्याचे आवाहन पूज्यपाद संतश्री आसारामजीबापू करत आहेत. तसेच या दिवशी होणार्‍या कुप्रकारांना आळा घालण्यासाठी काही संघटना कार्यरत आहेत. त्यांची कृती निश्‍चितच अभिनंदनीय आहे; पण याचा प्रसार सर्वत्र व्हायला हवा. ‘व्हॅलेंटाईन डे’च काय; पण ‘रोज डे’, ‘चॉकलेट डे’, ‘फ्रेंडशिप डे’ आदी वेळखाऊ आणि निरर्थक ‘डे’ साजरे होणे कायमचे बंद व्हायला हवे. असे झाले, तरच वेगाने अध:पतनाच्या दिशेने चाललेल्या तरुण पिढीला आणि पर्यायाने देशाच्या अधोगतीला आळा बसू शकेल !

सध्या शत्रूराष्ट्रांच्या वाढत्या हालचाली पाहता युवकांसह सर्वच नागरिकांनी संरक्षणाच्या दृष्टीने सजग राहायला हवे, तसेच देशातील महागाई, बेरोजगारी, भ्रष्टाचार आदी समस्यांना मुळासकट उपटून टाकणे आवश्यक आहे. युवा पिढी ‘व्हॅलेंटाईन डे’सारख्या फालतू गोष्टींत वेळ वाया न दवडता राष्ट्रासमोरील समस्यांकडे गांभीर्याने लक्ष देईल, तो सुदिन !’

– कु. प्राजक्ता धोतमल, सनातन आश्रम, देवद, पनवेल (१३.२.२०१६)