संगीतकलेचे सामर्थ्य !

संपादकीय 

मराठी कलाक्षेत्रामध्ये नुकताच एक विक्रम घडला. ‘रेडू’ चित्रपटातील ‘माझ्या देवाक काळजी रे’ या गाण्याने ‘यु-ट्यूब’वर १० कोटी ‘व्ह्यूज’ मिळवले; म्हणजे १० कोटींहून अधिक जणांनी हे गाणे ऐकले किंवा त्याचे चलचित्र पाहिले. एखाद्या मराठी गीताला एवढ्या मोठ्या संख्येने प्रतिसाद लाभणे, हे वैशिष्ट्यपूर्ण आहे. १८ मे २०१८ या दिवशी ‘रेडू’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. तेव्हापासून या गाण्याने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवले. गीतकार गुरु ठाकूर यांनी हे गाणे लिहिले असून विजय गवंडे यांनी संगीत दिग्दर्शन केले आहे, तर अजय गोगावले यांनी हे गाणे गायले आहे. परिस्थितीमुळे हतबल झालेल्या माणसाला उभारी देणारे हे गीत आहे. ‘तू धीर सोडू नको. रात्रीनंतर पुन्हा पहाट उगवतेच. त्यामुळे परिस्थितीला घाबरून तू पाठ फिरवू नकोस. फाटक्या झोळीत निराशा पडत असली, तरी तू खचून जाऊन नकोस. उद्याचा दिवस तुला साद घालेल. कदाचित् जगही तुझ्या मुठीत येईल; कारण माझ्या देवाला तुझी काळजी आहे’, अशा आशयाचे गीताचे बोल आहेत. हे बोल संकटांनी घेरलेल्या व्यक्तीच्या मनाला उभारी देणारे आहेत. या शब्दांना जेव्हा चांगल्या संगीताची साथ मिळते, तेव्हा ते अधिक परिणामकारक ठरतात. श्रोत्यांची संख्यात्मक अवाढव्यता एवढेच या गाण्याचे यश नसून हे गाणे ऐकून श्रोत्यांनी ज्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत, त्या प्रतिक्रिया खरे तर गाण्याची फलनिष्पत्ती सांगणार्‍या आहेत. ‘हे गाणे ऐकल्यानंतर मानसिकदृष्ट्या धीर मिळाला’, ‘सकारात्मकता अनुभवायला मिळाली’, ‘नैराश्य दूर झाले’, अशा प्रतिक्रिया काही जणांनी व्यक्त केल्या आहेत. गाणे ऐकल्यानंतर ‘मी आत्महत्येच्या विचारांपासून दूर झाले’, असेही एका मुलीने सांगितले. यावरून संगीतातील शक्तीची प्रचीती येऊ शकते.

या गाण्याचा अजून एक महत्त्वाचा पैलू म्हणजे या गाण्याने पेरलेली आध्यात्मिकता ! ‘देव तुझ्यासमवेत आहे. तू काळजी करू नको’, असा विश्‍वास निर्माण करण्याचा प्रयत्न गाण्यातून केला आहे. यातूनच ईश्‍वराच्या सामर्थ्याची प्रचीती येते. ‘देव आहे’, हे एवढे शब्दही सध्याच्या गोंधळलेल्या आणि आधार शोधणार्‍या समाजाला किती आश्‍वासक ठरतात, ते यातून दिसून येते.

मनोरंजन नाही, तर साधना

‘माझ्या देवाक काळजी रे’ या एकाच गाण्याने मराठी कलाविश्‍वात विक्रम केला आहे, असे नाही, तर अशी कित्येक गाणी, कविता अथवा भजने आहेत, ज्यांचे गारुड आजही रसिकांच्या मनावर कायम आहे. पूर्वीच्या काळी यशाचे किंवा प्रसिद्धीचे संख्यात्मक मोजमाप घेणारी ‘यू ट्यूब’सारखी साधने नसल्याने कदाचित् त्याचा गवगवा झाला नसेल; पण या गाण्यांनी कित्येकांच्या मनाला आलेली मरगळ झटकून उत्साहाची आणि आशेची पालवी फुलवली आहे, हे निश्‍चित ! भारताच्या स्वातंत्र्यलढ्याला राष्ट्रभक्तीचे बळ देणारे ‘वन्दे मातरम्’ हे शब्दही कवितेतीलच होते, ज्यांना राष्ट्रमंत्राचे सामर्थ्य प्राप्त झाले. अगदी अलीकडच्या काळातील उदाहरण म्हणजे ‘गीतरामायण’ ! लता मंगेशकर यांनी ‘ए मेरे वतन के लोगो’ असे म्हणत देशभक्तीची भावना जागृत केली. संदीप खरे-सलील कुलकर्णी या जोडगोळीनेही मध्यंतरीच्या काळात ‘आयुष्यावर बोलू काही’ म्हणत लोकांना मंत्रमुग्ध केले. अशी कितीतरी उदाहरणे आहेत. अशी उत्कटता पाश्‍चात्त्य संगीतामध्ये क्वचितच् अनुभवायला येत असेल. पाश्‍चात्त्य संगीताने उच्छृंखल वृत्ती वाढते, तर शास्त्रीय संगीताने संयतता ! याचे कारण संगीताच्या मूळ उद्देशामध्ये आहे. भारतीय संस्कृतीमध्ये संगीत हे केवळ मनोरंजनाचे साधन नाही, तर ईश्‍वरप्राप्तीचे माध्यम मानले गेले आहे. या संगीतामध्ये वैयक्तिक स्तरावर मोक्षप्राप्ती साधण्याची किमया आहे, तसेच इतरांनाही त्यासाठी प्रवृत्त करण्याची शक्ती आहे. शास्त्रीय संगीताने ती परंपरा बर्‍यापैकी जोपासली असली, तरी या व्यतिरिक्तचे सध्याचे संगीत ‘साधना’ या केंद्रबिंदूपासून भरकटल्याचे चित्र आहे.

व्यक्तीच्या साधनेचा परिणाम

व्यक्तीच्या साधनेचाही तिच्या कलाकृतीवर परिणाम होत असतो; म्हणूनच ८०० वर्षांपूर्वी मागितलेले ‘पसायदान’ आजही पथदर्शक ठरते. पसायदान हे केवळ गाणे नाही, तर त्यामध्ये जगण्याचे तत्त्वज्ञान सामावलेले आहे. तसाच अनुभव मनाच्या श्‍लोकांच्या संदर्भातही येतो. समर्थ रामदासस्वामींचे मनाचे श्‍लोक आजही वाचकाला अथवा त्याचे पठण करणार्‍याला ‘समर्थ’ बनवतात. याचे गमक जसे शब्दांमध्ये तसे त्या शब्दांना बळ प्राप्त करून देणार्‍या रचयित्याच्या आध्यात्मिक अधिकारामध्येही आहे. २-३ दशकांपूर्वी होऊन गेलेले महान संत आणि सनातन संस्थेचे प्रेरणास्थान संत भक्तराज महाराज यांचे उदाहरणही त्याच पठडीतील आहे. संत भक्तराज महाराजांच्या तीन ‘भ’कारातील पहिला ‘भ’ भजनांसाठी होता. भजनाचे शब्द आणि चाल त्यांना एकत्रितच सुचत असे अन् ते भजने म्हणत असत. या भजनांचे श्रवण आजही व्यक्तीला आध्यात्मिकदृष्ट्या मोठे बळ प्रदान करते. अर्थात् हा सगळा प्रचीतीचा म्हणजे अनुभवण्याचा विषय आहे. स्पर्धा आणि व्यावसायिकता यांच्या सध्याच्या जगात संगीताचा आध्यात्मिक पैलू डावलला जात आहे. त्यामुळेच या गाण्यांनी मानसिकदृष्ट्या उभारी मिळत असली, तरी ती तात्कालिक असते. सध्याच्या व्यावसायिक गाण्यांमधूनही जर व्यक्तीला मानसिक शांततेची काही काळासाठी का होईना, प्रचीती येत असेल, तर मूळच्या शुद्ध सात्त्विक संगीतामध्ये किती सामर्थ्य असेल, याची आपण कल्पना करू शकतो. हिंदु संस्कृतीचे बलस्थान असलेल्या १४ विद्या आणि ६४ कला या शुद्ध स्वरूपात जोपासणे हे कलेच्या उपासकांचे दायित्व आहे.